Monday 31 August 2015

भरारी : वर्ष पहिले - अंक पहिला


अनुक्रमणिका


इमेल :  contact.knirman@gmail.com
वेबसाईट :  www.mkf.org.in/mso



या अंकासोबत दिलेले व्हिडीओ खालील लिंक वर पाहता येतील


(हे मासिक केवळ खाजगी वितरणासाठी)


संपादकीय

         संपादकीय... 
सप्रेम नमस्कार!

शालेय वयोगटातील मुलांमध्ये सामाजिक बुद्धिमत्तेचा विकास व वैश्विक मानवी मुल्यांची रुजवणूक करणे असे उद्दिष्ट असलेल्या 'कुमार निर्माण' या शैक्षणिक उपक्रमाने नुकतेच तिसऱ्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण केले आहे. कुठलीही मोठी जाहिरात न करता २० जिल्ह्यांतून ५० गट यावर्षी कुमार निर्माण अंतर्गत कार्यरत असतील याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन!

आपण हे नियतकालिक, कुमार निर्माण संबंधी विविध घडामोडी, विद्यार्थ्यांचे व निमंत्रकांचे अनुभव, शैक्षणिक साहित्य यांची देवाण घेवाण करण्यासाठी सुरु करत आहोत. याची सर्व विद्यार्थी, पालक व निमंत्रकांना मदत होईल अशी आशा वाटते.

नुकतीच निमंत्रकांची प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. निर्माण युवा सायली तामणे, सनत गानू, धनंजय माळी व केदार आडकर यांनी काही सत्रे घेतली. नंदाकाकानी (नंदा खरे) देखील या कार्यशाळेत उपस्थित राहून सर्वांना प्रोत्साहन दिले. तर निर्माण ६ चे सम्मीत वर्तक, अमोल दळवी, निरंजन तोरडमल, इशा घुगरी, गीता लेले, गणेश माळी, शैलेश जाधव यांनी ​हे प्रशिक्षण शिबीर पार पाडण्यात खूप मोलाची मदत केली.​
या प्रशिक्षणातून देण्यात आलेले काही महत्वाचे विचार असे होते -

·         विद्यार्थी आपल्या ज्ञानाची निर्मिती स्वतः करत असतो
·         आयुष्य हेच शिक्षण आहे
·         कृतींमधून मुलांच्या वृत्तीमध्ये होणारा सकारात्मक बदल महत्वाचा आहे
·         कुमार निर्माण अंतर्गत मुलांच्या विविध कृती या फक्त माध्यम आहेत, साध्य नव्हे

या कार्यशाळेत शेवटच्या दिवशी, आधीपासून कुमार निर्माणशी जोडल्या गेलेल्या मुलांचा कौतुकसोहळा मा. डॉ. अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. त्यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन ही नेहमीप्रमाणेच एक मेजवानी होती.

शैलेश जाधव व प्रणाली सिसोदिया लवकरच प्रफुल्ल सोबत कुमार निर्माण साठी पूर्णवेळ काम सुरु करतील. ​त्यांना आपल्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा!


कुमार निर्माण चा गेल्या वर्षभराचा आढावा घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा. 

‘कुमार निर्माण’ केंद्रीय कार्यशाळा - २०१५

कुमार निर्माणची केंद्रीय कार्यशाळा दि.२२ व २३ ऑगस्ट रोजी जे. पी. नाईक एज्युकेशन इन्स्टिट्यूट, पुणे येथे पार पडली. ही कार्यशाळा मुख्यतः गट निमंत्रकांसाठी होती. महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांतून ५२ गटांतर्फे आलेले ५० निमंत्रक, निर्माण युवा व स्वयंसेवकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

पार्श्वभूमी
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश
-    कुमार निर्माणची संकल्पना स्वतः समजून घेणे व आपल्या संघातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना ती समजून सांगणे.
-    गट निमंत्रकाची मुलांसोबत काम करतानाची भूमिका समजून घेणे ई. हा होता.


या २ दिवसात विविध सत्रे घेतली गेली. या सत्रांमध्ये शिक्षण व मूल्यशिक्षण म्हणजे नेमके काय; शिक्षणाचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध, सामाजिक व भावनिक बुद्धीमत्ता म्हणजे काय, मुल कसं शिकतं, माणसात उपजतच सहकार्याची भावना कशी असते, वैश्विक मानवी मुल्ये कुठली आणि त्यांचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध यासारख्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या activities, उदाहरणे, लघुपट व खेळांच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेचा उपयोग आपण आपापल्या गटासोबत काम करताना कसा होईल यावर विचारमंथन झाले.

कुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस पहिला

दि. २२ ऑगस्ट २०१५


पहिल्या दिवसाची सुरवात ही विनायक कदम यांच्या ‘राहो सुखाने हा मानव इथे’ या सुंदर गीत गायनाने झाली. या गीतानी उत्साहपूर्ण वातावरण निर्मिती केली.

१.    विविध खेळ व परिचय सत्र - सायली तामणे आणि सनत गानू
गीत गायनानंतर निमंत्रकांसोबत सायली व सनत या निर्माण युवांनी वेगवेगळे खेळ घेतले. यात सुरवातीला सायलीच्या ‘लंबी दाढीवाला बाबा’ या गाण्याने सर्वांना उल्हासित केले. यानंतर एकमेकांशी ओळख करून घेण्यासाठीचे काही खेळ तिने घेतले. जसे की, विविध गटांमध्ये फिरून एकमेकांना धम्माल हाय-हेल्लो करणे, ‘अरे यहाँ कैसे?’ असे विचारणे, स्वतःचा एक गुण लिहून तो आपल्या गटातील जोडीदाराला समजून सांगणे, ई. यानंतर सनतने मोकळ्या अंगणात काही खेळ व गाणे घेतले. 

पहिला खेळ होता पत्त्यांचा. या खेळात त्याने सर्वांना वेगवेगळे पत्ते वाटून एकमेकांशी न बोलता एका क्रमाने उभे राहावयास सांगितले व नंतर हाच खेळ तीन वेगवेगळ्या प्रकारे घेतला, यानंतर हा खेळ खेळताना काय झालं यावर निमंत्रकांची मतं घेण्यात आली. या खेळातून मुलांसोबत काम करताना पूर्वापार चालत आलेली विचारांची तसेच वृत्तीची साचेबद्ध चौकट मोडून मुलांच्या सर्जनशील विचारांची देवाणघेवाण करायला हवी हे समजले. यानंतर सनतने टीमवर्क या पार्श्वभूमीवर एक मजेदार असा विटांचा खेळ घेतला. ज्यात निमंत्रकांचे गट करून त्यांना एका जादुई विटेच्या सहाय्याने काल्पनिक दलदल पार करावयाची होती. या खेळातून सर्वांना सहकार्याची भावना व सांघिक कार्य याचे महत्व समजले. यासोबतच सनतच्या ‘हरियाली इधर उधर’ या गाण्यावर नाचून सर्वांनी खूप धम्माल केली.
       शेवटी त्याने ‘सहकार व असहकार’ यास अनुसरून ‘जितो जीतना जीत सको’ हा खेळ घेतला. यातून सर्वांना सहकार - असहकार व त्यातून होणारे फायदे व नुकसान हे खूप चांगल्या प्रकारे समजून घेता आले. सायली व सनतने घेतलेल्या या सत्रांनी कार्यशाळेच्या सुरवातीलाच प्रचंड उर्जा निर्माण केली, सर्व निमंत्रक खेळीमेळीच्या वातावरणात बोलू वागू लागले. याचा पुढील सत्रासाठी खूप फायदा झाला. 

२.    उत्क्रांती, सहकार्याची भावना आणि कुमार निर्माण - धनंजय मुळी
सनतच्या व सायलीने घेतलेल्या ‘जितो जीतना जीत सके!’ या खेळाचा धागा पकडून निर्माण युवा धनंजयने पुढील सत्र घेतले. यात त्याने लघुपटांच्या सहाय्याने मुंग्या व चिंपांझी यांच्यात उपजतच असलेली सहकार्याची भावना ही त्यांनी केलेल्या कामांतून कशाप्रकारे दिसून येते हे दाखवले. याच लघुपटांच्या माध्यमातून प्राण्यांत व माणसात उपजतच सहकार्याची, सामंजस्याची व परोपकाराची भावना असते याची त्याने सर्वांना जाणीव करून दिली. या सत्राच्या शेवटी या विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध प्रश्नांवर बराच उहापोह करण्यात आला.

३.    शिक्षण म्हणजे काय? – सायली तामणे
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे का? ह्या मूळ प्रश्नापासून सायलीच्या सत्राची सुरुवात झाली. योग्य शिक्षण कुठले? अनुभव माणसाला शहाणे करतो की शिक्षण? असे प्रश्न घेऊन सायलीने चर्चेच्या स्वरुपात सद्य परिस्थितीतील शिक्षण हे जगण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान देण्यास कसे कमी पडत आहे ह्याची जाणीव करून दिली. सद्य परिस्थितीतील शिक्षण हे फक्त मानवाच्या वाढीव गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला पूरक ज्ञान देणे एवढेच काम करत आहे पण हे करताना एक जबाबदार व संवेदनशील नागरिक बनवण्याकडे मात्र दुर्लक्ष करते आहे ह्याची जाणीव निमंत्रकांना झाली.

४.    वैश्विक मानवी मूल्ये - अमोल फाळके
माणूस हा सामाजिक प्राणी आहे व समूहात राहण्याकडे आपला त्याचा कल असतो. पण समूहात राहताना काही मूल्य त्यांनी जपली तर त्याचे तसेच तो राहत असलेल्या समूहाचे जगणे सुसह्य होते, सोपे होते. बंधुभाव, सहकार्य, प्रेम, मैत्री, समता, न्याय, पर्यावरणपूरकता, श्रमप्रतिष्ठा, अहिंसा,  वैज्ञानिक दृष्टीकोन हीच ती मूल्ये ज्यांना वैश्विक मानवी मूल्ये मानले जाते. समाज, देश, धर्म, भौगोलिक रचना ह्याच्या पलीकडे ही मूल्ये आहेत, जे लोक ह्या मुल्यांचा स्वीकार करतात त्यांचे आयुष्य सुकर होते, अन्यथा त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वैश्विक मूल्यांचे महत्व त्यांनी विविध ध्वनी-चित्रफितीतून विषद केले.

५.    सामजिक बुद्धिमत्तेची ओळख आणि कुमार निर्माण - नरेंद्र खोत
समाजात आनंदी आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी काही किमान कौशल्ये आणि बुद्धीमत्तांची गरज असते ज्यात संवेदनशीलता, संयम, नेतृत्व, कृतिशीलता यासारख्या घटकांचा अंतर्भाव असतो. ही सर्व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी तसेच विकसित करण्यासाठी आवश्यक असते ती सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ता. हे दोनही घटक आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्तेचा योग्य विकास होणे गरजेचे असते. मात्र मुल्यांचा आणि संस्कारांचा अभाव असला तर बुद्धिमत्ता जशा तारक असतात तशाच त्या मारक देखील ठरू शकतात. त्यामुळे या बुद्धिमत्ता विकसिक करतानाच त्यांचा योग्य वापर करण्याची शिकवण मुलांना देणे गरजेचे असते यावर नरेंद्र खोत यांनी त्यांच्या सत्रात भर दिला.
सुरुवातीलाच त्यांनी प्रत्येकाला एका कागदावर आवडत्या व नावडत्या व्यक्तींचे नाव व त्या मागील करणे लिहायला सांगितली. त्यानंतर प्रत्येकाला आवडणारी / नावडणारी व्यक्ती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचे स्वभावदोष आणि गुणविशेष सारखेच असतात याकडे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले.

६.    सिनेमा - The gods must be crazy II  - केदार आडकर
रात्रीच्या जेवणानंतरच्या सगळ्यांसाठी एका चित्रपटाचे आयोजन केलेले होते. जंगलात अडलेले 2 वैज्ञानिक, एकमेकांवर पाळत ठेवणारे नंतर अचानकपणे समोर आल्यानंतर एकमेकांचा जीव घेण्याच्या प्रयत्न करणारे आणि नंतर स्वतःचाच जीव वाचवण्याची धडपण करणारे 2 सैनिक, जंगलातील वन्य प्राण्यांची चोरी करणारे तस्कर, हरवलेल्या मुलांच्या शोधात निघालेला आफ्रिकेच्या जंगलातील आदिवासी, त्यांच्या प्रथा, संकटात सापडलेलं असतानाही मदतीची, सहकार्याची भावना ह्या सगळ्यामुळे The God must be crazy इंग्रजी सिनेमा भाषेची बंधने मोडून सर्वांच्याच हृदयाला जाऊन भिडला. या चित्रपटाच्या अनुषंगाने एखादा चित्रपट कसा पहावा, त्यातील बारीक सारीक गोष्टींचा कुमार निर्माण मधील मुलांच्या कृती व विचारांना चालना देण्यासाठी कसा उपयोग करता येतो याचे प्रात्यक्षिक पार पडले. 

कुमार निर्माण - प्रशिक्षण शिबीर दिवस दुसरा

दि. २३ ऑगस्ट २०१५

१.    रिफ्लेक्शन शेअरिंग
पहिल्या दिवशीच्या विविध सत्रांमधून व एकमेकांपासून निमंत्रकाना नवीन काय शिकायला मिळाले, काय भावले ई. गोष्टींबाबत निमंत्रकांनी व्यक्तिगत भावना व्यक्त केल्या. आपापल्या गटासोबत काम करताना वेळोवेळी मुलांचे असे शेअरिंग घेणे गरजेचे आहे हे लक्षात आले. 

२.    कुमार निर्माण – प्रफुल्ल शशिकांत
कुमार निर्माण शिबिरातील सर्व सत्रातून कुमार निर्माण सुरु करण्यामागील विचारांची पार्श्वभूमी टप्प्याटप्प्याने निमंत्रकांना उलगडून सांगण्यात येत होती पण हे करताना कुमार निर्माण म्हणजे नेमकं काय याचे कुतुहूल अजूनही सगळ्यांना होतच.
ह्याचा उलगडा प्रफुल्लच्या सत्रात झाला. कुमार निर्माणची सुरुवात, त्याची उद्दिष्टे, कार्यपद्धती, शैक्षणिक प्रक्रिया, गेल्या २ वर्षातील वाटचालीचा आढावा, विविध गटांनी केलेली कामे ह्या बद्दल प्रफुल्लने त्याच्या सत्रात सविस्तर माहिती दिली. या सत्रांनंतर कुमार निर्माण म्हणजे नेमक काय, विद्यार्थ्यांनी काय करणे अपेक्षित आहे, तसेच निमंत्रकाची भूमिका या बद्दल सर्वांना स्पष्टता आली. या सत्रातच केदार आडकर, रज्जाक पठाण, निलेश राठोड या निमंत्रकांनी त्यांच्या गटाने केलेल्या उपक्रमांबद्दल थोडक्यात माहिती दिली.

३.    एक आदर्श निमंत्रक – सुदाम भोंडवे
लौकिकार्थाने जास्त शिक्षण नसलेले पण ऊस तोड कामगारांच्या मुलांनी शिकले पाहिजे म्हणून अनेक वर्षापासून बीडजवळ डोमरी येथे एक अनोखी शाळा (गुरुकुल) चालवणारे सुदाम भोंडवे (काका) ह्यांची मुलाखत निर्माण युवा व निमंत्रक वृंदन बावनकरने घेतली. मुल हे अनुभवातून शिकते. शाळेतील चार भिंतींच्या आत छडीच्या धाकाने दिलेल्या शिक्षणापेक्षा निसर्गाच्या सानिद्ध्यात राहून, अनुभवातून घेतलेले शिक्षण हे कधीही जास्त चांगले असतें असे त्यांनी सांगितले. ह्याचे उदाहरण देताना त्यांनी त्यांच्या शाळेतील एक घटना सांगितली - वृक्षारोपणासाठी शाळेतील विद्यार्थी माती जमा करण्यासाठी खड्डा खणत असताना त्यांना अचानकपणे मानवी सापळा आढळला, सुरुवातीला मुले घाबरली पण नंतर एकेकाने धीर धरून जवळ जाऊन सापळा बघायला सुरुवात केली. त्यावेळी मुलांनी निरीक्षणातून, स्वतः हाताळून पाहिलेल्या त्या सांगाड्यातून मुलं जे मानवी शरीराबद्दल शिकली ते ती कधीही विसरणार नाहीत. अनुभवातून आलेलं शिक्षण हेच खरे शिक्षण असते व तेच मुलांच्या जास्त चांगले लक्षात राहते असे त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी गुरुकुल व तेथे चालत असलेले इतर उपक्रम यांचीही माहिती दिली.

४.    कौतुक सोहळा
कुमार निर्माणच्या केंद्रीय शिबिराच्या समारोप प्रसंगी मा. डॉ. अभय बंग तसेच MKCLचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विवेक सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच निर्माण कार्यकारी समितीचे प्रमुख श्री. सुनील चव्हाण व महाराष्ट्र नॉलेज फाऊनडेशनचे श्री. उदय पंचपोर व श्री. नरेंद्र खोत हे देखील उपस्थित होते.

ह्यावेळी सुरुवातीला मागील वर्षी कुमार निर्माणमध्ये सहभागी काही गटांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र तसेच पुस्तकांचा संच देऊन मुलांचे कौतुक करण्यात आले. 

डॉ. अभय बंग यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्याला फक्त पहिला येण्याच्या उद्देशाने मुलांना दावणीला बांधले जाते. कुठल्याही परिस्थितीत एकमेकांच्या पुढे जायचे याच्या अट्टाहासात मग शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी न राहता, नकोशी-कंटाळवाणी होत जाते. मात्र आज हीच प्रक्रिया आनंददायी करण्याची गरज आहे, शिक्षणाला चार भिंतीत न अडकवता, निसर्गाच्या सानिद्ध्यात घेऊन जाण्याची गरज आहे. अनुभवातून आलेले शिक्षण आणि शहाणपण हे एका खोलीत बसून नुसती पुस्तके वाचून मिळत नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी एका विद्यार्थ्याने  त्यांना कुमार निर्माणची प्रक्रिया सुरु करण्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली असे विचारले असता, कुमार निर्माणच्या मागची प्रेरणा ही तुम्ही, लहान मुले आहात, असे सुंदर उत्तर त्यांनी दिले


या कौतुक सोहळ्यानंतर लहान मुलांसाठी सामोसे, वेफर्स, आईस्क्रीमची व्यवस्था केलेली होती ज्यावर मुलांसमवेत निमंत्रकांनी देखील ताव मारला.
ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडण्यामागे निर्माणच्या अनेक युवा मित्रांचा सहभाग होता.  ज्यात केदार अडकर, सम्मित वर्तक, निरंजन तोरडमल, शैलेष जाधव, संतोष गवळे (सुत्रसंचलन), अमोघ पांडे (फोटोग्राफी) हे मित्र होते.
यांच्यासोबतच वयाने मोठे असणारे परंतु मनाने तरुण असणारे आपले सर्वांचे आवडते मित्र व आयकॉन श्री. नंदा खरे (नंदा काका) श्री. सुनील चव्हाण (सुनील काका) व श्री. उदय पंचपोर हेही कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

अशाप्रकारे अतिशय उत्साहपूर्ण, आनंददायी व खेळीमेळीच्या वातावरणात ‘कुमार निर्माण’ ची कार्यशाळा पार पडली.


उल्लेखनीय कृती

जळगावच्या कुमार निर्माण गटाची औरंगाबाद ट्रीप!!!
काही महिन्यांपूर्वी झालेल्या मीटिंगमध्ये माझा परिसर या विषयावर गप्पा झाल्या होत्या, त्यातल्या आवडत्या/नावडत्या गोष्टींवर देखील मुलांनी मोकळेपणाने चर्चा केली होती. परिसरातील अस्वच्छता आवडत नाही यावर सगळ्यांचेच एक मत होते. मग परिसर घाण कोण यावर बोलत असताना सुरुवातील आपल्या आजूबाजूचे लोक घाण करतात इथून मग शेवटी आपण स्वतः देखील तर घाण करतो हे सगळ्यांनीच मान्य केले. यानंतर सगळ्यांनी रस्त्यावर घाण टाकायची नाही, आपल घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा अस ठरल.


ऑगस्ट महिन्यात २२ आणि २३ तारखेला आम्ही (मी, हर्शल, टीना, निलोफर, अनिता, सुनिता आणि लक्ष्मी) सगळे औरंगाबाद ट्रीपला गेलो. बीबी-का-मकबरा परिसरात फिरत असताना तिथली स्वच्छता सगळ्यांनाच आवडली पण आमच्या समोरच एका बऱ्यापैकी वयस्कर जोडप्याने स्वताकडील तिकिटे फाडून हवेत भिरकावली आणि पुढे चालायला लागली. हे पाहून मुले लगेच त्यांच्या जवळ गेली आणि कचरा करू नका, इथे घाण का केलीत?” असे विचारले आणि त्यांच्या उत्तराची वाट न पाहता तिथली घाण गोळा करायला लागली. तिथेच एक महिला स्वच्छता कर्मचारी होत्या त्यांना वाटले मुलांनीच घाण केली म्हणून त्या मुलांना ओरडायला लागल्या त्यावेळी, मुलांनी नाही मोठ्यांनी घाण केलीये आणि मुल ती आवरतायेत असे सांगितल्यावर त्यांनी त्या वयस्कर जोडप्याला पुढे जाऊन गाठले आणि बरेच ओरडले.

दौलताबाद किल्यावर देखील मुलांनी पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या उचलून एका बाजूला रचल्या. किल्ल्याच्या भिंतीवर लोकांनी स्वताची लिहिलेली नाव पाहून मुलांना खूप वाईट वाटले. इतक्या चांगल्या आणि जुन्या इमारतींवर लोक स्वताची नाव लिहून घाण का करतात? आपल्या इमारतींची काळजी आपणच घ्यायला हवी हवे त्यांचे मत होते.

संपूर्ण प्रवासात कचरा करू नका अश्या कोणत्याही सूचना दिलेल्या नसतानादेखील मुलांनी स्वताच्या मनानेच कोठेही घाण केली नाही. स्वताजवळचा कचरा एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकत होती आणि कचरा पेटी दिसली कि त्यात ती पिशवी रिकामी करत होती.

पहिल्यांदाच जळगावच्या बाहेर पडलेल्या या मुलांनी पहिल्यांना परदेशी लोकांना बघितले पण हुल्लडबाजी किंवा चिडवाचिडवी केली नाही. उलट मला त्यांच्याशी बोलायला सांगितले, त्या लोकांनी आमच्या सोबत फोटो काढल्यावर आपल्याकडेपण आठवण पाहिजे म्हणून आमच्या कॅमेऱ्यात पण फोटो काढून घेतले. 

अनेकदा ट्रीपला गेल्यावर शिक्षक मुलांवर विश्वास न ठेवता उगीचच त्यांना सतत सूचना देत राहतात पण तसे न करत मुलांवर जर विश्वास टाकला तर मुले अजिबात गोंधळ करत नाहीत, त्रास देत नाहीत, चुकीचे वागत नाहीत आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेत ट्रीपचा मनमुराद आनंद लुटतात.

-    गट निमंत्रक अद्वैत दंडवते (९८९०३३६०७०)

मुलांच्या लेखणीतून

“आम्ही हे ना.असं हे ना. घरी चाललेलो ना. तर तिकडेना. बांधकाम चाललेलं ना. त्या आजींचा असा पाय घसरून पडलेला ना. तर तिथं लई लोकं होती. तरी ते हसत बसले. उचललं पण कोणी न्हाय. मग आम्ही गेलो. त्यांना हेना वट्यावर बसवलेलं. मग आम्ही हेना इथं डोर स्टेप स्कूलला आलो आणि औषधाचा बॉक्स घेतला. परत तिथं गेलो. त्यांना डेटोल आणि कापूस लावलं. मग त्यांच्या घरात गेलो आणि त्या काकूंना म्हटलो ‘यांना नीट घेवून जावा.’
त्या आम्हाला म्हणल्या की ‘खूप शिका आणि मोठे व्हा.’
मग आम्ही त्या काकूंना म्हणलो की ‘यांची निट काळजी घ्या.’ आणि मग आम्ही तेथून घरी गेलो.”

-    साक्षी बेनके, डोर स्टेप स्कूल, दत्तवाडी, पुणे

प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा



प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा

प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का?
शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका

कुत्र्याची शेपूट वाकडी का?
पेग्वीनची मान तोकडी का?
क्रिकेटची बॅट लाकडी का?
सापाची चाल वेडीवाकडी का?          
प्रश्न विचारा...

वटवाघूळ रात्री फिरतात का?
मासे पाण्यात तरतात का?
पतंग दिव्यावर मरतात का?
काजवे चमचम करतात का?
प्रश्न विचारा...

खोकल्याची उबळ येते का?
सर्दीत नाक गळते का?
मेंदूला वास कळतो का?
आठवणीने उचकी लागते का?
प्रश्न विचारा...

रंगीत तारे असतात का?
दिवसा तारे दिसतात का?
जीवसृष्टी कुठे असेल का?
माणसासारखा माणूस दिसेल का?

प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का?
शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका
प्रश्न्न विचारा...


सौजन्य: बाल विज्ञान उत्सव - हस्तपुस्तिका, भारत ज्ञान विज्ञान समुदाय

बोलकी पुस्तके

(आचार्य विनोबा भावे यांच्या ‘शिक्षण-विचार’ या पुस्तकातील एक उतारा)

विद्यार्थ्यांशी माझी एकरूपता

विद्यार्थ्यांची संख्या ज्या सभेत जास्त असते ती सभा अत्यंत शांत असते, असे मी पहिले आहे. विद्यार्थ्यांचा मला जो अनुभव आला आहे तो अदभूत आहे. विद्यार्थ्यांविषयी माझ्या मनात फार प्रेम आहे. त्यामुळे मी त्यांच्या समोर बोलताना त्यांच्याशी अगदी एकरूप होऊन बोलतो. मी दुसरा कोणीही असलो तरीही प्रथमतः विद्यार्थी आहे हे मी जाहीर करू इच्छितो. माझे अध्ययन अजूनही चालू आहे. एक उदाहरण सहज देतो आमच्या पदयात्रेतही रोज एक तास देऊन मी जपानी भाषेचे अध्ययन केले. वय वाढले म्हणून अभ्यासासाठी लागणारी स्मरणशक्ती कमी होते असा अनुभव मला नाही. उलटपक्षी माझे शरीर जसेजसे क्षीण होत चालले आहे, तसतशी माझी स्मरणशक्ती अधिक तीव्र होत चालली आहे. लहानपणी श्लोक पाठ करण्यास दहादा म्हणावा लागत होता तो आज दोनदा म्हणून पाठ होतो. त्याचे कारण, माझे अध्ययन चालूच राहिले असे आहे. बुद्ध भगवानांनी म्हणले आहे की रोज स्नान केल्याने जसे शरीर स्वच्छ होते, किंवा रोज झाडल्याने ज्याप्रमाणे घर स्वच्छ राहते, त्याप्रमाणे रोज अध्ययन केले तर मन स्वच्छ होते व राहते. रोज स्नान केले नाही तर शरीर अस्वच्छ होईल. त्याच न्यायाने रोज अध्ययन न केले तर मन स्वच्छ राहणार नाही. ह्या कथनानुसार माझा अभ्यास निरंतर चालू राहिला, व मला उमेद आहे की ज्या दिवशी परमेश्वर मला उचलून नेईल त्या दिवशी ही मी अध्ययन करूनच गेलेला असेन. ह्या अध्ययनशीलतेमुळे विद्यार्थ्यांच्या हृदयाशी एकरूप होण्याचा अनुभव मला सहजच येतो. 

कोडे

कोडे
बंडू, गुंडू व खंडू हे तीन मित्र होते. त्यांना गोट्या जमविण्याचा व खेळण्याचा छंद होता.
एकदा त्यांनी आपापल्या जवळच्या गोट्या मोजल्या व एक मजा केली.

गुंडूजवळ जितक्या गोट्या होत्या तितक्या गोट्या बंडूने गुंडूला दिल्या.
खंडू जवळ जितक्या गोट्या होत्या तितक्या गोट्या गुंडूने खंडूला दिल्या.
बंडूजवळ जितक्या गोट्या होत्या तितक्या गोट्या खंडूने बंडूला दिल्या.

आणि काय आश्चर्य ! आता प्रत्येकाजवळ सारख्याच म्हणजे १६ गोट्या झाल्या.


तर सुरवातीला बंडू, गुंडू व खंडू या प्रत्येकाकडे किती गोट्या होत्या?

विवेक काकांशी गप्पा

मार्गदर्शकांशी गप्पा

‘कुमार निर्माण’ वार्षिक संमेलन - सप्टेंबर २०१४ मध्ये MKCL चे व्यवस्थापकीय संचालक व कुमार निर्माण चे मार्गदर्शक मा. श्री. विवेक सावंत यांनी सहभागी गटांतील मुलांशी साधलेला प्रत्यक्ष संवादातील काही भाग.

 “बालमित्रांनो,
मी जेव्हा तुमच्याएवढा होतो, तेव्हा माझे एक शिक्षक होते, खूप छान शिक्षक! आज हि त्यांच्या सोबत माझे घनिष्ट संबंध आहेत. माझ्या हातून काही चांगलं घडलं की ते त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. शाळेत त्यांनी मला स्काउटींग ची सवय लावली, त्या मधून आम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागत होत्या. ते स्वतः एक उत्कृष्ट चित्रकारही आहेत. ते आम्हाला नाशिकच्या आजूबाजूच्या जंगलात घेऊन फिरायचे आणि आम्ही निरनिराळ्या वस्तूंचा संग्रह करायचो. आणि ते आम्ही शाळेमध्ये ठेवायचो. एके दिवशी आमच्या शाळेत पु. ल. देशपांडे आलेले, आणि त्यांनी तो संग्रह बघितला. त्यांना आम्ही सगळी माहिती दिली, अगदी छोटी-छोटी माहितीही सांगितली. ते आम्ही कसं जमवल, सरांनी आम्हाला कसं मार्गदर्शन केल ई. आणि हे ऐकून ते एवढे खुश झाले की त्यांनी आमच्या शाळेला काचेची कपाट भेट म्हणून दिली. आम्ही त्या वस्तू काचेच्या कपाटात ठेऊन कोणी पाहुणे आले कि त्यांना दाखवायचो.
            स्काऊट मध्ये असताना, सरांनी आम्हाला एके दिवशी सांगितल की आपल्याहून गरीब मुलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. त्यांनी आम्हाला असं विचारल की तुमच्या वर्गामधून कोण कोण असे मुलं आहेत कि ज्यांना घालायला चपला नाहीत ते तुम्ही शोधून काढा आणि ज्यांच्या कडे दोन किवा तीन चपलांचे जोड असतील त्यांनी चपला नसलेल्या मुलांना ते जोड द्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दुसऱ्या दिवशी आमच्या सगळ्यांकडे चपला होत्या. त्यातून आम्हाला एक छोटीशी गोष्ट समजली की आपल्या कडे सगळ्या गोष्टींचा संग्रह न करता त्या दुसर्यांना पण वाटल्या पाहिजेत. परत एके दिवशी सर म्हणाले की अजून त्यापेक्षाही गरीब मुलं आहेत तर त्यांना आपण कशी मदत करू शकतो. त्यांच्याकडे तर कपडे पण नाही आहेत. मग आम्ही मुलांनी सांगितलं की आम्ही आपल्या घरातून कपडे आणून त्यांना देऊ शकतो. आम्ही घरी आईला सांगू आणि पैसे घेऊ आणि सरांकडे आणून देऊ. तर सर म्हणाले की हे मला मुळीच मान्य नाही, तुम्ही स्वतः ते पैसे कमावले पाहिजेत आणि मग तुम्ही त्यांना कपड्यांसाठी दिले पाहिजे. मग आम्ही म्हणालो सर ठीक आहे मग तुम्हीच आम्हाला सांगा की आम्ही काय करायच ते. सरांनी सुचवल की “श्रमदान“ करा.
मग आम्ही अनेक प्रकारचे श्रमदान केले पण सगळ्यात आम्हांला अपयश आले. श्रम तर झाले पण पैसे काही मिळेनात. मग आम्ही एक शक्कल लढवली. ती अशी कि आमच्या इथे नाशिकला कालिकेची जत्रा भरायची, तर त्या जत्रे मध्ये आपण लोकांच्या चपला सांभाळायच्या. आमच्या कडे तंबू होता, तो आम्ही उभारला आणि तिथे येणाऱ्या भक्तांना आम्ही म्हणायचो कि “काका/काकू तुम्ही आम्हाला पाच पैसे द्या त्याबदल्यात आम्ही तुमच्या चपला सभाळतो”, त्या वेळेला पाच पैश्याच नाणं असायचं. मग पाच पैसे घेऊन आम्ही चपला सांभाळायचो, मग दिवसभर असं करत करत पहिल्या दिवशी आम्ही पाच पैशांचा हे मोठा ढीग सरांच्या कडे नेऊन दिला, आणि तो देताना आमची छाती अशी गर्वाने फुगुन आली. मग सर म्हणाले हे आता जत्रेत आठही दिवस करायचं. दुसरयाच दिवशी आम्हाला कळलं की हे खूपच अवघड काम आहे. गर्दी वाढत गेली, दुकाने लागत गेली, दुकानवाले लोकांना म्हणायचे की आमच्या कडून तुम्ही सामान विकत घ्या आणि आम्ही तुमच्या चपला फुकटात सांभाळतो. आम्हाला वाटलं की आमचा हा मार्ग बंद होतो कि काय. मग आम्ही काय केलं की त्या दुकानाच्या अगोदर जाऊन उभे राहिलो, आम्ही लोकांना सांगायचो चपला आमच्या कडे ठेवा, फुल-नारळ कुठून पण घ्या. काही आजी-आजोबा आमचं कौतुक करण्यासाठी आमच्याकडे चपला ठेवायचे. हे आम्ही सरांना सांगितल तर सर म्हणाले अस उपकार करून नाही घ्यायचे, तुम्ही डोकं चालवा, आणि अस काहीतरी करा कि त्यांना तुमच्याकडे चपला ठेवाव्याच लागतील. कारण तुम्हाला ज्यांना मदत करायची आहे, ती इतरांनी तुमच्यावर केलेले उपकार नसावे. आम्ही अक्षरशः बेजार झालो, आम्ही फक्त सातवी आठवीतले मुलं, अजून काय करणार. मग, माझ्या डोक्यात एक कल्पना आली, कुठून तरी इकडून तिकडून पॅालिश आणि ब्रश, फडके आणले, मग आम्ही काका-मावशींना सांगायचो तुम्ही आमच्याकडे चपला ठेवल्या तर आम्ही चपलाना पॅालिश करून देऊ. फुकट पॅालिश करून भेटतय म्हटल्यावर सर्व खुश, मग गर्दी जमायला लागली. दुसऱ्या दिवशी सरांना आम्ही दोन डब्बे भरून पैसे दिले. आम्ही प्रचंड खुश!
            पुढच्या दिवशी धो-धो पाऊस पडू लागला, आम्हाला वाटलं आत्ता काय होतंय आपल काम, पण मग आम्ही नवीन उद्योग चालू केला, छत्र्या गोळा केल्या आणि लोकांना म्हणालो तुम्ही आमच्या कडे चपला ठेवा आणि हि छत्री घेऊन जा अन दर्शन घेऊन या. मग काय, त्या दिवशी तीन डब्बे भरून पैसे. पण आमचे सर कशाला ऐकताय.. सराना कळलं की ज्या अर्थी आम्हाला जमतंय म्हणजे हे काम सोपं दिसतंय. सर म्हणाले ज्या नगरपालिकेच्या मुलांना तुम्ही मदत करणार आहात त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की तुम्ही त्यांच्यावर उपकार करताय. त्यांना तस वाटू नये म्हणून काहीतरी करा. मग त्या मुलांशी आम्ही बोललो तर त्याच मुलांनी आम्हाला निरनिराळे मार्ग सुचवले. मग ते आणि आम्ही असे दोन्ही गट मिळून ‘खरी कमाई’ च्या मागे लागलो. मग आम्ही लोकांच्या घरी जायचो, सगळी भांडी साफ करून द्यायची, झाडून लोटून द्यायचं, पण त्यातल्या काही काकू आमच्या कडून हे भलं मोठ काम करून घायच्या आणि थोडेसेच पैसे द्यायच्या तरी आम्ही त्या कार्डावर त्यांची सही घ्यायचो, कारण सरांनी आम्हाला सांगितलं होतं की ते जेवढे देतील तेवढेच घ्यायचे. पण त्यामुळे नीरनिराळ्या घरांमध्ये जाण्याचा योग आला. नीरनिराळ्या जागा आम्ही स्वच्छ केल्या, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग होते, त्यात आम्ही हात घालायचो, आम्हाला पहिल्यांदा खूप घाण वाटायची, पण सरांनी आम्हाला सांगितले कि हात नंतर स्वच्छ धुवायचे पण आधी कचरा साफ करायचा. नंतर तर आम्ही गाणी तयार केली, आम्ही आणि सर ती गाणी म्हणत-म्हणत सर्व काम करायचो.

            हे सगळ करताना आम्हाला असा लक्षात आलं की ही कामं करताना किती ‘चांगल’ वाटत होत आणि ही कामं तर आपली आई दररोज करत असते आणि आपण मात्र कधीच ही कामे आपल्या घरी करत नाही. त्यानंतर मला स्वत:ला माझ्या आचरणामध्ये खूप बदल जाणवून आला. मोठा झाल्यावर ज्यावेळेला आपली संस्था (MKCL) चालू केली त्या वेळी माझ्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे सकाळी मीच माझ्या ऑफिस मध्ये झाडू मारायचो आणि मग लॅपटॉप उघडून बसायचो. तेव्हा ते सगळ साफ करताना मला काहीच नाही वाटायच, नाहीतर माझा अहंकार जागृत झाला असता. त्यामुळे मला सगळीच कामं मनापासून करायची सवय लागली.”