Monday 30 November 2015

गोष्ट

बनीची दिवाळी

एके दिवशी सकाळी आमच्या अंगणात वासुदेव आला. डोक्यावर मोरपिसांची टोपी, अंगात एक लांब पायघोळ अंगरखा, खांद्यावर रंगबेरंगी फाटकी चिरगुटे आणि पायात एक फटका जोडा, असा त्याचा थाट होता. एका हाताने टाळ वाजवीत तो गात होता..

“पंढरीच्या विठोबाला

आळंदीच्या ज्ञानोबाला

जेजुरीच्या खंडोबाला

माझे नमन हो...”

वासुदेवाला पाहताच आमची बनी फार बावरली. ती पळत पळत मजजवळ आली आणि माझ्या अंगाला बिलगून म्हणाली, “ दादा, मला किनई त्या बुवाचं भय वाटतं.”

मी हसून तिला म्हणालो, “बने, तो वासुदेव आहे. अगं , तो काही करत नाही.”

बनीचा भित्रा चेहरा पाहून वासुदेवाला गंमत वाटली. त्याने आपल्या टोपीतील एक मोराचे पीस काढून बनीच्या पुढे केले. बनीचे भय नाहीसे झाले, ती खुदकन हसली, आणि पळत पळत तिने वासुदेवाच्या हातातील मोरपीस घेतले.

त्या दिवसापासून बनीची वासुदेवाशी अगदी गट्टी जमली. वासुदेव रोज सकाळी आमच्या दारी येई. बनीदेखील त्याची वाट पाहत ओटीवर बसे. त्याला यायला उशीर झाला की बनीला चुकल्याचुकल्यासारखे वाटे.

कधी कधी वासुदेव बनीला फुले घेऊन येई, कधी खायला बोरे आणून देई. यामुळे आम्हा सर्वांना तो फार आवडू लागला होता.

रोज नियमाने येणारा पुढे काही दिवसांनी येईनासा झाला. जवळ जवळ  महिनाभर तो कोठे गेला होता कुणास ठाऊक! 

पहिले चार आठ दिवस बनीला फार जड गेले, पण पुढे-पुढे  तिला त्याचा विसर पडला. मधून-मधून ती आईला विचारीत असे, “आई, वासुदेव आताशा का गं येत नाही?.”

पुढे दिवाळी जवळ आली. आम्ही सकाळी अंघोळ करून बसलो होतो. बनी आपल्या बाहुलीशी खेळत होती. इतक्यात वासुदेव टाळ वाजवीत व गात-गात अंगणात आला. त्याला पाहताच बनी तडक अंगणात धावत गेली व त्याच्या जवळ जाऊन लडिवाळपणे म्हणाली, “काय रे वासुदेव, तू इतके दिवस कुठे होतास? मी रोज तुझी किती वाट पाहत असे. पण तू काही आला नाहीस.”

वसुदेवाने हसल्यासारखे केले. तो बरेच दिवस आजारी असावा, असे त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होते.
“काय रे वासुदेव, तू आजारी-बिजारी तर नव्हतास?”

“होय, माझे बाई, मी फार आजारी होतो!” वासुदेव म्हणाला. बनीला फार वाईट वाटले. तिने विचारले, “वासुदेव, तुला औषध-पाणी कुणी दिले का रे? तुझे कुणी इथे आहे का?”

वासुदेवाच्या डोळ्यांत पाणी आले. त्याचा गळा भरून आला. तो म्हणाला,”बाई, मला गरिबाला औषध कोण देणार? मला एक मुलगी आहे तुमच्याएवढी अगदी थेट तुमच्यासारखी दिसते. तुम्हाला पाहिलं की मला तिची आठवण होते. पण ती लांब देशावर आहे, म्हणून मी रोज तुम्हाला भेटायला येतो.”

“पण मग वासुदेव, तू तिला इथं घेऊन का येत नाहीस? मी तिला माझा परकर देईन नेसायला, बाहुली देईन खेळायला आणि मी तिच्याबरोबर खूप खेळेन.”

वासुदेव म्हणाला, “मी तिला घेऊन आलो असतो इथं; पण देशावर जायला माझ्याजवळ पैसे कोठून असणार? होते तेवढे पैसे माझ्या आजारात संपून गेले.”

बनी तडक घरात गेली आणि बाबांना म्हणाली, “बाबा, वासुदेवाला मुलगी आणायला आपल्या गावी जायचं आहे. त्याला तुम्ही पैसे द्याल का?”

बाबा म्हणाले, “मी पैसे देईन. पण मग तुला या दिवाळीत फटाकडे आणि फुलबाजे नाही मिळायचे!”
बनी म्हणाली, “मला फटाकडे आणि फुलबाज्या नाही मिळाले तरी चालतील! मला आपले पैसेच द्या.”
बनीचे बोलणे ऐकून बाबांना फार कौतुक वाटले व त्यांनी तिला पैसे आणून दिले. वासुदेवाच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. तो आधी पैसे घेईना; पण बाबा म्हणाले, “वासुदेवा, नाही म्हणू नकोस. बनीने हे पैसे तुला दिले आहेत. तू आता देशावर जा. अजून दोन-तीन दिवस दिवाळीला अवकाश आहे. आपल्या मुलीला जाऊन भेट. ती बिचारी पोर तुझी वाट पाहत असेल. तुम्ही दोघे यंदाची दिवाळी आनंदाने घालवा.”
हाताच्या बाहीने डोळे पुशीत वसुदेवाने पैसे घेतले व तो निघून गेला. या दिवाळीत बनीने फटाकडे वाजविले नाहीत, फुलबाजे उडविले नाहीत; तरी पण इतक्या आनंदाची दिवाळी कधीच पहिली नव्हती


(आचार्य अत्रे लिखित फुले आणि मुले या पुस्तकातील गोष्टीवरून)

No comments:

Post a Comment