Saturday 31 October 2015

मुलांच्या लेखणीतून

१. Indian Knowledge Group ने साजरा केला ‘मैत्रीदिन’!
आज आम्ही Indian Knowledge Group च्या वतीने Friendship Day साजरा करण्याचे ठरवले, त्या निमित्ताने आम्ही गटात वादविवाद स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेचा विषय असा होता की, मैत्रीदिन फक्त एकाच दिवशी साजरा करावा की ३६५ दिवस? या स्पर्धेमध्ये २ गट पाडण्यात आले व त्यांच्यामध्ये वादविवाद स्पर्धा सुरु झाली. दोन्ही गटांमधील मुलांनी आपापले विचार मांडले. तसेच त्या मैत्रीदिनाच्या दिवशी काही विद्यार्थ्यांनी त्या दिवशीचे त्यांचे अनुभव सांगितले. त्यातला एक अनुभव म्हणजे, त्या दिवशी तनय, तुषार आणि अजिंक्य या तिघांनी एका मुकबधीर मुलाला मदत करून खरा मैत्रीदिन साजरा केला. तो मुकबधीर मुलगा अजिंक्यच्या घराच्या सावलीत थकून पडला होता. आम्ही तेथून चाललो होतो तेवढ्यात आमची नजर त्याच्याकडे गेली. आम्ही त्याच्या जवळ जाऊन त्याला बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला बोलता येत नव्हते.
मग आम्ही त्याच्या हातात मैत्रीधागा बांधण्याचा प्रयत्न केला पण त्यानी तो मैत्रीधागा बांधू दिला नाही. त्याला वाटलं की हे मला काहीतरी इजा पोचवत आहेत. तो आम्हाला हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याला सांगायचे होते की माझे पाय खूप दुखत आहेत, मला खूप भूक लागली आहे. तो दमला होता. त्याच्या हातात एक भंगार गोळा करण्याची पिशवी होती.
नंतर आम्ही त्याला थोडी भाजी-भाकर दिली, तसेच त्याला जाण्यासाठी थोडेसे पैसे दिले. नंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावर समाधान पाहून आम्हाला खूप आनंद झाला. नंतर तो मुलगा तेथून निघून गेला.
हा प्रसंग आम्ही वादविवाद स्पर्धा संपल्यानंतर सर्वांना सांगितला. सर्व जणांनी खूप टाळ्या वाजवल्या. तसेच आमच्या गटाचे निमंत्रक बाबा आहेत त्यांनीपण आमचे खूप कौतुक केले. अशा प्रकारे आमच्या मैत्रीदिन व वादविवाद स्पर्धा अगदी आनंदात पडली व नंतर आम्ही सर्वजण घरी गेलो.
Indian - Knowledge Group, अंबेजोगाई
गट निमंत्रक: चंद्रकांत वडमारे (९४२३३५२६४१)
२. जाणीव गटाला झाली जाणीव!
काल साजरा करण्यात आलेल्या विजयादशमीच्या सणानंतर आज आम्ही शाळेत आल्यावर सर्वजण एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देत होतो. आमच्या शाळेजवळच आपट्याचे झाड आहे. शाळेत सर्व मुलांनी भरपूर पाने आणली होती. ते एकमेकांना वाटल्यानंतर काही वेळातच ही पाने इकडे-तिकडे पहावयास मिळाली. मग सरांनी विचारले की, “या पानांचं आता करायचं? त्या झाडावर तर आता एकपण पण नाही राहिलंय?” यानंतर आम्ही सर्वांनी विचार केला की शुभेच्छा सोबत दिलेल्या पानांचा नंतर काहीही उपयोग झाला नाही पण तीच पाने झाडाला राहिली असती तर त्यांचा झाडाला उपयोग झाला असता. पर्यायाने आम्ही सर्वांनी त्या झाडाच्या अन्न प्रक्रियेमध्ये अडथळा आणून त्याचे मोठे नुकसान केले. 
याचा विचार करता आम्ही ठरवले की कोणत्याही झाडांची पाने तोडायची नाही आणि इतरांना तोडू देणार नाही. मग आम्ही सर्व वर्गातली पाने जमा केली. शेवटी आम्ही विचार केला की आता ही तोडलेली पाने तर आपण परत झाडाला चिकटवू शकत नाही मग शेवटी आम्ही ठरवले की या जमा झालेल्या पानांचा उपयोग पुन्हा त्या झाडाला व्हावा म्हणून त्या झाडाखाली खड्डा करून त्यात ती पाने पुरून टाकली, जेणे करून त्या झाडाला त्याचे खत म्हणून उपयोग होईल.
जाणीव संघ, बीड
गट निमंत्रक: सचिन महामुनी (८२७५२६८५२४)

३. हिरवळ सृष्टी गटाची क्षेत्रभेट
बोरसला नातू काकांच्या शेतात जायचे असे बरेच दिवस ठरवून जायचे, पण काही ना कारणांनी तो बेत रद्द होत होता. थोड्या दिवसांपासून तीव्रतेने यावर बोलणे चालू होते. त्यात आमच्यातीलच एक स्नेहल स्वतः नातू काकांच्या घरी जाऊन त्यांची परवानगी घेऊन आली. त्यानंतर तिथे कधी जायचे?, कसे जायचे? किती वेळ थांबायचे? असे अनेक प्रश्न आमच्या समोर आले. त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही सभा घेतल्या. त्यात असे मत मांडण्यात आले की रेल्वेने बोरस स्टेशनपर्यंत जायचे, त्याने पैसे आणि वेळ दोघेही वाचतील. पण रेल्वेने गेल्याने तिथे थांबायचा वेळ रेल्वेवर होता आणि रेल्वेस्टेशनवर जायचा आणि तिथून यायचा खर्च वेगळा होता म्हणून रिक्षाने जायचे असे ठरवले गेले. त्यानंतर तिथे किती वेळ थांबायचे? हा देखील एक महत्वाचा विषय होता. तिथे नुसता फेरफटका न मारता जास्तीत जास्त माहिती मिळवून मजा करून यावी, एवढा पुरेसा वेळ हवा म्हणून ३ ते ४ तास हा वेळ निश्चित करण्यात आला. डबाही सोबत घ्यावा असे सर्वांचे मत पडले. सर्वात महत्वाचे म्हणजे कधी जायचे? कोणाची न कोणाची काही न काही अडचण होती. शेवटी सर्वानुमते २ ऑक्टोबर ही तारीख ठरवण्यात आली. आमच्यातीलच एकाने रिक्षाचा तपास करून ती अडचण सोडवली. एकदाचा दिवस उजाडला.

आम्ही सर्वजण ठरल्याप्रमाणे सरांच्या घरी जमलो. रिक्षात बसलो. जाताना उत्साहाने भरून आतुरतेने बोरसची वाट पाहत होतो. तेथे पोचल्यावर शेतापर्यंत आम्ही चालत गेलो. नातू काका तेथे आले. त्यांनी प्रथम आम्हाला एका वनस्पतीचे नाव विचारले. आमच्यापैकी कुणालाही त्याचे नाव माहित नव्हते. ती तरोट्याची वनस्पती होती. तेथे अंकुश काकांनी आम्हाला बेहडा, शतावरी ई. झाडे दाखवली. नंतर आम्ही सर्वांनी तिथे झाडाच्या सावलीत डबा खाल्ला.
नंतर आम्ही पुढच्या शेतात चालू असणारी बाजरी कणसापासून वेगळी करण्याची क्रिया पहिली. नंतर परत शेतात जाऊन काहीतरी खेळायचे असे ठरवले. तेव्हा कोणीतरी झाडावर चढले मग आम्ही सर्वांनी तसा प्रयत्न केला व आम्ही चढलो. तेथे एक मोठा खड्डा होता, त्यात आम्ही पकडापकडी खेळलो. सरही आमच्या बरोबर होते. एवढेच नव्हे तर तेथील ३ मुलेही आमच्यात खेळली. मग घरी येण्याची वेळ झाली, आम्हाला घरी यायला १ वाजला. आम्हाला खूप मज्जा आली.
मृणाल शिंपी
हिरवळ श्रुष्टी गट, चाळीसगाव
गट निमंत्रक: सचिन पाखले, (९२७०१६१३५२)

४. आधुनिक  रावण
दि. २२/१०/१५ रोजी दसऱ्यानिमित्त वेगळा उपक्रम करायचे असे जागृती गटाच्या १६ तारखेच्या बैठकीत निर्णय झाला. दसरा साजरा करायचा पण तो कसा? हा प्रश्न सर्वांना पडला. प्रत्येक मुलाकडे जबाबदारी देऊन काम करायचे हे ठरले. जबाबदाऱ्या अशा की, रावण बनवणे, राम-लक्ष्मण, सीता, हनुमान यांची सजावट करणे, गदा बनवणे, स्वरचित घोषणांचे चार्ट बनवणे, इ. जबाबदाऱ्या गटातील मुलांकडे गट करून देण्यात आल्या. दसऱ्याच्या आदल्या दिवशी गटातील सर्व मुले उद्याच्या शोभायात्रेचे आमंत्रण देण्यासाठी डोमरी गावात गेली. सर्व लोकांनी मुलांना चांगला प्रतिसाद दिला.

शोभायात्रेचा आमचा खरा उद्देश हाच की, लोकांमधील रावणाचं प्रतिबिंब त्यांना लक्षात आणून देणं, लोकांमधील दुर्गुण त्यांना लक्षात आणून देणं. दुर्गुण म्हणजे इच्छा, आळस, भ्रष्टाचार, स्त्रीभ्रूणहत्या असे हे दहा दुर्गुण रावणाच्या दहा तोंडाला लावण्यात आले. या कार्यक्रमाची तयारी आम्ही दहा दिवस आधीच सुरू केली होती. हा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरा न करता आधुनिक पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला. रावणाची प्रतिकृती गटातील दोघांनी हाताने चित्ररुपात बनवली होती. रावणाच्या हातात बंदूक दाखवली होती, रावणाला सिक्स पॅक दाखवले होते, डोक्याला गुंडासारखी टोपी दाखवली होती, अशा प्रकारे हा आधुनिक रावण होता. संपूर्ण रॅलीत गुरुकुलातील सर्व विद्यार्थी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. निसर्गाची हानी थांबवण्यासाठी हा एक प्रयोग केला की, कोणीही पारंपारिक आपट्याचा सोनं म्हणून वापर केला नाही. गटातील विद्यार्थ्यांनी स्वरचित घोषणांचे चार्ट बनवले होते. त्या चार्टमुळे शोभायात्रेची आणखी शोभा वाढली. रावण जाळल्यानंतर राहिलेला कचरा सुद्धा गटातील विद्यार्थ्यांनी अपेक्षित जागी टाकला. कार्यक्रम संपल्यानंतर गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत होता. या उपक्रमात भरपूर अनुभव व आनंद मिळाला.
जागृती गट, डोमरी
गट निमंत्रक: रज्जाक पठाण (९४२२७१२४४६)
५. पक्षी आपले मित्र
एके दिवशी मी आमच्या अंगणात जवळ बसलो होतो. मला एक चिमणी दिसली. तिच्याकडे बघून मग माझ्या मनात एक विचार आला. तो विचार असा की मी त्या चिमणीला काही जेवायला दयावं असं मला वाटलं. तर मी घरातले काही तांदूळ अंगणात टाकले तर त्या चिमणीला वाटले की मी जर जवळ गेली तर हा मुलगा मला पकडून घेईल पण मी त्या चिमणीला पकडणार नव्हता. तर  मी आमच्या घरात गेलो तर ती चिमणी आरोळ्या मारायला लागली तर तिच्याजवळ खूप साऱ्या तिच्या मैत्रिणी आल्या.
तिने सगळ्यांना बोलवून सांगितले की तिथे तांदूळ आहेत तर आपण ते तांदूळ आपल्या पिल्लांना देऊ व आपल्या पिल्लांचे पोट भरू. तर मी घरात गेलो नव्हतो, मी आमच्या खिडकीमधून पहातच होतो. तर ती चिमणी व तिच्या मैत्रिणी एक किंवा एक - दोन दाणे तोंडात पकडून त्यांच्या घरट्यात नेत जायचे. असे तर ते सगळे तांदूळ संपत होते त्यामुळे मी काही अजून तांदूळ घेतले व तिथे टाकले. पण काय? जवळ जाताच सगळे भुर्रकन उडून जायचे आणि मी लगेच घरात निघायचो. आमच्या खिडकीतून त्यांना बघायचो तर ते थोड्या वेळात परत यायचे व दाणे आपल्या घरट्यात ठेवायचे तर असे मी त्या चिमण्यांना खायला दयायचो.
मेहुल प्रमोद पाटील, एरंडोल

निमंत्रक: मल्लिका शेख (८८५७९६१६२८)

No comments:

Post a Comment