Wednesday 30 December 2015

मुलांच्या लेखणीतून - जागृती गट


दिवाळीची सुट्टी होती. सर्वजण दिवाळीचा आनंद घेत होते, त्यामध्ये मी सुद्धा होतो. एके दिवशी माझी आई मला म्हणाली की शेजारच्या मोहरी या गावातील देवीला जाऊन ये.
नारळ, उदबत्ती घेऊन मी माझ्या दोन मित्रांसोबत सकाळी ९ च्या सुमारास निघालो. अर्ध्या तासात मी व माझे दोन मित्र सायकलवरून तिथे पोचलो. मंदिर डोंगरावर होते. वर जाण्यासाठी पायऱ्या होत्या. आम्ही पायऱ्या चढत होतो. तेव्हाच एका झाडाशेजारी एक चिमणी पाण्याअभावी तडफडत आहे असे माझ्या लक्षात आले.
त्या चिमणीकडे पाहून मला दु;ख वाटले. काहीतरी करावे असे वाटले. चिमणीला पाणी पाजावे असे वाटले परंतु आमच्याकडे पाणी नव्हते. तेव्हा मला एक युक्ती सुचली, ती म्हणजे नारळातील पाणी त्या चिमणीला पाजणे. माझी ही युक्ती मी माझ्या मित्रांना सांगितली परंतु मित्रांनी त्याला नकार दिला. ते म्हणाले, “आपण हे नारळ देवीसाठी आणला आहे, चिमणीसाठी नाही.” मी माझ्या मित्रांना समजावून सांगितले मग त्यांनी माझे ऐकले. आम्ही तो नारळ फोडला व त्यातले पाणी चिमणीला पाजले.

नंतर मी व माझे मित्र त्या चिमणीला घेऊन वर गेलो. तो फोडलेला नारळ देवीला ठेवला आणि त्या चिमणीला गार सावलीत ठेवले. खूप वेळ आम्ही तिथेच बसलो. नंतर थोड्यावेळाने ती चिमणी हळूहळू चालायला लागली. ते पाहून मला व माझ्या मित्रांना खूप आनंद झाला तो म्हणजे त्या चिमणीचा जीव वाचवल्याचा.
म्हणजेच एका नारळाने दोन कामे केली; एक चिमणीचा जीव वाचवण्याचे व दुसरे देवीच्या प्रसादाचे. त्या आनंदात मी घरी परतलो. त्या एका मुक्या जीवाला वाचवण्याचा आनंद तर होताच, पण मी चांगले काम केले आहे याचाही मला खूप आनंद होत होता.
किशोर ढाळे, जागृती गट, डोमरी

गट निमंत्रक: रज्जाक पठाण (९४२२७१२४४६)

No comments:

Post a Comment