Wednesday 30 December 2015

शिक्षणाची रचनावादी विचारसरणी व रचनात्मक शिक्षणप्रक्रिया

जन्मल्यापासून अखेरच्या क्षणापर्यंत आपण सतत काही ना काही अनुभव घेत असतो. या अनुभवांचा जो काही अर्थ आपण स्वतः लावतो त्याची प्रतिमा मेंदूमध्ये तयार होत जाते, वेळप्रसंगी ती बदलतही जाते. आकलनवादी विचारसरणीतून आलेल्या या ‘घटने’च्या सहाय्याने आपण रचनावादी व्याख्या करू शकतो.

आपण आपल्या अनुभवांना सामोरे जाऊन, त्यांच्या आशयांना प्रतिमांकित करून घेऊन, आपण जगत असलेले विश्व स्वतः समजावून घेत असतो; या भूमिकेवर आधारलेले असे शिक्षणाचे तत्त्वज्ञान म्हणजे ‘रचनावाद’ होय.

वेगळ्या शब्दांत मांडायचे तर, मनुष्य आपल्या अनुभवांद्वारे स्वतःच्या ज्ञानाची रचना करीत असतो. मनुष्य शिकत जातो याचा अर्थ, तो नवनव्या अनुभवांच्या आशयांशी आपल्या अस्तित्वात असलेल्या मानस प्रतिमांची जुळवणूक करत जातो. थोडक्यात, नव्या अनुभवांचा आशय आपल्या आधीच्या मानस प्रतिमांशी जुळवणारी प्रक्रिया महणजे शिकण्याची प्रक्रिया किंवा शिकणे अशी ‘शिकण्या’ची व्याख्या करता येईल. आपण नवीन गोष्ट शिकतो तेव्हा आपल्या आधीच्या मानस प्रतिमांमध्ये बदल होऊन त्यांची संरचनाच बदलते, सुधारते किंवा विस्तारते (बिघडते किंवा संकोच पावतेही) याचाच अर्थ असा की, ज्याला आपण ‘शिकणे’ असे म्हणतो त्याने सुधारित मानस प्रतिमांची निर्मिती होत असते; नवी रचना होत असते. याठिकाणी, अर्थातच, शिकणे याचा व्यवहारातील अर्थ एखादी गोष्ट समजावून घेणे, किंवा त्यातून आपली ‘समज’ (understanding) वाढणे, असा होतो; मग ही समज, नवीन संकल्पनांविषयीची असेल, त्यांच्या वापराविषयी असेल अथवा अनेक घटकांमधील परस्परसंबंधांबाबतची असेल. म्हणजे असेही म्हणता येईल की, ‘शिकण्या’चे अंतिम पर्यावसान समजवृद्धी हेच असते.

‘समजवृद्धी’ असा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा साहजिकच आधीची काही एक ‘समज’ आपण गृहीत धरत असतो. ती अर्थातच आधीच्या किंवा पूर्वीच्या शिकण्यातूनच निर्माण झालेली असते. कोणत्याची स्तरावरचे विद्यार्थी जेव्हा आपल्या वर्गात येतात तेव्हा त्यातील प्रत्येक जण अशी आधीची समज घेऊन आलेला असतो, त्याची काही मते असतात, दृष्टीकोण असतात, त्याच्या काही श्रद्धा असतात, विश्वास असतात, काही विचार असतात, काही कौशल्ये असतात, मनात काही प्रश्न असतात आणि दैनंदिन जीवनांत काही समस्याही असतात. या सर्व ‘पूर्वतयारी’निशी विद्यार्थी नव्या शिकण्याच्या अनुभवांना समोरा जात असतो, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी.

नवी समज, नव्या धारणा, नवी ज्ञानरचना तयार व्हायची असेल तर पुढील ३ गोष्टींचा समन्वय व्हावा लागतो.
१.       पूर्वज्ञान (prior learning)
२.      नवी माहिती – नवा अनुभव (New information- New experience)
३.      शिकण्याची तयारी (Readiness to learn)
रचनावादी शिक्षणप्रक्रिया या ३ गोष्टींच्या आधारे सिध्द होत असते



अशा प्रकारची, विद्यार्थ्याची ज्ञानप्रक्रिया घडून यायची असेल तर, वैयक्तिकरित्या त्यासाठी लागणारा पुरेसा वेळ, क्रिया-प्रतिक्रियांसाठी लागणारा अवकाश आणि त्याचबरोबर ताबडतोबीच्या प्रत्याभरणाची संधी (opportunity for immediate feedback) या गोष्टी, रचनावादी व्यवहारात, आवश्यक मानल्या आहेत.
पूर्वज्ञान, नवी माहिती – नवा अनुभव, आणि शिकण्याची तयारी या ३ गोष्टींनी शिकण्याची प्रक्रिया घडून येते, असे रचनावादी विचासरणीचे प्रतिपादन आहे.

विद्यार्थ्यांच्या स्तरावरील रचनात्मक शिक्षणप्रक्रिया
शिक्षणाच्या प्रक्रीयेतील या तीनही घटकांचे स्वरूप समजावून घेणे आवश्यक आहे.



१.       पूर्वज्ञान
पूर्वज्ञान असे म्हणताना विद्यार्थ्याच्या संदर्भात त्याचा पूर्वज्ञानाचा स्तर आपण विचारात घेत असतो. त्याचे स्थूल मूल्यमापन होणे आपल्याला अभिप्रेत असते. शिक्षणाची प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असते, त्यामुळे या संदर्भात पूर्वज्ञान या संज्ञेचा अर्थ; शिकण्याच्या सातत्यपूर्ण प्रक्रियेत, विशिष्ठ नवीन घटक शिकू पाहत असताना, त्या संदर्भातील आधीची पायरी माहीत करून घेणे, असा होतो. पूर्वज्ञान ही संज्ञा अधिक खोलवर जाऊन अधिक व्यापक करता येईल. व्यक्तीच्या ज्ञानाची विशिष्ठ वेळची, विशिष्ठ क्षणाची अवस्था ही तिच्या तोवरच्या अनुभवांनी, अनुभवांकडे तिने ज्या दृष्टीकोणातून पाहिले त्या दृष्टीकोणाने आणि त्या अनुभवांचा तिने शोधलेला अर्थ-आशय व त्यातून तिच्या ‘समजे’ची घडण या सर्वांचा परिपाक असतो. या साऱ्यांतून घडलेले व्यक्तिमत्वच आपल्या समोर येत असते.

व्यक्तीच्या या साऱ्या अंतर्गत प्रक्रीयांबरोबरच, तिच्या बाह्य जगाच्या संपर्कातून, म्हणजे विविध व्यक्ती, वस्तू, घटनांच्या क्रिया-प्रक्रियांतून आणि सामाजिक संकेत, परिस्थिती आणि सांस्कृतिक वारशातून प्राप्त झालेल्या संचिताचाही सहभाग, व्यक्तीच्या घडणीत असतो. त्यामुळे शिक्षणात शिकणाऱ्याची व्यक्तीगतता नि तिची सामाजिकता या दोन्ही घटकांना अलबत स्थान प्राप्त होते.

२.       नवी माहिती - नवे अनुभव
याचा शब्दशः अर्थ असा की, जी माहिती आजवर अनुभवली नव्हती अशी माहिती किंवा जो अनुभव आजवर घेतला नव्हता असा अनुभव. त्यामुळे या घटकांची ‘नवीनता’ हेच त्यांचे वैशिष्टय आहे. किंवा शैक्षणिक परिभाषेत बोलायचे झाले तर ते त्याचे आव्हानात्मक रूप आहे. ही नवी माहिती कशा स्वरुपात विद्यार्थ्यासमोर येते, यालाही महत्व आहे. पुस्तकांकरवी, व्याख्यानाकरवी, दृश्य स्वरुपात अशा वेगवेगळ्या स्वरुपात येणारी माहिती हे वेगवेगळ्या संवेदना जागृत करीत असते. विद्यार्थी त्याचे वेगवेगळ्या प्रकारे स्वागत करीत असतो, आकलन करून देत असतो. एकाच वेळी अनुभवाला येणारी माहिती किती आहे, तिचे प्रमाणही विचारात घ्यावे लागते; आणि मुख्य म्हणजे ही माहिती कशा भाषेत येते हेही महत्वाचे असते. भाषेचे सहजपणे आकलन झाले पाहिजे. विद्यार्थ्याच्या दृष्टीने भाषा सोपी असली पाहिजे, तरच आशय चटकन, विनासायास विद्यार्थ्याला आकलन होतो. भाषा कठीण असेल तर आशय समजावून घेण्याच्या बाबतींतला तोच एक मोठा अडथळा ठरण्याची शक्यता असते. नेमकेपणाने सांगायचे तर, विशिष्टवेळी असलेला बालकाचा भाषेचा स्तर आणि माहितीच्या भाषेचा स्तर यांचाही मिलाफ होण्याची गरज असते. कित्येकदा भाषा, भाषेतील प्रतीके नि संकेत यांची पुरेशी जाण नसेल तर मिळालेल्या माहितीबाबतच्या भाषेच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांच्या आकलनात फरक पडू शकतो, हे अनेक संशोधकांनी दाखवून दिले आहे.

३.       शिकण्याची तयारी
विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रक्रियेतील आणखी एक महत्वाचा घटक असतो. तो त्याची स्वतःची शिकण्याची तयारी असणे हा होय. येथे ‘तयारी असणे’ याचा अर्थ, त्याला विशिष्ट शिक्षण घेण्याची सर्वसाधारण पात्रता असणे आणि त्याचबरोबर त्याची शिकण्याची इच्छा असणे. पात्रता नि इच्छा अशा दोन्ही गोष्टी असतील तर त्या विद्यार्थ्याबाबत आपण ‘शिकण्या’ची अपेक्षा करू शकतो. मुलाची शिकण्याची तयारी असणे ही प्राथमिक बाब आहे. ही तयारी असणे हे मुलाच्या इच्छेवर अवलंबून असते; आणि मुलाची शिकण्याची इच्छा कशा प्रकारे वाढवावी हा शिक्षणातील एक कळीचा प्रश्न आहे. या प्राथमिक स्वरूपाच्या प्रश्नाचे तेवढेच प्राथमिक स्तरावरचे उत्तर बृनर यांनी आपल्या ‘प्रोसेस ऑफ एज्युकेशन’ या ग्रंथाच्या प्रास्ताविकातच देऊन ठेवले आहे. जे काही शिकायचे म्हणून आहे त्याच्यात रस वाटणे हेच शिकण्यासाठीचे सर्वोत्तम उत्तेजन आहे; परीक्षेत गुण मिळणे किंवा भावी काळातील स्पर्धेला तोंड देण्याची तयारी होणे, ही बाह्य आकर्षणे विद्यार्थ्यांच्या बाबतीत फारसे काही साधत नाही. विद्यार्थी शिकण्याला उद्युक्त होणे महत्वाचे. त्यासाठी लागणारी प्रेरणा जेवढी नैसर्गिक-उपजत, तेवढीच ती बाह्य वातावरणाशी संबंधित असते. माणसाचा मेंदू हा त्याचा ‘शिकण्याचा अवयव’ आहे. त्यामुळे सतत शिकत राहणे हेच खरे तर त्याचे कायमस्वरूपी काम असते. सतत नवे काहीतरी शिकण्याची, आत्मसात करण्याची उर्मी माणसाला उपजतच असते. ती व्यवहारात उत्सुकतेचे, जिज्ञासेचे रूप घेऊन अवतरते. विद्यार्थ्याच्या शिक्षणात ही उत्सुकता-जिज्ञासा कशी मारली जाणार नाही, कशी टिकविली नि वाढविली जाईल यावर लक्ष देणे ही रचनात्मक शिक्षणाची एक आवश्यक अट आहे.

विद्यार्थ्याला शिकण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या काही बाबी या विद्यार्थीबाह्य पण, त्याचे मन प्रसन्न करू शकतील अशा आहेत.
उदाहरणार्थ, शाळा स्वच्छ, सुंदर असणे, आजूबाजूला भीतीचे, अवास्तव शिस्तीचे वातावरण नसणे, वयोमानाप्रमाणे शिकण्याच्या मुबलक संधी उपलब्ध होणे, अनेक साधने हाताळायला मिळणे, हालचालींचे मुक्त स्वातंत्र्य असणे, आवडीनुसार घटकनिवडीचे स्वातंत्र्य मिळणे, जास्तीत जास्त कर्मेंद्रियांचा नि ज्ञानेंद्रियांचा वापर करायला मिळणे, या आणि अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्याला शिकण्याकडे आकर्षित करीत असतात. मुलांना सतत नवनवीन आव्हाने घ्यायला आवडतात. प्रत्येक पायरीला अधिक गुंतागुंतीच्या अधिक कठीण अशा प्रश्नांना भिडायला विद्यर्थ्याना आवडत असते. ते त्यांना, त्यांच्या बुद्धीला आव्हान वाटत असते. नवनवीन आव्हाने पेलण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. अशा संधी त्यांना पुरवणे, त्यासाठी पुरेसा अवकाश देणे, मुक्त विचारांचे स्वातंत्र्य असणे यांमुळे विद्यार्थी वेगाने शिकत जातो. रचनात्मक शिक्षणाचा हा गाभा आहे.
 मा. रमेश पानसे

‘रचनावादी शिक्षण’ या पुस्तकातून साभार

No comments:

Post a Comment