Monday 31 August 2015

उल्लेखनीय कृती

जळगावच्या कुमार निर्माण गटाची औरंगाबाद ट्रीप!!!
काही महिन्यांपूर्वी झालेल्या मीटिंगमध्ये माझा परिसर या विषयावर गप्पा झाल्या होत्या, त्यातल्या आवडत्या/नावडत्या गोष्टींवर देखील मुलांनी मोकळेपणाने चर्चा केली होती. परिसरातील अस्वच्छता आवडत नाही यावर सगळ्यांचेच एक मत होते. मग परिसर घाण कोण यावर बोलत असताना सुरुवातील आपल्या आजूबाजूचे लोक घाण करतात इथून मग शेवटी आपण स्वतः देखील तर घाण करतो हे सगळ्यांनीच मान्य केले. यानंतर सगळ्यांनी रस्त्यावर घाण टाकायची नाही, आपल घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा अस ठरल.


ऑगस्ट महिन्यात २२ आणि २३ तारखेला आम्ही (मी, हर्शल, टीना, निलोफर, अनिता, सुनिता आणि लक्ष्मी) सगळे औरंगाबाद ट्रीपला गेलो. बीबी-का-मकबरा परिसरात फिरत असताना तिथली स्वच्छता सगळ्यांनाच आवडली पण आमच्या समोरच एका बऱ्यापैकी वयस्कर जोडप्याने स्वताकडील तिकिटे फाडून हवेत भिरकावली आणि पुढे चालायला लागली. हे पाहून मुले लगेच त्यांच्या जवळ गेली आणि कचरा करू नका, इथे घाण का केलीत?” असे विचारले आणि त्यांच्या उत्तराची वाट न पाहता तिथली घाण गोळा करायला लागली. तिथेच एक महिला स्वच्छता कर्मचारी होत्या त्यांना वाटले मुलांनीच घाण केली म्हणून त्या मुलांना ओरडायला लागल्या त्यावेळी, मुलांनी नाही मोठ्यांनी घाण केलीये आणि मुल ती आवरतायेत असे सांगितल्यावर त्यांनी त्या वयस्कर जोडप्याला पुढे जाऊन गाठले आणि बरेच ओरडले.

दौलताबाद किल्यावर देखील मुलांनी पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या उचलून एका बाजूला रचल्या. किल्ल्याच्या भिंतीवर लोकांनी स्वताची लिहिलेली नाव पाहून मुलांना खूप वाईट वाटले. इतक्या चांगल्या आणि जुन्या इमारतींवर लोक स्वताची नाव लिहून घाण का करतात? आपल्या इमारतींची काळजी आपणच घ्यायला हवी हवे त्यांचे मत होते.

संपूर्ण प्रवासात कचरा करू नका अश्या कोणत्याही सूचना दिलेल्या नसतानादेखील मुलांनी स्वताच्या मनानेच कोठेही घाण केली नाही. स्वताजवळचा कचरा एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकत होती आणि कचरा पेटी दिसली कि त्यात ती पिशवी रिकामी करत होती.

पहिल्यांदाच जळगावच्या बाहेर पडलेल्या या मुलांनी पहिल्यांना परदेशी लोकांना बघितले पण हुल्लडबाजी किंवा चिडवाचिडवी केली नाही. उलट मला त्यांच्याशी बोलायला सांगितले, त्या लोकांनी आमच्या सोबत फोटो काढल्यावर आपल्याकडेपण आठवण पाहिजे म्हणून आमच्या कॅमेऱ्यात पण फोटो काढून घेतले. 

अनेकदा ट्रीपला गेल्यावर शिक्षक मुलांवर विश्वास न ठेवता उगीचच त्यांना सतत सूचना देत राहतात पण तसे न करत मुलांवर जर विश्वास टाकला तर मुले अजिबात गोंधळ करत नाहीत, त्रास देत नाहीत, चुकीचे वागत नाहीत आणि आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेत ट्रीपचा मनमुराद आनंद लुटतात.

-    गट निमंत्रक अद्वैत दंडवते (९८९०३३६०७०)

No comments:

Post a Comment