Wednesday 30 September 2015

रोल प्ले


रोल प्ले म्हणजे काय?
दिलेल्या परिस्थितीत विविध पात्रे कसा विचार करतील, कसे वागतील, कसे बोलतील याच्या अगणित शक्यता असू शकतात. त्या समजून घेऊन त्याप्रमाणे नेमकी भूमिका वठवणे म्हणजे रोल प्ले.

उद्देश
एकाच परिस्थितीमध्ये वेगवेगळी माणसे वेगवेगळे वागतात. ती तसे का वागत असावीत हे समजून घेणे, ती अधिक चांगले कसे वागू शकली असती हे समजून घेणे.

उदा.
दिलेली परिस्थिती – दोन तीन मित्र एकत्र जमून एका मित्राच्या घरी खेळत असतात. त्यातील एकाचा धक्का लागून नकळत शाईची दौत फरशीवर पडते व फुटते. सर्व शाई फरशीवर सांडली आहे.
आता ही घटना आपल्या गटातील काही मुलांनी उभी करायची आहे. समजा गटातील रमेश, सागर आणि नेहा यांना हा रोल प्ले करायचा आहे.

या परिस्थितीमध्ये हे तिघे काय काय वागू शकतील याच्या खूप शक्यता आहेत. त्यापैकी नेमके काय वागायचे हे त्यांचे प्रत्येकाचे स्वातंत्र्य आहे. पण गोंधळ होऊ नये म्हणून हे तिघे बाजूला जातील व ५ मिनिटे चर्चा करतील व नेमके काय नाट्य उभे करायचे आहे हे ठरवतील. व त्यानंतर आपले नाटुकले सादर करतील. या घटनेमध्ये काय काय शक्यता असू शकतात आपण पाहू
1.     रमेश कडून दौत फुटली आहे म्हणून सागर व नेहा त्याला वाईट ठरवतील व निघून जातील.
2.     रमेश कडून दौत फुटली आहे, म्हणून रमेश रडू लागतो. नेहा तिच्या बाबांकडे तक्रार करायला निघून जाते. सागर रमेशला शांत करायचा प्रयत्न करतो.
3.     रमेश कडून दौत फुटली आहे पण त्याला धक्का सागरने दिला होता, म्हणून दोघे पण भांडत बसतात. नेहा डोके धरून बसते.
4.     रमेश कडून दौत फुटली आहे, तो पळून जातो, नेहा आणि सागर फारशी पुसून घेतात.
5.     रमेश कडून दौत फुटली आहे पण तो नेहावर आरोप करतो. म्हणून सागर त्याला मारतो. ई.

अशा प्रकारच्या अगणित शक्यता असू शकतात. त्यापैकी एका पद्धतीने हे तिघे वागतील व बाकी सर्वांसमोर हे छोटे नाटक सादर करतील.
त्यानंतर गटातील सर्वांनी मिळून चर्चा करावी की वरील परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने हे तिघे वागले, ते तसे का वागले असतील, त्यापेक्षा वेगळे वागता आले असते का, त्याने काय काय फरक पडला असता. या रोल प्ले मधून काय शिकायला मिळाले. ई.

नियम –
1.     रोल प्ले करताना प्रत्येकाने अगदी आदर्श वा पुस्तकी अजिबात वागू/बोलू नये.
2.     दिलेली घटना जर खरेच घडली असती तर सामान्य व्यक्ती जसे बोलतात, वागतात त्याप्रमाणेच नाटक करायला हवे. (त्या परिस्थितीत अधिक चांगले कसे वागता आले असते याची चर्चा सगळे मिळून नाटका नंतर करायची आहे)
3.     आपल्या भूमिकेशी प्रत्येकाने प्रामाणिक रहायला हवे.
4.     आपण पाहिलेले लोक, त्यांच्या सवयी, बोलणे, वागणे यांचा योग्य जागी सुरेख वापर करावा.
5.     सर्वात महत्वाचे - आपले नाटक बघणाऱ्या इतरांना कंटाळवाणे होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यात जरूर विनोद, गाणी, कृतीचा समावेश करावा.
6.     कमीत कमी वेळात रोल प्ले ची तयारी झाली पाहिजे.
7.     आपण नेमका कसला अभिनय करतोय, रोल प्ले चा विषय काय आहे हे इतर सर्वांना नाटकातूनच कळायला हवे, किमान इतके संवाद वापरावेतच.

सरावासाठी विषय (हे विषय तुम्ही हवे तसे बदलू शकता व नवीन विषय शोधू शकता; तसेच खरोखर घडलेल्या, पाहिलेल्या घटना विषय म्हणून घेता येतील)

1.     ३-४ मित्र खेळत असतात. त्यातील दोघांचे कशावरून तरी भांडण होते. त्यांचा अबोला होतो.
2.     वर्गातील आपल्या एका मित्राला इतर मुले चिडवत आहेत.
3.     शाळेत जाताना ३-४ मित्रांना लक्षात येतं की मारकुट्या शिक्षकांनी दिलेला गृहपाठ त्यांनी केलेला नाहीये.
4.     एका घरात दोन भावंडांमध्ये बहिणीला सर्व कामे सांगितली जातात व भाऊ फक्त खेळत असतो.
5.     एका घरात बाबा तंबाखू खात आहेत, त्यांचा मुलगा/मुलगी त्याचे मित्र अभ्यासासाठी घरी आलेले आहेत.
6.     शाळेत पाणी प्यायला गेल्यावर एका मित्राने पाण्याचा नळ चालूच ठेवला आहे.

7.     आपली आई आजारी आहे व लहान बहिण तिला त्रास देत आहे, हट्ट करत आहे.

No comments:

Post a Comment