Wednesday 30 December 2015

बैठक वृत्तांत - नेचर ग्रुप

गट निमंत्रकानी लिहिलेला बैठक वृतांत

दिवाळी नंतरची पहिली गटसभा घेतली. त्यात मुलांनी सांगितलेले त्यांचे अनुभव

मेहुल प्रमोद पाटील :- मेहुलने शपथ घेतली की तो फटाके फोडणार नाही व त्याने ती पाळली सुद्धा पण आपल्या लहान बहिणीचा मोह तो अवरु शकला नाही व तिने फटाके आणले. त्याने आपल्या मित्रानाही समजावून सांगितले; काही मित्रांनी त्याची गोष्ट मान्य केली व काहींनी दुर्लक्ष केलं.

प्रज्ञा ईश्वर पाटील :- प्रज्ञानेही शपथ पाळली व सभेत काय सांगितले हे आईला सांगितले तर ते आईला खूप आवडले. दुपारच्या वेळेस जेव्हा सगळ्या बायका जमल्या तेव्हा तिने फटाके फोडण्याचे काय दुष्परिणाम होतात ते पटवून सांगितले तर त्यांनाही त्या गोष्टीचे कौतुक वाटले व त्यांनीही आपल्या मुलांना त्याचे महत्व सांगितले व फटाके न घेऊन देण्याचा निर्णय घेतला. तिने फटाक्यांसाठी खर्च होणारे पैसे व तिला भेटणारे खाऊचे पैसे यांची बचत केली व ते पैसे  ती एखाद्या गरीब घराच्या मदतीसाठी वापरणार आहे.

प्रज्ञाला कुमार निर्माण च्या संकल्पना खूप आवडतात. तिला वाटतं की इथं खूप काही नवीन शिकायला मिळतं. तिने संकल्प घेतलाय की ती आता कधीही वायफळ खर्च करणार नाही. प्रज्ञाने मला विशेष करून थ्यांक्यू म्हटलं कारण तिला वाटलं की मला स्वतः ला विचार करायला लावणारे तुम्ही पहिलेच शिक्षक आहात.

हर्षल अरुण पाटील :- हर्षल जवळपास 3 – ४ गावांना गेला व त्याने आपले मत सगळ्यांसमोर मांडले, पण सगळे त्याला ‘आजोबा’ म्हणून हसले व विनोदामध्ये त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले व त्याच्याकडून जबरदस्तीने फटाके फोडून घेतले. आता तो पुढच्या वर्षी परत प्रयत्न करणार आहे.

जयेश गुरुदास पाटील :- जयेश ने स्वतः शपथ घेतली व ठरविल्या प्रमाणे त्याने आपल्या मित्रानाही त्याबद्दल समजविण्याचा प्रयत्न केला. पण ते त्याला हसले व म्हणाले की जर तुला दिवाळीची मज्जा करायची नसेल तर नको करू पण आम्ही तर करणार. त्याने खूप प्रयत्न केले पण त्याच्या मित्रांनी त्याचे ऐकले नाही.

सगळ्या मुलांसमोर मी ऑक्टोबर चा भरारी अंक वाचून दाखविला. मेहुल च्या लेखाचे सगळ्यांना खूप कौतुक वाटले. सगळ्यांनी त्याचे अभिनंदन केले व सांगितले की पुढच्यावेळेस आम्हीही असंच काहीतरी करू. मुलांना इंदापूरच्या ‘सक्षम गटा’ची कामगिरी खूप आवडली. ‘नव्या कोऱ्या कपाटाचं रहस्य’ ही गोष्ट तर खूपच आवडली. त्यांना छोट्या चंगूबंड्याचं खूप कौतुक वाटलं. तसेच त्यांनी अंकाच्या शेवटच्या पानावर दिलेल्या चित्रांबद्दल चर्चा केली . चर्चेत मी ऐकलं की मुलं बोलत होती की ही निसर्गाची फुफ्फुसं आहेत आणि जंगल तोड झाल्यामुळे त्याच एक फुफ्फुस खराब होत चाललंय आणि जर असंच होत राहीलं तर निसर्गाला आजार लागेल व तो मरून जाईल व निसर्ग मेला तर आपण पण जगू शकणार नाही.
या सगळ्या चर्चा झाल्यानंतर मी मुलांना out door खेळांबद्दल माहिती दिली व काही वेळ ते क्रिकेट व badminton खेळले व त्याचा आनंद घेतला. त्यांना सांगितले की विडीयो गेम व मोबाईल चे गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळांना मैदानी खेळांना महत्व द्या मैदानी खेळ आरोग्यासाठी चांगल राहील.
गटातल्या एका मुलाचा पाय fracture झाला असल्याने तो येऊ शकला नाही म्हणून मुलांनी चर्चा केली की ते बुधवारी किंवा गुरवारी त्याच्या घरी जाऊन त्याला भेट देतील.      

गट निमंत्रक: मल्लिका शेख, एरंडोल (९१५८५१४३२६)

No comments:

Post a Comment