Wednesday 30 December 2015

गोष्ट

एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भिती वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.


पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले नसावीत. यांस मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !


आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’


या गोष्टीतून काय काय अर्थ निघू शकतील व काय शिकता येईल, या गोष्टीला काय नाव देता येईल  यावर गटासोबत चर्चा करा व आम्हाला कळवा

No comments:

Post a Comment