Wednesday 30 December 2015

कुमार गीत

युध्द म्हणजे

युध्द म्हणजे असते मनाचे गोठून जाणे
युध्द म्हणजे माया ममता आटून मिटून जाणे ||धृ||

युध्द म्हणजे, असते स्पर्धा, तू छोटा, मीच मोठा
माझे ते माझे, तुझेही माझे, आम्ही मालक, आम्हीच राजे
बलवानांनी लहान्या सहान्यांची स्वप्ने उधळून देणे ||||

युध्द म्हणजे हैवान आहे, सत्तेचा हा उन्माद आहे
शस्त्रास्त्रांचा बाजार आणि अत्याचाराचे थैमान आहे
संस्कृतीला माणुसकीला हरवून विसरून जाणे ||||

युद्धामध्ये रक्त वाहते, देशासाठी बलिदान ठरते
सरणावरती प्रेत जळते, बाकी केवळ शून्य उरते
घराघरांतून हुंदक्याचे सूर उदासवाणे ||||

युध्द म्हणजे केवळ धोका, काळजाचा चुकतो ठोका
सावध ऐका पुढल्या हाका, चालू न देऊ कुणाचा हेका
नव्या जगाचे सुखशांतीचे, गाऊ मिळून गाणे ||||


(या गीताची चाल ऐकण्यासाठी खालील व्हिडीओ पहा)

No comments:

Post a Comment