Wednesday 30 September 2015

मुखपृष्ठ


अनुक्रमणिका

संपादकीय...

सप्रेम नमस्कार!
कुमार निर्माण अंतर्गत भरारीमासिकाचा प्रथम अंक आपणा सर्वांना मिळाला असेलच. त्यात केंद्रीय कार्यशाळेचा संपूर्ण आढावा घेण्यात आला होता. त्यातून कुमार निर्माण विषयी अजून स्पष्टता येऊन पुढील उपक्रमांसाठी मदत होईल अशी आशा वाटते. भरारीमासिकाबाबत काही गटांचे अतिशय उत्साहवर्धक अभिप्राय आमच्यापर्यंत पोचले आहेत. काही गटातील मुलांनी मासिकात दिलेल्या चित्रांवरून वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या तर काही गटांनी विविध भावना दर्शवणारे चेहरेसमजून घेऊन त्याची नक्कलही करून पाहिली.

या महिन्यातील अंक आम्ही कृती कार्यक्रम विशेषांकम्हणून आपणापर्यंत पोचवत आहोत. प्रथम कुठल्या कृती कार्यक्रमांनी व कशी सुरवात करायची असा प्रश्न बरेचदा निमंत्रकांना पडतो. म्हणून उपक्रमाच्या सुरवातीला कसे कृती कार्यक्रम असू शकतात यावर विशेष भर देण्यात आला आहे. बरेच गट पुर्वानुभवाने खूप छान काम करत आहेत त्यांच्या कृतींमधून एक गोष्ट लक्षात येते की अगदी रोजच्या जगण्यातील लहान लहान गोष्टींमधूनही अभ्यासाच्या व कृतींच्या प्रचंड आनंददायी कृती व संधी निर्माण होऊ शकतात. म्हणून गट निमंत्रकांनी एकमेकांच्या संपर्कात रहाणे, अभिप्राय देणे, सल्ला मसलत करणे हे खूप महत्वाचे आहे. या अंकासोबत सर्वांचे संपर्क क्रमांक देखील पाठवत आहोत.

मुले स्वतःहून काही करत नाहीत किंवा करू शकत नाहीत हा आपला सर्वात मोठा गैरसमज होऊन आपणच मुलांच्या वतीने निर्णय घेणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकेल. त्यापासून सावध असा! कृती करणे हे आपले उद्दिष्ट नाही आहे. त्यानिमित्ताने मुलांची जडण घडण होणे हे जास्त महत्वाचे.


आम्ही हे परत एकदा नमूद करू इच्छितो की, कुमार निर्माण अंतर्गत कृती कार्यक्रम मुलांनीच ठरवायचे आहेत, त्यांनीच पार पाडायचे आहेत. सर्व निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. आपण सर्व फक्त निमित्त मात्र!  

कुमार निर्माण व कृती कार्यक्रम

कुमार निर्माण ही मुलांच्या हक्काची अशी जागा आहे जिथे कुठलाही कृती कार्यक्रम करताना तो मुलांकडून सुरु होणे यावर भर देण्यात आला आहे. कृती कार्यक्रम करताना मुलांना काय वाटतं, त्या कृतीमागे त्यांचा काय विचार आहे हे जास्त महत्वाचे आहे. तसेच कुठलाही कृती कार्यक्रम करताना मुलांचं स्वातंत्र्य पूर्णपणे जपल्या गेले पाहिजे.
कुठलाही कृती कार्यक्रम ठरवण्याआधी मुलांनी एखादा विषय घेऊन त्यावर सखोल आणि चहुबाजूनी चर्चा व अभ्यास केल्यास कृती कार्यक्रम अधिक चांगले होऊ शकतील. जेव्हा अशा चर्चेला सुरवात होते तेव्हा त्या चर्चेला अगणित फाटे फुटू शकतात, ज्यामुळे मुलांच्या विचारांना चालना मिळते. याबरोबरच चर्चा सुरु असताना अनेक वेगळेच कृती कार्यक्रम सुचण्याचीही शक्यता जास्त असते. लक्षात घेऊया की निव्वळ कृती कार्यक्रम करणे हा आपला हेतू नसून आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे ते फक्त एक साधन आहे.

बैठकांमध्ये विद्यार्थी खालील गोष्टींबाबतही चर्चा घडवून आणू शकतात.
-       छानशी गोष्ट ऐकून त्यावर चर्चा करणे
-       वर्तमानपत्र/ मासिक एकत्र वाचणे
-       चित्र काढणे
-       गाणी म्हणणे
-       आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटनेवर चर्चा करणे
-       वस्तू बनवणे
-       उत्तम सिनेमा/ नाटक/ लघुपट/ माहितीपट पाहणे
-       एकत्र फिरायला जाणे (परिसराचे निरीक्षण करणे)

उदा.
१.       व्यक्तिगत कृती कार्यक्रम:
‘भरारी’च्या प्रथम अंकातील ‘चित्र चर्चा’ यावर चर्चा केल्यास काही कृती कार्यक्रम ठरवण्यास त्याची मदत होऊ शकते.
जसे की, चित्र क्र. २ मध्ये एका ओढ्याजवळ लहान मुले व काही महिला पाणी भरण्यासाठी एक मोठी रांग लावून उभे आहेत आणि चित्रात पाण्याचा साठा मर्यादित दिसतोय. त्यामुळे प्रत्येकाला आपला नंबर येईपर्यंत भर उन्हात उभे रहावे लागत आहे. चर्चेअंती स्वतःशी निगडीत एखादा कृती कार्यक्रम देखील ठरवता येऊ शकतो, उदा. ‘महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे, मी स्वतः दैनंदिन आयुष्यात कमी व गरजेपुरताच पाण्याचा वापर करेन.’
२.       सांघिक कृती कार्यक्रम:
मुलांनी एखादी घटना पाहिली असेल तर त्यावर चर्चा करून गटात एखादा कृती-कार्यक्रम ठरवता येऊ शकतो.
जसे की, अंबेजोगाईच्या गटातील मुलांच्या कॉलनीत नेहमी एक कुत्रा खेळत असे. एक दिवस तो झोपूनच होता. म्हणून मग मुलांनी प्राण्यांच्या डॉक्टरना बोलावून त्या कुत्र्याला तपासले व डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची काळजी घेतली. लवकरच तो कुत्रा बरा झाला.
कुमार निर्माण हा एक सांघिक उपक्रम आहे, म्हणजेच सर्व कृती कार्यक्रम ठरवणे, निर्णय घेणे ई. बाबी विद्यार्थ्यांनी एक संघ म्हणूनच पार पाडायच्या आहेत. म्हणूनच कृती कार्यक्रमाआधी विद्यार्थ्यांमध्ये संघभावना निर्माण होणेही महत्वाचे ठरते.

Ø  मुलांमध्ये संघभावना तयार करण्यासाठी त्याना आवडतील असे अनेक उपक्रम घेता येतील. उदा.
·         विविध सांघिक खेळ
·         गप्पागोष्टी
·         गाणी
·         चर्चासत्रे
·         छोटी नाटके, पथनाट्ये बसवणे
·         जवळपासच्या स्थळाला किवा संस्थेला एकत्र भेट देणे 

संघउभारणीनंतर विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या कृती कार्यक्रमांची रचना खालीलप्रमाणे असू शकेल.
·      स्व
सुरवातीचे कृती कार्यक्रम स्वत: शी निगडीत असू शकतात.
उदा. स्वतःचे जेवणाचे ताट रोज स्वतःच धुणे, आपली खेळणी, कपडे व्यवस्थित ठेवणे. आपल्या कपड्यांना इस्त्री करणे ई.
·      कुटुंब
‘स्व’ ला जोड देताना आपापल्या कुटुंबात करता येणाऱ्या कृती देखील करता येतील.
उदा. कुटुंबातील सदस्यांना काही ठराविक मदत सातत्याने करणे (आईला कामात मदत), आजी आजोबाना काही मदत.
·      परिसर
परिसराशी निगडीत कृती करताना व्यक्तिगत पातळीवर आपण अथवा विद्यार्थी विरोधाभास निर्माण करणाऱ्या कृती करत नाही ना याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आपले शेजारी, गल्ली, सोसायटी ई. शी संबंध येणारे कृती कार्यक्रम इथे करता येतील.
उदा. परिसरात फुल-झाडे लावणे व जोपासणे, परिसरात स्वच्छता ठेवणे, इतर वयोवृद्ध, महिला लहान मुले यांना मदत करणे, चर्चासत्र चालवणे, सर्वे करणे, स्पर्धा व इतर उपक्रम आयोजित करणे.
·      गाव / शहर / समाज
काही कृती आपल्या लगतच्या परीसरापलीकडे मुलांना घेऊन जातील.
उदा. परिसरातील विविध शासकिय व अशासकीय संस्थाना भेट देणे, विविध प्रकारे गावातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, गावाचे पर्यावरण व त्याचे महत्व समजून घेणे.

उल्लेखनीय कृती कार्यक्रम व अनुभव

कुमार निर्माणच्या उबंटु गटाची नियमित बैठक होते. दिवाळी जवळ येताच, दिवाळीच्या सुट्टीत आपण एकत्र तर नसू मग आपापल्या गावी, घरी आपण काय-काय चांगल्या गोष्टी करू शकतो यावर गटाची चर्चा सुरु झाली.


फटाक्यांचा मुद्दा हळूहळू चर्चेचा मध्यवर्ती मुद्दा बनला. आपण फटाके नक्की का फोडतो? यावर विचार करताना हे जाणवलं की याचे तोटेच अधिक दिसताहेत. ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जीवघेणे अपघात, पर्यावरणाचा र्‍हास या सगळ्या सोबतच मुलांना आणखी एक नवी माहिती मिळाली, ती म्हणजे या फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात छोटी छोटी बालके १२-१२ तास काम करतात. म्हणजे एका अर्थी आपण बालमजुरीला प्रोत्साहनच देत आहोत.

जाणीव तर झाली, आता त्त्यावर कृतीची आवश्यकता होती. योजना बनली. मुलांनी ठरवलं आपण स्वतः फटके फोडायचे नाहीतच, पण आपल्या मित्र-मैत्रीणीनाही तसे आवाहन करायचे. त्यासाठी मुलांनी आधी अभ्यास केला की फटाके नेमके कुठून येतात, ते तयार कसे होतात, ते फोडले तर काय होतं, नाही फोडले तर काय होईल ई.

मग मुलांनी एक प्रतिज्ञापत्रक तयार केलं, ज्यामध्ये ते भरून देणारी व्यक्ती शपथ घेते की मी फटाके उडवण्याच्या पैशात अमुक अमुक रकमेची बचत करेन. शेकडो मुलांना व मोठ्या व्यक्तींना भेटून त्यांनी फटाक्याबद्दल जागृती केली व त्यांच्याकडून ते प्रतिज्ञापत्र भरून घेतले. अगदी प्रत्येक सदस्याने दिवाळीच्या सुट्ट्यात आपापल्या गावी ही मोहीम राबवली व सर्वांनी मिळून अक्षरशः लाखो रुपयांची बचत घडवून आणली.

गटातील सदस्यांनी फक्त स्वतःच फटाके फोडले नाहीत तर इतर मुलामुलींना देखील फटाके फोडण्यापासून परावृत्त केले. फटाके न फोडल्याने पैश्यांची जी बचत झाली. त्यातून काही साहित्य विकत घेऊन मुलांनी विविध प्रकारची शुभेच्छा-पत्रे तयार केली आणि त्यामार्फत, प्रदूषण मुक्त आणि प्रसन्न दिवाळीचा आनंद आपल्या गावात, आप्तेष्टांमध्ये वाटला. गरजू व्यक्तींना मदत केली. अशा पद्धतीने वैयक्तिक वाटणारी ही कृती सामुदायिक ठरली.


येत्या दिवाळीच्या निमित्ताने अजून काय काय गोष्टी समजून घेता येतील बरे?


(असाच कृती कार्यक्रम मागील वर्षी जवळपास सर्वच गटांनी पार पाडला व त्याबाबत नोंदीही ठेवल्या. )

मुलांच्या लेखणीतून

जागृती गट
१५.०९.२०१५ या रोजी आमची बैठक झाली. आम्हाला महालक्ष्मीच्या सुट्या होत्या म्हणून आमच्या बैठकीत गावाकडे प्रत्येकजण काय करणार हे विचारल्यानंतर सर्व मुलांनी आपापले उपक्रम सांगितले. मी पण एक उपक्रम सांगितला, तो म्हणजे गावाकडे वृक्षारोपण कार्यक्रम घ्यायचा. तर आम्हाला महालक्ष्मीच्या सुट्या लागल्या. मी गावाकडे गेलो. मी व माझे मित्र गप्पा मारत होतोत. मी माझ्या मित्रांना प्रश्न विचारला की, भारत देशात पाऊस का पडत नाही, सर्वत्र दुष्काळ आहे याचे कारण सांगा. तर माझ्या मित्रांनी बरीच कारणे सांगितली. त्यात माझ्या एका मित्राने सांगितले की आपल्या भारत देशात झाडांची संख्या कमी आहे. मग मी म्हटलं की आपल्याला काही करायला येईल का? तर सर्व मुले म्हणाले की हो येईल ना. मग मी म्हणालो काय करता येईल तर सर्व मुले म्हणाली आपल्याला झाडे लावता येतील. मग मी दुसऱ्या दिवशी नर्सरी मधून काही लिंबाची झाडे आणली व प्रत्येक मुलाला एक एक झाड दिलं. तर प्रथम सर्व मुलांनी जागा निश्चित केली व आपापले झाड चांगल्या प्रकारे लावले नंतर मुलांनी त्याला खत पाणी टाकले. मी प्रत्येक मुलाला सांगितले की मी दिवाळीला आल्यानंतर सर्वांचे झाड पाहील तर तेव्हा मला झाडाला कुंपण व टवटवीत झाडे दिसली पाहिजेत. सर्व मुलांनी हो असे उत्तर दिले. असे आम्ही ३०-३५ झाडे लावली व सर्वाना संदेश दिला की ‘झाडे लावा झाडे जगवा’.

या उपक्रमातून मुलांना आनंद मिळाला व झाडेपण लावली गेली असे सर्व मुले म्हणाले हे ऐकून मला पण आनंद झाला. अशा प्रकारे मी वृक्षारोपण घेतले.




आपला,
प्रवीण बरगे
जागृती गट, बीड

गट निमंत्रक –रज्जाक पठाण (9422712446

ज्योतिबा गट
तर आमच्या कुमार निर्माण संघात संघनायक कोण होणार यासाठी मतदान घ्यायचं होत. संघनायकाच्या निवडणुकीला विनीत, जय, कमलेश, प्रतिक आणि देवयानी म्हणजे मी. मग त्यात मतदान अध्यक्ष प्रशांत होता मग गुप्त मतदान झाल, सगळ्यांना मतं मिळाली. प्रतीक्षाला पडले ५ मतं, कमलेशला पडले ४ मतं, विनीतला पडले ६ मतं, जयला पडले ३ मतं आणि मला पडले ७ मतं. मग मतदान अध्यक्षाने असे घोषित केले की देवयानीला जास्त मतं पडली आहेत म्हणून ती संघनायिका होईल. अशा प्रकारे मी संघनायिका बनली.
देवयानी अमृतकर
ज्योतिबा गट, चाळीसगाव
गट निमंत्रक: सोनाली नानकर (८७९३१६३३५२)

बोलकी पुस्तके

शिक्षणाचे रहस्य - आचार्य विनोबा भावे

वस्तुतः विद्यार्थ्याला आपण शिक्षण घेत आहोत असा भाव झाला की शिक्षणातले स्वारस्य गेलेच म्हणून समजावे.  लहान मुलांना खेळणे हा उत्तम व्यायाम होय असे सांगण्यात येते, त्यात्यील रहस्य हेच आहे. खेळामध्ये व्यायाम होत असतो, पण ‘मी व्यायाम करीत आहे’ अशी जाणीव नसते. खेळताना आसपासचे जग मेलेले असते. मुले तद्रूप बनून अद्वैताचा अनुभव घेत असतात.  देहभान हरपलेले असते.  तहान, भूक, थकवा, दुखापत, काहीही भासत नाही.  सारांश, खेळ म्हणजे आनंद असतो, ते व्यायामरूप कर्तव्य नसते.  हीच गोष्ट सर्व शिक्षणालाही लागू केली पाहिजे.  शिक्षण हे कर्तव्य आहे असल्या कृत्रिम भावनेपेक्षा, शिक्षण म्हणजे आनंद आहे ही नैसर्गिक आणि जोमदार भावना उत्पन्न झाली पाहिजे.  पण आमच्या मुलांत अशी भावना हल्ली दिसते काय? शिक्षण म्हणजे आनंद ही भावना तर राहू द्याच, पण शिक्षण हे कर्तव्य आहे ही भावनासुद्धा फारशी दिसून येत नाही.  शिक्षण म्हणजे शिक्षा ही गुलामगिरीची एकच भावना आज विद्यार्थीवर्गात प्रचलित आहे.   मुलाने जरा कोठे जिवंतपणाची चमक किंवा स्वतंत्रवृत्तीची चुणूक दाखविली की घरच्या मंडळींचा उद्गार निघालाच, “मुलाला शाळेत डांबला पाहिजे!” शाळा म्हणजे काय?  डांबून ठेवण्याची जागा! अर्थातच ह्या पवित्र कार्याला हातभार लावणारे शिक्षक म्हणजे सदर तुरुंगाचे लहान-मोठे अधिकारी!

रोल प्ले


रोल प्ले म्हणजे काय?
दिलेल्या परिस्थितीत विविध पात्रे कसा विचार करतील, कसे वागतील, कसे बोलतील याच्या अगणित शक्यता असू शकतात. त्या समजून घेऊन त्याप्रमाणे नेमकी भूमिका वठवणे म्हणजे रोल प्ले.

उद्देश
एकाच परिस्थितीमध्ये वेगवेगळी माणसे वेगवेगळे वागतात. ती तसे का वागत असावीत हे समजून घेणे, ती अधिक चांगले कसे वागू शकली असती हे समजून घेणे.

उदा.
दिलेली परिस्थिती – दोन तीन मित्र एकत्र जमून एका मित्राच्या घरी खेळत असतात. त्यातील एकाचा धक्का लागून नकळत शाईची दौत फरशीवर पडते व फुटते. सर्व शाई फरशीवर सांडली आहे.
आता ही घटना आपल्या गटातील काही मुलांनी उभी करायची आहे. समजा गटातील रमेश, सागर आणि नेहा यांना हा रोल प्ले करायचा आहे.

या परिस्थितीमध्ये हे तिघे काय काय वागू शकतील याच्या खूप शक्यता आहेत. त्यापैकी नेमके काय वागायचे हे त्यांचे प्रत्येकाचे स्वातंत्र्य आहे. पण गोंधळ होऊ नये म्हणून हे तिघे बाजूला जातील व ५ मिनिटे चर्चा करतील व नेमके काय नाट्य उभे करायचे आहे हे ठरवतील. व त्यानंतर आपले नाटुकले सादर करतील. या घटनेमध्ये काय काय शक्यता असू शकतात आपण पाहू
1.     रमेश कडून दौत फुटली आहे म्हणून सागर व नेहा त्याला वाईट ठरवतील व निघून जातील.
2.     रमेश कडून दौत फुटली आहे, म्हणून रमेश रडू लागतो. नेहा तिच्या बाबांकडे तक्रार करायला निघून जाते. सागर रमेशला शांत करायचा प्रयत्न करतो.
3.     रमेश कडून दौत फुटली आहे पण त्याला धक्का सागरने दिला होता, म्हणून दोघे पण भांडत बसतात. नेहा डोके धरून बसते.
4.     रमेश कडून दौत फुटली आहे, तो पळून जातो, नेहा आणि सागर फारशी पुसून घेतात.
5.     रमेश कडून दौत फुटली आहे पण तो नेहावर आरोप करतो. म्हणून सागर त्याला मारतो. ई.

अशा प्रकारच्या अगणित शक्यता असू शकतात. त्यापैकी एका पद्धतीने हे तिघे वागतील व बाकी सर्वांसमोर हे छोटे नाटक सादर करतील.
त्यानंतर गटातील सर्वांनी मिळून चर्चा करावी की वरील परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने हे तिघे वागले, ते तसे का वागले असतील, त्यापेक्षा वेगळे वागता आले असते का, त्याने काय काय फरक पडला असता. या रोल प्ले मधून काय शिकायला मिळाले. ई.

नियम –
1.     रोल प्ले करताना प्रत्येकाने अगदी आदर्श वा पुस्तकी अजिबात वागू/बोलू नये.
2.     दिलेली घटना जर खरेच घडली असती तर सामान्य व्यक्ती जसे बोलतात, वागतात त्याप्रमाणेच नाटक करायला हवे. (त्या परिस्थितीत अधिक चांगले कसे वागता आले असते याची चर्चा सगळे मिळून नाटका नंतर करायची आहे)
3.     आपल्या भूमिकेशी प्रत्येकाने प्रामाणिक रहायला हवे.
4.     आपण पाहिलेले लोक, त्यांच्या सवयी, बोलणे, वागणे यांचा योग्य जागी सुरेख वापर करावा.
5.     सर्वात महत्वाचे - आपले नाटक बघणाऱ्या इतरांना कंटाळवाणे होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यात जरूर विनोद, गाणी, कृतीचा समावेश करावा.
6.     कमीत कमी वेळात रोल प्ले ची तयारी झाली पाहिजे.
7.     आपण नेमका कसला अभिनय करतोय, रोल प्ले चा विषय काय आहे हे इतर सर्वांना नाटकातूनच कळायला हवे, किमान इतके संवाद वापरावेतच.

सरावासाठी विषय (हे विषय तुम्ही हवे तसे बदलू शकता व नवीन विषय शोधू शकता; तसेच खरोखर घडलेल्या, पाहिलेल्या घटना विषय म्हणून घेता येतील)

1.     ३-४ मित्र खेळत असतात. त्यातील दोघांचे कशावरून तरी भांडण होते. त्यांचा अबोला होतो.
2.     वर्गातील आपल्या एका मित्राला इतर मुले चिडवत आहेत.
3.     शाळेत जाताना ३-४ मित्रांना लक्षात येतं की मारकुट्या शिक्षकांनी दिलेला गृहपाठ त्यांनी केलेला नाहीये.
4.     एका घरात दोन भावंडांमध्ये बहिणीला सर्व कामे सांगितली जातात व भाऊ फक्त खेळत असतो.
5.     एका घरात बाबा तंबाखू खात आहेत, त्यांचा मुलगा/मुलगी त्याचे मित्र अभ्यासासाठी घरी आलेले आहेत.
6.     शाळेत पाणी प्यायला गेल्यावर एका मित्राने पाण्याचा नळ चालूच ठेवला आहे.

7.     आपली आई आजारी आहे व लहान बहिण तिला त्रास देत आहे, हट्ट करत आहे.

राहो सुखाने हा मानव इथे



राहो सुखाने हा मानव इथे
या भूवरी भूवरी या इथे II धृ II
लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला
लालाला लाला लला लला लला

कल्याण होवो माझे नि तुमचे
कल्याण शत्रूचे अन मित्रांचे
कल्याण होवो साऱ्या जिवांचे
हा मैत्रीचा भाव कायम वसे
राहो सुखाने हा मानव इथे
या भूवरी भूवरी या इथे ||
लाला ललाला ललाला लालाला लाला ललाला
लालाला लाला लला लला लला

वर्णाचा धर्माचा वा देशाचा
भेद नसे माणसा माणसाचा
विश्वातल्या या साऱ्या जनांचा
हा मैत्रीचा भाव कायम वसे

राहो सुखाने ने....

(या गीताची चाल ऐकण्यासाठी खालील व्हिडीओ पहा)

कृती

कृती  – हा फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्याने भरावा व सर्वांनी मिळून त्यावर चर्चा करावी

खालील तक्ता भरून त्यावर आपल्या गटात चर्चा करा.
क्र 
व्यक्ती
आपल्याला काय देतात?
आई

वडील

भाऊ

बहिण

आजी

आजोबा

काका, मामा

काकू, मामी, आत्या, मावशी

मित्र

१०
मैत्रीण

११
शेजारी

१२
शिक्षक

१३
पोलीस

१४
दुकानदार

१५
पोस्टमन

१६
फेरीवाले

१७
डॉक्टर

१८
तंत्रज्ञ (सुतार, वायरमन, गवंडी ई.)

१९
शेतकरी

२०
गवळी

२१
सरकारी अधिकारी

२२
राजकीय पुढारी

२३
इंजिनियर

२४
सफाई कामगार

२५
बसचालक, रिक्क्षा चालक

२६
सैनिक - भूदल, नौदल, वायुदल, सीमा सुरक्षा , सागरी सुरक्षा ई.

२७
व्यापारी

२८
बँक कर्मचारी

२९
अग्निशमन दल कर्मचारी

३०
सिनेमा, नाटक, टीव्ही वरील अभिनेते-अभिनेत्री

३१
लेखक, कवी

३२
पत्रकार

३३
गायक, वादक, संगीतकार

३४
सर्व प्रकारचे खेळाडू

३५
शास्त्रज्ञ, संशोधक


काही प्रश्न
a.     आपल्या आसपासच्या वरील  सर्व व्यक्तींकडून आपल्याला काय काय मिळते आणि हे नाही मिळाले तर चालेल काय?
b.     आपण या सगळ्यांशिवाय जीवन जगू शकतो काय?
c.     केवळ पैसे देऊन या सर्व सेवांची किमत मोजता येते असे वाटते का?
d.     यांच्या बद्दल आपल्या मनात कश्या प्रकारची भावना आहे? कशी असावी असे वाटते?
e.     या सगळ्यांशी आपण कसे वागावे?