Monday 30 November 2015

मुखपृष्ठ


या अंकात

या अंकात ...


औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण!

मुलांच्या लेखणीतून

बोलकी पुस्तके - तोत्तोचान 

पुरवणी १ - सर्वेक्षणाची गोष्ट

कुमार गीत - रोज चांगली बुद्धी दे

पुरवणी २ - राजाचा वारस कोण?

गोष्ट

कलेचा कोपरा

क्षणचित्रे

चित्र चर्चा



संपादकीय मंडळ

नरेंद्र खोत

प्रफुल्ल शशिकांत

प्रणाली सिसोदिया

शैलेश जाधव




वेबसाईट : www.mkf.org.in/mso

संपर्क : ९४२०६५०४८४



अंक चौथा  |  नोव्हेंबर २०१५

हे मासिक खलील लिंक वर मूळ स्वरुपात वाचता येईल
http://kumarnirman.blogspot.in/

(खासगी वितरणासाठी)





औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण!

शिक्षण म्हणजे माहित नसलेलं माहित होणं (ज्ञान), व्यवहारात गरज पडेल तेव्हा माहित झालेल्याचा योग्य वापर करता येणं (उपयोजन) व योग्य वापर करण्यासाठी ते आठवणं (आकलन) आणि शक्य असल्यास माहिती झालेल्यात काही अधिकची भर घालणं यालाच आपण ‘शिक्षण’ म्हणतो.  ते सारं माणसातच नव्हे तर सर्व जीवनमात्रात उपजत असतं.  त्यामुळे शिकणं ही एक खरी नैसर्गिक प्रक्रिया आहे.   जे मुद्दाम न घडवता नैसर्गिकपणे घडतं, त्यातून आनंद मिळत असतो. म्हणूनच शिक्षण ही एक खरंच एक आनंददायी घटना आहे.

आज शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे की ‘गाव तेथे शाळा’ ही म्हण पूर्णत्वास गेलेली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.  विजेच्या सोयीअभावी गाव अंधारात असेल पण निदान महाराष्ट्रापुरता विचार केला तरी शाळा नाही असं गाव दुर्मिळच.  एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षण खात्याने शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.  शिक्षणाचं महत्व प्रत्येकालाच पटलं आहे. त्यामुळे शिक्षण मिळावं म्हणून लोकं धडपडत असतात.

पण दुर्दैवाने म्हणा की अन्य कारणानं म्हणा, शिक्षण घेण्यातला आनंद मात्र हरवला आहे.  हल्ली मुलगा/ मुलगी १०वी – १२ वीत गेले की त्या मुलांपेक्षा त्यांच्या पालकांच्याच छातीचे ठोके वाढतात. मुलांपेक्षा त्यांच्याच चेहऱ्यावर जास्त ताण जाणवतो.  आणि घरातील वातावरण अगदी सुतक असल्यासारखं होतं.  आजच्या शिक्षणातून आनंद मिळण्याऐवजी घरोघर चिंतेची जणू घरघरच लागलेली आढळते.  याला कारण म्हणजे आजची जीवघेणी स्पर्धा.  प्रत्यके वर्षी ०.१ ने गुणवत्ता यादी बदलत असते. आणि अशा परिस्थितीत एखाद्याला कमी गुण मिळाले की त्याला कोणाकोणाकडून काय काय बोलणी खावी लागतात हे आपण सर्व जाणताच. पण खरंच परीक्षेतील गुण हे मुलांची गुणवत्ता मोजण्याचे एकमेव साधन आहे का?

गणितात कमी गुण मिळणारा अशोक हा उत्तम चित्रं काढतो पण कुणीच त्याच्या चित्रांचे कौतुक करत नाहीत. विज्ञानात कमी गुण घेणारी रूपा सुंदर गाते पण आपण त्याकडे लक्षच कुठे देतो?  आज समाजाला शिक्षणातून आनंद मिळण्याऐवजी तो चिंताग्रस्त दिसतो. हे चित्र कुठेतरी बदललं पाहिजे. यासाठी शिक्षण ओझे न वाटता मुलांच्या कलाने जाणारं  आणि आनंददायी झालं पाहिजे.

मुळात शिकण्याची प्रक्रिया माणसाच्या जन्मापासूनच सुरु होते. जन्मापासून मूल जसजसं मोठं होतं, तसतसं ते नवं काहीतरी शिकत असतं. बोलायचं कसं, चालायचं कसं, वागायचं कसं अशा अनेक बाबी शिकताना मुलांना कधीही आपण मुद्दाम एका ठिकाणी बसवून शिकवत नाही. ते त्याला आवडतं म्हणून अनुकरणातून, अनुभवातून नकळतपणे मूल हे सर्व शिकत असतं.  यालाच ‘अनौपचारिक शिक्षण पद्धती’ असे म्हणतात.   आई जेव्हा मुलाला/ मुलीला स्वयंपाक शिकवते तेव्हा त्याचे काही वेळापत्रक, गृहपाठ, चाचण्या, पास – नापास अशा कुठल्याही बाबी नसतातच. पण तो/ ती केव्हा शिकते हे त्या मुलाला/ मुलीलाही कळत नाही आणि आईलाही आपण कधी शिकवले हे कळत नाही. हे सर्व अगदी सहजपणे घडत जातं.

पण हल्ली मूल अडीच-तीन वर्षाचं झालं की त्याला नर्सरी प्ले ग्रुपमध्ये घातलं जातं. म्हणजे अडीच-तीन वर्षापर्यंत मूल घरी असतं. यानंतर ते चार भिंतींच्या आत शिक्षकाने शिकवलेली गाणी, गोष्टी, खेळ अगदी तिच्याप्रमाणेच शिकण्यात गढून जातं. त्याची इच्छा असो वा नसो पण त्याला इतर मुलांप्रमाणे ते शिकावंच लागतं. ही आपली औपचारिक पद्धत. शिकणं हे शाळेत घडतं किंवा पुस्तकातून घडतं असं नाही. पूर्वी पाच - सहा वर्षापर्यंत मुलं घरीच असायची नी त्या वातावरणातच ऐकून, पाहून, निरीक्षणातून, अनुकरणातून शिकायची. मानसशास्त्र असं सांगतं की वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मुलांवर झालेल्या संस्कारातून घडणारं व्यक्तिमत्व हे कायमस्वरूपी असतं आणि ते अपवाद वगळता अपरिवर्तनिय असतं. त्यामुळे निदान या वयात तरी त्यांना अनौपचारिक पद्धतीने निसर्ग सानिध्यात जास्तीत जास्त अनुभवातून शिक्षण मिळावं हे फार गरजेचं आहे.

माझं ४ थी पर्यंतचं शिक्षण हे असंच औपचारिक पद्धतीतून झालं. मला आजही मराठी बाराखडी न चुकता म्हणता येते. पण माझ्या बालमित्रांना ती म्हणताना मधली अक्षरं गळतात. माझे मित्र रोज न चुकता वृत्तपत्रं वाचतात. पण त्यांची बाराखडी मात्र चुकते. मला आठवतं की मला शाळेत जाण्यापूर्वीपासूनच बाराखडी येत असे. ती मला कुणी मुद्दाम शिकवली नाही. पण माझ्या मोठ्या भावंडांचा अभ्यास करतेवेळी किंवा मला म्हणायला आवडे म्हणून मी ती शिकलो. आणि आजपर्यंत ती मला अचूक पाठ आहे.

माझा भाषाविकास हा पूर्णतः माझ्या मित्र मंडळी आणि मी वावरत असलेल्या लोकांच्या सानिध्यात झाला हे अगदी खरं आहे. शालेय वातावरणात मी भाषा शिकलो पण तिला धार ही शाळाबाह्य, अनौपचारिक वातावरणातूनच आली. मला वाटतं की भाषा विकासासाठी अनौपचारिक शिक्षण पद्धती ही मलाच नाही तर इतरांनासुद्धा उपयुक्त अशी पद्धत आहे.

मी ५ वीत असताना आम्हाला प्रथम सत्र परीक्षेत चित्र पाहून शब्द लिहा असा प्रश्न होता. त्यामध्ये एक चाकाचं चित्र होतं आणि पुढे फक्त डब्ल्यू अक्षर होतं आणि पुढची अक्षरे त्यात लिहायची होती. आमची इंग्रजीची सुरवात ही ५वी पासूनच असायची आणि तो शब्द शाळेत कधीही शिकवला नव्हता, त्यामुळे त्याचे स्पेलिंग कुणालाही आले नाही. पण मी ते अचूक लिहिलं होतं. माझ्या शिक्षिकेनं विचारलं की तुला हे कसं आलं? त्यावेळेस मी सांगितलं की आमच्या घरी कपडे धुण्याचा व्हील साबण वापरतात. त्यामुळे त्यावर असलेलं चित्र आणि त्याचं स्पेलिंग मी अनेकदा वाचलं होतं आणि ते पाठ झालं होतं. त्याचा वापर मी इथे केला होता.

स्किनर या मानसशास्त्रज्ञाने म्हटलं आहेच की, प्रत्येक माणसाची शिकण्याची विशिष्ठ अशी गती असते. ही व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते. त्यामुळे ‘सब घोडे बारा टक्के’ याप्रमाणे न जाता प्रत्येकाला त्याच्या गतीनुसार शिकण्याची संधी असावी. हे अनौपचारिक पद्धतीनेच शक्य आहे. कारण त्यात प्रत्येकजण स्वतःच्या अनुभवानुसार स्वकलाने शिकत असतो. औपचारिक पद्धतीत अभ्यासक्रम पूर्ण होण्यापेक्षा पुस्तक पूर्ण करण्यावर भर असायला हवा. पण तसे दृष्टीस मात्र क्वचितच पडते. त्यामुळे या पद्धतीत शिकणे हे रंजक होण्याऐवजी निरस बनते आणि गळती व नापास होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

खरं तर शिक्षणातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. हा सर्वांगीण विकास म्हणजे बौद्धिक, सामाजिक, भावनिक, अध्यात्मिक या घटकांचा विकास होय. सध्याच्या औपचारिक पद्धतीतून बौद्धिक शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर मारा करून ‘घोका आणि ओका’ या पद्धतीचाच वापर सर्वत्र आढळतो. बालवयामध्ये मुलांची हार्डडीस्क  रिकामी असते. ऐकणं, बोलणं, निरीक्षण करणं, अनुभवणं या इनपुटमुळे हार्डडीस्कमध्ये ज्ञानसंचित केलं जातं. म्हणून आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी वरीलपैकी किती घटकांचे इनपुट त्यांच्या हार्डडीस्कमध्ये सेव्ह होते आहे याकडे लक्ष घालणं फारच गरजेचं झालं आहे.

राजू भडके (प्रथम फौंडेशन, मुंबई)

९५९४४२४८४१

मुलांच्या लेखणीतून

दिवाळीतील किल्लेबांधणीची धम्माल

दरवर्षी आमच्या शाळेतील विद्यार्थी दिवाळीत आपापल्या घरी किल्ले बनवतात. सर दरवर्षी ते किल्ले पाहायला जातात. पण ज्यांनी तो किल्ला बनवला आहे त्यांना त्याची माहिती सांगता येत नाही. त्यामुळे या वर्षी आम्ही असे ठरवले की आम्ही सुद्धा सरांसोबत किल्ले पाहायला जाणार आहोत आणि वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती सांगणार आहोत.

तेथील अनुभव: आम्ही तेथे लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत म्हणजे प्राथमिक ते माध्यमिक च्या मुलांचे किल्ले पहिले व त्यांना त्यांनी बनवलेल्या किल्ल्यांची नावे विचारुन त्यांची माहिती सांगितली. तेव्हा आम्हाला विविध अनुभव आले. काही किल्ल्यांवर ठराविक स्थळांची नावे लिहली होती. व सूचना लिहल्या होत्या.

तेथील लोकांनी आम्हाला विचारले की “तुम्ही हि माहिती आम्हाला का सांगत आहात?” आम्ही सांगितले कि सर्व जण किल्ले बनवतात पण त्यांना त्या बद्दल माहिती नसते.          
                                                                 
    - सृजन गट, अलिबाग


दिवाळीचे नियोजन

प्रथम सत्र परीक्षा संपल्यानंतर बैठक घेण्याचे ठरले होते. त्या प्रमाणे जागृती गटाची बैठक झाली. परीक्षेचा ताण गेला व आता गावाकडे जाण्यास मिळणार म्हणून मुले आनंदी होती.

बैठकीत प्रथम बाळासाहेब व प्रसाद यांनी कुमार गीत गायन केले.फटाके मुक्त दिवाळी या विषयावर बैठकीत चर्चा झाली. दिवाळीनिमित्त फटाके न वाजवण्याचा व गावाकडील एक दोन मुलांनाही फटाके वाजवण्यापासून प्रवृत्त करण्याचा मुलांनी संकल्प केला. तसेच सुट्टी निमित्त

  • गरजूंना मदत
  • वृक्षारोपण
  • फटाक्यांच्या पैशातून गृहपयोगी वस्तू खरेदी करणे
  • अंधश्रद्धावर काम करणे
  • फटाके न वाजवणे
इत्यादी काम करण्याचे बैठकीत ठरले
जागृती गट, डोमरी
गट निमंत्रक – रज्जाक पठाण (९४२२७१२४४६)

फटाके व त्यांचे दुष्परिणाम

आम्ही जेथे किल्ले पाहायला गेलो तिथे आम्ही फटाके फोडल्याने नक्की काय होते? याबद्दल जनजागृती केली. फटाक्यांमुळे कोणते दुष्परिणाम होतात त्याबद्दल सांगितले.  फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते, प्रचंड ध्वनी प्रदूषण होते, अपघाताने अनेकदा भाजते, आग लागते. 

वृद्ध, आजारी, परीक्षार्थी विद्यार्थी यांना त्रास होतो. फटाके बाल कामगार तैयार करतात. फटाके खरेदीतून या चुकीच्या प्रथेला मान्यता व स्थिरता येते. फटाके व शोभेची दारू उडवणे हे १००% चुकीचे आहे असे सांगितले. 

फटाके खरेदी करणे व उडवणे म्हणजे पैसे जाळणे किंवा पैशाचा धूर उडवणे असेच म्हणावे लागेल. आम्ही त्यांना असेही सांगितले की फटाके शोभेची दारू यांची खरेदी कमी करून त्याऐवजी त्या पैशातून छान छान खेळणी पुस्तके खरेदी करावी किंवा गरिबांना ते पैसे दान करावे.

सृजन गट, अलिबाग
गट निमंत्रक – सुनील पाटील (७८७५६८४२४३)

बोलकी पुस्तके - तोत्तोचान

एक अतिशय दंगा करणारी, त्रास देणारी, खोडकर मुलगी नुकतीच शाळेत जाऊ लागलेली असते. तिच नाव असतं तोत्तोचान. पण काहीच दिवसांत तिच्या आईला शाळेत बोलावून घेतात व सांगतात की तुमची मुलगी फार दंगा करते, त्रास देते. तिच्यामुळे इतर मुलांनाही शिकण्याला त्रास होतो, तुम्ही हिला इथून घेऊन जा व दुसऱ्या शाळेत टाका.

तोतोचानची आई तिला काहींही सांगत नाही. व तोतोचानला तिएका जगावेगळ्या शाळेत टाकते. त्या शाळेच नाव असतं तोमोई. (तोमोई हे एक स्वल्पविरामासारखं प्रतीकात्मक चिन्ह आहे आणि या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेसाठी दोन तोमोई असलेलं प्रतिक तयार केलं होतं. एक काळं आणि दुसरं पांढरं. अशी दोन तोमोई मिळून तयार होतं ‘संपूर्ण वर्तुळ’. यातून त्यांचं मुलांविषयीचं ध्येय सूचित होत होतं – शरीर आणि मन यांचा एकत्रित विकास). 

तिच्या आईला खरंतर प्रश्न असतो की आपली मुलगी या शाळेत तरी टिकेल की नाही ? हिचं पुढे कस होणार ? पण तोत्तोचान या शाळेत रमते. शाळा तिला खूप आवडू लागते. रोज शाळेतून घरी आल्यावर ती आपल्या आईला शाळेतील गमती जमती सांगते. शाळेत जाऊन बरेच दिवस झाल्यावर सुद्धा तिच्याकडे सांगायला नवीन काही तरी असतंच.

 या शाळेच सगळच वेगळं असतं. या शाळेचे वर्ग म्हणजे रेल्वेचे डब्बे असतात. शिक्षक मुलांना रागवत नाहीत, बसायच्या जागा ठरलेल्या नसतात, मुलांना खेळायला मोकळीक असते. मुले एकमेकांत जास्त कसे मिसळतील याचा विचार केलेला असतो. फक्त आणि फक्त शिस्तीचा बागुलबुवा नसतो, तरीही मुलं शिस्तीने वागतात.

तर एका शाळेतून काढून टाकलेल्या तोत्तोचानचा या शाळेतील वर्गात म्हणजेच रेल्वेच्या डब्ब्यात बसून आयुष्याचा प्रवास सुरु होतो.

या शाळेत शाळा सुटण्याच्या टोलावर मुलांना घरी जाण्याची घाई नसते पण सकाळी उठून शाळेत येण्याची घाई मात्र नक्की असते. या शाळेत मुख्याध्यापक मुलांना सगळ्यात मळलेले कपडे घालून या असे सांगतात. त्यामुळे मुले कपडे खराब होतील ही भीती न बाळगता खेळू बागडू शकत. बाकीच्या शाळांमध्ये जिथे शिक्षकांना मुले घाबरून असत तिथेच या शाळेत मात्र शिक्षक मुलांना आपले मित्र वाटत. शिक्षकही मुलांसोबत खेळत. या शाळेत तोत्तोचान खेळता खेळता शिकू लागते.

‘तू खरोखर खूप चांगली मुलगी आहेस’ असं तिचे मुख्याध्यापक तिला नेहमी म्हणायचे. आणि या वाक्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढत असतो.

या मुलीची, तिच्या या जगावेगळ्या शाळेची आणि त्या शाळेतील तिच्या आवडत्या मुख्याध्यापकांची गोष्ट या पुस्तकात आहे. या शाळेत मुलांना केंद्र स्थानी ठेऊन केलेले प्रयोग, शिकण्याची सहज पद्धती, रेल्वेच्या डब्ब्यातील वर्ग, सहली, शिबीरं, खेळ या सगळ्याची मजेशीर गोष्ट म्हणजे हे पुस्तक. तोतोचान चे मित्र,त्यांच प्रत्येकाचं वेगळेपण आणि तरीही एकत्र राहण्याची गोष्ट आणि बरंच काही या पुस्तकात आहे.


या पुस्तकाचा मुलं, निमंत्रक व  पालक या सगळ्यांनाच नक्की उपयोग होईल. तेव्हा हे पुस्तक नक्की वाचा.

पुरवणी क्र. १ - सर्वेक्षणाची गोष्ट

सर्वप्रथम कुमार निर्माण च्या दोन गटांनी केलेल्या कृतीची उदाहरणे आपण पाहूया.

१.       एका गटातील मुलांनी एक छोटी फिल्म पहिली किंवा एक व्याख्यान ऐकले ज्यामधून त्यांना कळाले कि भारतावर विजेचे खूप मोठे संकट आहे, वीज महाग होत चालली आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणावर वीज बचत करू शकतो. अणूउर्जेची गरज भासते आहे पण ती धोकादायक आहे. ई.
हे सर्व ऐकल्यावर गटाला वाटले कि आपल्या गावात आपल्या परिसरात आपण याबाबत जनजागृती केली पाहिजे. त्यातून लोकांचा व गावाचा फायदा होईल. मग सर्व मुले गावातील प्रत्येक घरी गेली व त्यांनी वीज बचत, अणूउर्जा ई बाबतचे सामान्य ज्ञान लोकांना सांगितले. व त्यांना विनंती केली कि त्यांनी वीज कमी वापरावी.

२.       दुसऱ्या गटातील मुलांनी एक छोटी फिल्म पाहिली किंवा एक व्याख्यान ऐकले ज्यामधून त्यांना कळाले कि भारतावर विजेचे खूप मोठे संकट आहे, वीज महाग होत चालली आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणावर वीज बचत करू शकतो. ई.

हे सर्व ऐकल्यावर गटाला वाटले कि आपल्या गावात आपल्या परिसरात आपण याबाबत जनजागृती केली पाहिजे. पण मग त्यांना वाटले कि आपल्या गावाला याची गरज आहे का हे आधी तपासावे लागेल. ते कसे ठरवणार? मग त्यांनी प्रत्येक घरासाठी एक प्रश्नावली तयार केली. त्यात विविध प्रश्न होते, जसे कि, घरात किती बल्ब आहेत, किती पॉवर चे आहेत, ते किती वेळ वापरले जातात, टीव्ही आहे का, तो किती वेळ वापरला जातो, स्वयंपाकाला सरपण वापरतात कि शेगडी, महिन्याचे विजेचे बिल किती येते ई.

मग गावातील लाईनमन ला भेटून त्यांनी हे शिकून घेतले कि आपल्याला येणारे बिजेचे बिल कसे मोजतात. व त्यानुसार मुलांनी गावातील प्रत्येक घराचा विजेचा वापर नेमका किती होतो ते शोधून काढले, मग सर्वांकडून गोळा झालेली प्रश्नावलीची उत्तरे एकत्र करून, पूर्ण गावातील विजेचा वापर व खर्च किती होतो हे त्यांनी शोधून काढले. त्यावरून मग सरासरी प्रत्येक घराचा विजेचा वापर काढला. त्यांच्या हे लक्षात आले कि गावात १०० watt चे बल्ब खूप आहेत व त्यांची गरज नाही. कमी क्षमतेचे बल्ब देखील चालतील.

मुलांनी बैठकीत चर्चा केली कि गावातील लोकांना हे कसे पटवून द्यायचे. व हे सर्व केल्यावर मग मुलांनी प्रत्येक घरी जाऊन लोकांना समजून सांगितले कि त्यांच्या घरचा विजेचा वापर कसा कसा होतो आहे, सरासरीपेक्षा जास्त आहे कि कमी आहे, कुठे कुठे बचत करता येईल व ती किती रुपयांची असेल, सर्वांनी बचत केली तर गावाचे किती पैसे वाचतील ई.

आपण पाहिले असेल, पहिल्या गटातील मुलांचे काम खूपच सोयीस्कर होते. त्यांनी कुठेतरी, काहीतरी ऐकलेली माहिती स्वत: न तपासून पहाता, लोकांना त्याची गरज आहे का हे तपासून न पहाता लोकांवर माहितीचा भडीमार केला. म्हणजे त्यातून लोकांना देखील काही ठोस मिळाले नाही व मुलांच्या ज्ञानात देखील भर पडली नाही. या उलट दुसऱ्या गटातील मुले जेव्हा लोकांमध्ये जागृती करतील तेव्हा लोक त्यांचे ऐकतील व चांगला बदल घडू शकेल, व त्यांनी प्रया श्नाचा केलेला अभ्यास त्यांना पुढे देखील कामी येईल.
ही सगळी कमाल आहे मुलांनी केलेल्या संशोधनाची! व संशोधनामध्ये सर्वेक्षणाचे महत्व खूप आहे.

चला तर मग जाणून घेऊया सर्वेक्षण म्हणजे काय?

सर्वेक्षण म्हणजे एखाद्या विषयाचा शास्त्रशुध्द अभ्यास करणे, त्या विषयासंबंधी माहिती संकलित करणे आणि संकलित माहितीचे विश्लेषण करून त्या माहितीची लिखित स्वरुपात मांडणी करणे.
उदा.
  •  एखादी घटना घडली तिचे परिणाम समजून घेण्यासाठी त्याच्या आधीचे व नंतरचे सर्वेक्षण
  •  एखाद्या विषयाचा तुलनात्मक अभ्यास
  • विश्लेषणात्मक अभ्यास

सर्वेक्षण हे मुख्यतः एखाद्या व्यक्तीचे / समुहाचे विचार, मत किंवा भावना जाणून घेण्यासाठी किंवा आकडेवारी, माहिती संकलित करण्यासाठी केले जाते. त्यासाठी प्रश्नावलीचा उपयोग केल्या जातो.

सर्वेक्षणाची अनेक उद्दिष्टे असू शकतात. उदा. सरकारला शाळेसाठी असणाऱ्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणी विषयीची माहिती हवी असते. एखादी योजना शाळेत कशाप्रकारे राबविली जात आहे या संबंधीची माहिती सामाजिक सर्वेक्षण करूनच मिळवणे शक्य असते.
किंवा उदा. जर आपल्याला आपल्या गावातल्या मुलांची शैक्षणिक स्थिती समजून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण दोन मुख्य प्रश्नांचा अभ्यास करू शकतो.

·         आपल्या गावातील किती मुले नियमित शाळेत जातात?
·         जी मुले शाळेत जात नाहीत, त्यांच्या शाळेत न जाण्यामागची नेमकी कारणे काय?

प्रश्नावलीचा उपयोग करून अशा कुठल्याही विषयासंबंधीची शास्त्रशुद्ध व विश्वसनीय माहिती गोळा करता येऊ शकते व त्यावरून अधिक चांगले उपाय सुचवता येऊ शकतात. अन्यथा संशोधनाच्या अभावी  बऱ्याच वेळा ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ अशी परिस्थिती असते.

सर्वेक्षणाचे टप्पे

       १.       सर्वेक्षणाचा विषय ठरवणे
  
       २.       सर्वेक्षण कुठे, कधी आणि कसे करायचे हे ठरवणे
   
       ३.       प्रश्नावली बनवणे

       ४.       मार्गदर्शी/ नमुना सर्वेक्षण

        ५.       प्रश्नावलीत काही बदल हवे असल्यास ते बदल करणे

        ६.       काही बदल नसतील तर माहितीचे संकलन व विश्लेषण

        ७.       अहवाल लेखन

प्रश्नावली कशी बनवावी?
  • प्रश्नावली काळजीपूर्वक तयार करावी लागते. प्रश्नांचा क्रम व त्यांची एकमेकांशी संगती, त्यांचे शब्दस्वरूप, उत्तराकरिता सोडलेली जागा इ. गोष्टींचा निट व आधीच विचार करावा.
  • काही प्रश्न ‘होय’, ‘नाही’ या स्वरूपाचे, तर काही प्रश्नांची लांब उत्तरे असतात, त्यासाठी योग्य जागा ठेवावी.
  • प्रश्नावलीच्या सुरवातीलाच ही सर्व माहिती खाजगी व गुप्त ठेवली जाईल अशी हमी स्पष्टपणे छापलेली असावी.
  • प्रश्नांचे उत्तर समोरच्याला सहज देता येईल इतका तो स्पष्ट असावा. 
  • प्रश्नावली लांब व कंटाळवाणी नसावी, कारण त्यामुळे माहितीची विश्वसनीयता कमी होते.
  •  नमुना सर्वेक्षणातील अनुभव येथेही उपयोगी पडतो.
       सर्वेक्षणाच्या पूर्वतयारीच्या काळात आवश्यक वाटल्यास एक मार्गदर्शी/ नमुना सर्वेक्षण लहान प्रमाणावर घेतले जावे. नमुना सर्वेक्षण म्हणजे मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करण्या आधी लहान प्रमाणावर ते करून पाहणे. त्याचे मुख्य दोन फायदे असतात.

       १.      कोणत्या प्रश्नांस समाधानकारक उत्तरे मिळतात, कोणास मिळत नाहीत हे कळते. कोणत्या प्रश्नात बदल करण्याची गरज आहे, कोणते नवे प्रश्न घालावेत किंवा दिलेल्या प्रश्नांचा क्रम बदलावा हे समजते

        २.           आपल्याकडून अधिक सुधारणेची काय गरज आहे हे देखील कळते

माहिती मिळवण्याचे नियम

-    दिलेली सर्व माहिती गुप्त व खाजगी समजली जाईल, ती इतर कोणालाही समजणार नाही याबद्दल उत्तर देणाऱ्या व्यक्तीला प्रथमच हमी द्यावी.

-    सर्वेक्षणाचे उद्दिष्ट समजावून देऊन त्या व्यक्तीला विश्वासात घ्यावे.

    -    उत्तर देण्यार्याच्या सोयीने व कलाने घ्यावे. आपल्या वागणुकीमुळे तो नाराज होऊन माहिती नाकारण्याचा धोका तलाव.

    -    त्याचबरोबर माहिती विश्वसनीय मिळेल याची काळजी घ्यावी.
  
       विश्लेषण व अहवाल:

       संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण करून व त्याची निट मांडणी करून अहवाल लिहावा. व योग्य व्यक्तींपर्यंत तो अहवाल पोचवावा त्यामुळे अहवालातून आलेल्या निष्कर्षाचा प्रत्यक्ष उपयोग होईल.. 

कृती:

  • आपल्या परिसरामध्ये एखाद्या विषयावर सर्वेक्षण करण्याची गरज आहे का यावर गटात चर्चा करा.
  • जर तशी गरज असेल तर सर्वेक्षण कधी, कुठे, कुणाचे आणि कसे करायचे, प्रश्नावलीत काय प्रश्न असावेत इ. गोष्टी मुलांनीच ठरवाव्या.
  •  मार्गदर्शी/ नमुना सर्वेक्षण करावे
  • माहितीचे संकलन करून त्यावर अहवाल तयार करावा.
  • हा अहवाल व सर्वेक्षण कसे केले याची गोष्ट आम्हाला लिहुन पाठवा, भरारी च्या माध्यमातून ती आपण सर्वांशी शेअर करू व त्या गटाला मिळेल एक छानशी भेट!