Saturday 31 October 2015

कुमार गीत

मंदिरात वसतोस...


मंदिरात वसतोस का मशिदीत राहतोस
अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस
मंदिरात वसतोस...

सूर्य उगवे पूर्वेला मी अर्घ्य तुला देतो ...२
मावळताना पश्चिमेस मी नमाज ही पढतो
हिमालयाच्या शिखरामध्ये साद तुला देतो
सागरातल्या लाटांमध्ये भास तुझा होतो

कधी न दिसशी सामोरी कुठे दडलेला असतोस
अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस
मंदिरात वसतोस...

मक्केला जाताना माझ्या पाठीशी तूच
पंढरपूरच्या वाटे माझ्या पायी तुझा नाच
तूच इथे अन तूच तिथे मग प्रश्न पुन्हा तोच
का झगडा हा का ही चाले अशी रस्सीखेच
सोडव यातून देना उत्तर गप्प काय बसतोस
अल्ला तुझे नाव खरे का राम कधी असतोस
मंदिरात वसतोस...

मनामनांची क्षणाक्षणाला ओळख जी पटते
कणाकणातुनी साऱ्यांच्या जे सदा नित्य वाहते

एकच उत्तर गमते आम्हा नाही दुजे अन्य
रक्तामधुनी धमन्यांमधुनी एकाच चैतन्य
कळले आम्हा मर्म आता मग इथे काय करतोस
का एकाला दुसऱ्यापासून दूर दूर नेतोस
मग दूर दूर नेतोस...


कवी: पवन खेबुडकर, कोल्हापूर

(या गीताची चाल ऐकण्यासाठी खालील व्हिडीओ पहा)


No comments:

Post a Comment