Sunday 31 January 2016

उल्लेखनीय कृती कार्यक्रम


जय ज्योती गट उमरी

कुमार निर्माणच्या उमरी गावातील गटातले मुले ज्या शाळेत जातात ती शाळा गावापासून थोडी अंतरावर आहे. परिसरात दुसरी मोठी शाळा नसल्याने आसपासच्या गावातील मुलेही या शाळेत येतात. शाळा लगेचच बाहेर गावातील मुलांना जाण्यासाठी सोयीची अशी एक बस आहे. पण शाळेजवळ बसथांब्याची पाटी नसल्याने बस तिथे थांबत नव्हती. मुले गावात जाईपर्यंत बस निघून गेलेली असायची. मग मुलांना ६:३० पर्यंत बसची वाट बघत थांबावे लागे किंवा मग पायपीट करत घर गाठावं लागे.
कुमार निर्माणच्या गटाच्या हे निदर्शनात आल्यावर त्यांनी बैठक बोलावली व बैठकीत चर्चा केली. बैठकीत असं कळालं की शाळेजवळ बसथांबा आहे पण बस थांब्याची पाटी नसल्याने येथे बस थांबत नाही. मग आपण ती पाटी बसवूया असं मुलांनी ठरवलं. पण मग पाटी बसवायची तर खर्च येणार तो खर्च कसा करायचा याच्यावरही बैठकीत चर्चा झाली. खर्चासाठी मुलांनी त्यांच्या त्यांच्यामध्ये वर्गणी केली. जमलेल्या पैश्यातून पाटी बनवून मुलांनी ती शाळेजवळ बसवली. आता नियमित पणे बस शाळेजवळ थांबते आणि बाहेर गावातील मुलांना घेऊन जाते.






जाणीव गट चौसाळा
जाणीव गटाचीबैठक सुरु असताना काय करता येयील या विषयी चर्चा सुरु होती. निमंत्रकांनी त्यांना तिसरीच्या वर्गात बोलावले होते. तेव्हा मुलांना दिसले की तिसरीच्या मुलांना अभ्यासक्रमात खवा-भट्टी विषयी माहिती दिलेली आहे. त्यांच्या गावातच खवा-भट्टी आहे. तेव्हा मुलांनी ठरवले की आपण तिसरीच्या मुलांना प्रत्यक्ष खवा-भट्टी बघायला नेवूया. त्यांनी निमंत्राकाना ही कल्पना सांगितल्यावर निमंत्राकानीही आनंदाने परवानगी दिली.
मग मात्र मुले कामाला लागली त्यांनी तिसरीतील मुलांची कसून तैयारी करून घेतली. जातानी कसं जायचं,


तिथे गेल्यावर काय काय बघायचं, काय प्रश्न विचारायचे, परत येतानी कसं यायचं. ही सगळी तैय्यारी जाणीव गटाच्या मुलांनी तिसरीच्या मुलांकडून करून घेतली. सगळी तैयारी झाल्यावर मग ठरल्या प्रमाणे जाणीव गटाची मुले तिसरीतील मुलांना शिस्तीत खवा-भट्टी बघायला घेऊन गेले. तिथे तिसरीच्या मुलांनी प्रश्न विचारले आणि शिस्तीमध्ये सगळी मुले भेट आटोपून परत शाळेत आली.
जाणीव गटातील मुलांनी तिसरीतील मुलांसोबत फोटो काढले. तिसरीतील मुलांची आणि जाणीव गटातील मुलांची आता छान दोस्ती झालीय. या मुलांनी आम्हाला खवा-भट्टी दाखवली मग आम्ही पण जमेल तेव्हा त्यांना मदत करू अशी तिसरीतील मुलांची प्रतिक्रिया होती.




जय क्रांती गट उमरी
कुमार निर्माण च्या उमरी गावातील जय ज्योती गटातील विकास, कृष्णा आणि बाकीचे मित्र टेकडीवर फिरायला गेले होते. नवरात्रीच्या दिवसात गावाच्या जवळील याच टेकडीवरील देवीच्या दर्शनाला गावातील स्त्रिया जातात. नवरात्र असल्याने जास्तीत जास्त बायकांच्या पायात चप्पल नसते. या मुलांना फिरताना असं दिसलं की अनवाणी असल्यानी स्त्रियांना पायऱ्या वरील खडे टोचतात व त्यांना त्रास होतो. यावर त्यांना वाटलं की आपण आपण या पायऱ्या झाडून साफ करूया. आणि जय ज्योती गटाच्या मुलांनी लगेच तो विचार अमलात आणला. या मुलांनी लगेच सगळ्या पायऱ्या झाडून साफ केल्या. देवीच्या दर्शनाला येणाऱ्या बायांनी त्याचं कौतुक केलं.
औरंगाबाद गट
औरंगाबादच्या गटातील एका मुलाने वृत्तपत्रात अशी बातमी वाचली की ‘औरंगाबाद शहरात इथून पुढे प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणलेली असून आता विक्रेत्यांना प्लास्टिक पिशव्या वापरण्यास मनाई आहे.’


ही बातमी वाचून गटाने बैठक घेऊन चर्चा केली की यावर आपण काही करू शकतो का. चर्चेअंती गटाने असं ठरवलं की ‘आपण कागदी पिशव्या बनवून सातारा परिसरातील काही औषध विक्रेत्यांना तसेच काही भाजी विक्रेत्यांना द्यायच्या.’
संक्रांतीच्या निमित्ताने गटाने जवळपास १५० कागदी पिशव्या बनवल्या आणि ठरल्याप्रमाणे परिसरातील औषध व भाजी विक्रेत्यांना दिल्या. आणि सोबतच या विक्रेत्यांना प्लास्टिक वापराचे तोटे समजावून सांगितले.
आम्ही जेव्हा गटाला भेट दिली तेव्हा गटाने आम्हाला वरील उपक्रम सांगितला आणि हे सगळं सांगताना मुलांना खूप आनंद होत होता. या भेटीत गटाने आम्हालाही त्यांनी बनवलेल्या सुंदर कागदी पिशव्या संक्रांतीनिमित्त भेट म्हणून दिल्या.


जाणीव गट चौसाळा
कुमार निर्माण टीम च्या चौसाळा भेटीदरम्यान मुलांशी बऱ्याच प्रश्नांवर चर्चा झाली होती. त्यापैकी एक म्हणजे शाळेच्या मैदानावर पसरलेली खडी. मुलांना खेळतानी ही खडी पायाला टोचायची. चालतानी चप्पल नसली तर खडीमुळे त्रास व्हायचा. चर्चेत मुलांनी ठरवले की आपण ही खडी उचलून एका जागी टाकू जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही.


मग काय एके दिवशी जाणीव गटाची मुले कामाला लागली. त्याचं बघून तिसरीतील मुलेही मग त्यांना मदत करायला आली. सगळ्यांनी मिळून खडी एकत्र केली आणि परत खडी कोणी पसरवून देवू नये म्हणून त्यावर काटेही टाकले.

पहिले जाणीव गटाच्या मुलांनी तिसरीतील मुलांना खवा-भट्टी बघायला नेऊन त्यांना मदत केली होती तर आता तिसरीतील मुलांनी जाणीव गटाच्या मुलांना त्यांच्या कामात मदत केली यामुळे त्यांची आता छान गट्टी जमलीय. 

No comments:

Post a Comment