Tuesday 31 May 2016

संपादकीय

नमस्कार दोस्तांनो,

काय मग? सुट्ट्यांची धम्माल चालू असेल तुमची आत्ता! मज्जा-मस्ती, दिवसभर खेळणं, मामाच्या गावाला जाणं, कुटुंबासोबत मस्तपैकी फिरायला जाणं, स्वतःचे छंद जोपासणं आणि बरंच काही... आणि आत्ता एक भारी गोष्ट म्हणजे लवकरच तुमची शाळा आणि पाऊस सोबतच सुरु होतील. तुम्ही सर्वजण वरच्या वर्गात जाल. मग नवीन मित्र, नवीन वह्या-पुस्तकांचा तो छान सुवास नी त्यासोबतच पाऊस पडल्यावर येणारा मातीचा मंद सुवास! अहाहा!

मित्रांनो, लवकरच तुम्ही आता कुमार निर्माणच्याही पुढील वर्षात जाल. वर्षभर केलेल्या कौतुकास्पद कृतिकार्यक्रमांनंतर तुम्हाला नक्कीच छान वाटत असेल. म्हणून गटातील अनुभवी व मोठी मुलं म्हणून आम्ही तुमच्यावर एक जबाबदारी देतोय. ती म्हणजे तुम्ही केलेल्या कृतिकार्यक्रमांबद्दल, त्यांतल्या मजेबद्दल आणि अर्थातच कुमार निर्माणबद्दल आपल्या इतर मित्रांना, भावंडाना नक्की सांगा आणि निमंत्रकाच्या मदतीने त्यांनाही तुमच्या गटात सामील करून घ्या.

या अंकात ‘उन्हाळी कुमार निर्माण’ या २ गटांसाठी पहिल्यांदाच केलेल्या भन्नाट प्रयोगाचा वृत्तांत तसेच ‘सक्षम’ गटाचा भेट वृत्तांत देत आहोत. सोबत तुमच्याच वयाच्या धाडसी ‘मलाला’ची गोष्ट आणि ‘१० वी फ’ या तुमच्याच वयाच्या मुलांच्या सिनेमातील एक गाणं देखील देत आहोत.

आम्हाला खात्री आहे की सुट्ट्यांमधल्या मजेसोबत तुम्ही कुमार निर्माणचे विद्यार्थी म्हणून आपापल्या वैयक्तिक पातळीवर किंवा आपल्या नवीन मित्रांसोबत तसेच भावंडांसोबत नक्कीच काही कृतिकार्यक्रम केले असतील. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र आल्यावर लगेच गटाची एक बैठक घ्या व सुट्ट्यांमध्ये केलेले उपक्रम त्याबरोबरच तुम्हाला आलेले अनुभव गटात शेअर करा आणि नेहमीप्रमाणे आम्हालाही फोनवर कळवा किंवा लिहून पाठवा.

आता लवकरच म्हणजे जुलै महिन्यात आपण सर्वजण तुम्ही वर्षभर केलेल्या कृतिकार्यक्रमांचे व तुमचे कौतुक करण्यासाठी पुन्हा भेटतोय! या भेटीत आपल्या विभागातील इतर गटांतील मित्रमैत्रीणीना भेटूया, तुम्ही सर्वांनी संपूर्ण वर्षभरात केलेले कृतिकार्यक्रम समजून घेऊया आणि सोबतच ‘उन्हाळी कुमार निर्माण’ च्या दोन्ही गटांनी केलेले कृतिकार्यक्रमही समजून घेऊया.
या कार्यशाळेत तुम्ही थोडी तयारी नक्कीच करून येऊ शकता. ती म्हणजे, तुमच्या गटाला किंवा गटातील एखाद्या मित्रमैत्रिणीला जर एखादे छोटे नाटक, नाट्यछटा, गाणे किंवा नाच यातलं काहीही येत असल्यास त्याची छान तयारी करून या आणि कार्यशाळेत सादर करा.

याशिवाय आता लवकरच बहुतेकांचा आवडता ऋतू अर्थातच पावसाळा सुरु होतोय. पावसाळ्याचा खूप आनंद लुटा, मस्तपैकी गटासोबत व इतर मित्रांसोबत हुंदडायला जा, अंगणात कागदाच्या होड्या सोडा, पावसाळ्यात तुम्हाला तुमच्या आजूबाजूला नवनवीन पक्षी दिसतील, त्यांचेही निरीक्षण करा. खूप खूप मजा करा!  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही या पावसाळ्यात जर कुठे फिरायला गेलात तर गटाचे अनुभव नक्कीच आम्हाला कळवा.

लवकरच भेटूया आणि दिवसभर खूप खूप धम्माल करूया!
-टीम कुमार निर्माण


उन्हाळी कुमार निर्माण

यावर्षी कुमार निर्माण अंतर्गत ‘उन्हाळी कुमार निर्माण’चा एक भन्नाट प्रयोग करण्यात आला. तुम्हा मुलांसोबतच इतरही मुलांना त्याचा आनंद घेता यावा हे त्याचं मुख्य उद्धिष्ट आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या झाल्या साधारण सगळीकडे निरनिराळ्या प्रकारच्या शिबिरांची सुरुवात झालेली असते. सुट्ट्यांत आपल्या मनासाखं काहीतरी आपल्याला करायचं असतं. पण या कॅम्प मुळे तसं काही आपल्याला करता येत नाही म्हणून सुट्ट्यांमध्ये आपल्या परिसरात आपल्याला काही भन्नाट करता येईल का हे बघण्यासाठी.. नव्हे असं कही तरी भन्नाट करण्यासाठी यावर्षी उन्हाळी कुमार निर्माणचा प्रयोग करण्यात आला. या उद्देशाने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी ‘उन्हाळी कुमार निर्माण’चे एकदिवसीय शिबीर आयोजित केले. त्यात आधीच ठरवल्याप्रमाणे मैत्री, उन्हाळा आणि आजी-आजोबा या ३ विषयांवर भर देण्यात आली.  खेळाच्या व चर्चेच्या माध्यमातून दोन्ही गटातल्या मुलांनी अनेक प्रकारचे कृतिकार्यक्रम सुचवले आणि ते सुट्टीत करण्याचे ठरवले. या दोन्ही शिबिरांचा वृत्तांत देत आहोत.

नेचर गट- एरंडोल
१८ एप्रिलला आम्ही (प्रणाली व शैलेश) आणि वर्धिष्णू गटाचा निमंत्रक अद्वैत असे तिघे सकाळी ११च्या सुमारास एरंडोल येथे पोचलो. शिबीर एरंडोल येथील ‘सम्यक स्कूल’ मध्ये होते. आम्ही तिथे पोचलो तेव्हा मुले आमची वाटच पाहत होती. शिबिरासाठी नेचर गटाची ११ मुले जमली होती. मुलांशी आधीच्या भेटीमुळे ओळख झालेली असल्याने ती अगदी मोकळेपणाने बोलत होती. गेल्यानंतर सुरवातीला मुलांसोबत एक खेळ घेतला आणि मग ‘सुट्ट्यांमध्ये आपण काय करू शकतो?’ यावरून गटासोबत चर्चा सुरु करण्यात आली. आधीच ठरवल्याप्रमाणे मुलांनी विशेष करून ‘मैत्री, उन्हाळा आणि आजी-आजोबा’ या आणि इतर विषयांवर बरेच कृतिकार्यक्रम सुचवले व ते कसे करता येतील यावरही चर्चा केली. मुलांनी एकटयाने करता येणारे तसेच गटात करता येतील असे छान कृतिकार्यक्रम सुचवले.


कृतिकार्यक्रम
·       आर. ओ. फिल्टरचे पाणी वाया जातं, ते भांडी,कपडे धुण्यासाठी वापरू शकतो.
·     उन्हामुळे रस्त्यांवरील किंवा गरीब मुलांना त्रास होतो त्यामुळे आपल्याकडे जर जादा चप्लिचे जोड असतील तर आपण ते या मुलांना देऊ शकतो तसेच जमलं तर कपडेही देऊ शकतो.
·       उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना सावलीत दाणे आणि पाणी ठेऊ शकतो
·       वापरलेले पाणी फेकण्यापेक्षा झाडांना टाकणे 
·       दुपारी फावल्या वेळात नवनवीन खेळ शोधून काढणे 
·       मित्रांसोबत एकत्र बसून किंवा एकटयाने पुस्तकं वाचणे 
·       घरातील काही कामे शिकणे (स्वैपाक, बाजारातील खरेदी, बँकेची कामे इ.) 
·       आजी-आजोबाना स्वतःच्या हाताने काहीतरी सरप्राईज गिफ्ट बनवून देणे 
·       आजी-आजोबांकडून जुन्या गोष्टी-गाणे ऐकणे व लिहून घेणे 
·       जवळच्या वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या आजी-आजोबाना भेटणे, त्यांच्यासोबत खेळणे आणि गप्पा मारणे 
·       सुट्टीत नवीन मित्र बनवणे 
·       मित्रांसोबत मज्जा-मस्ती करणे, खूप खेळणे इ. इ.

चर्चेनंतर मुलांनी एका कार्डशीट वर वरील सर्व कृतिकार्यक्रम एकत्रितपणे लिहून काढले आणि आपापल्या वहीतही लिहिले. सुट्ट्यांमध्ये जे काही कृतिकार्यक्रम केले जातील त्याचे अनुभव व शेअरिंग मुलांनी या वह्यांमध्ये लिहिण्याचे ठरवले. शिबिराचा शेवट ‘इहा..’ या खेळाने करावा हे मुलांनी आधीच ठरवल्याने शिबिराचा शेवट ‘इहा..’ या खेळाने झाला.

शिरूर गट
शिरूर येथील डॉ. सोनाली हार्दे आणि त्यांच्या काही मैत्रिणींनी मिळून ३० ते ४० मुलांचा शिरूरमध्ये गट तयार केलाय. हा गट मुलांसाठी संस्कार वर्ग चालवतात व त्या माध्यमातून निरनिराळे उपक्रम करतात. गटातली मुले खूप अॅक्टीव आहेत. तिथल्या मुलांसोबत ‘उन्हाळी कुमार निर्माण’ हा उपक्रम घेतला.

२८ एप्रिलला आम्ही (प्रणाली, शैलेश आणि श्रुती) संध्याकाळी ४ वाजता शिरूरला पोचलो. ४थी ते ५वी च्या वयोगटातील साधारण २२ मुले-मुली जमली होती. मुलांसोबत त्यांचे काही महिला पालक आणि सोनाली ताईंचा मैत्रिणींचा गटही जमला होता. आम्ही तिथे काय करणार आहोत याविषयी मुलांमध्ये खूपच कुतूहल होतं.
सुरवातीला मेमरी गेम घेऊन मुलांशी व कार्यकर्त्यांशी ओळख करून घेतली. मुलांनी खेळाचा खूप आनंद लुटला आणि त्यामुळे ती बऱ्यापैकी खुलली. नंतर मुलांचे ३ गट करून ‘आपण सुट्ट्यामध्ये काय काय करू शकतो?’ यावर प्रत्येक गटात बसून चर्चा केली. नेचर गटाप्रमाणे याही गटात ‘मैत्री, उन्हाळा आणि आजी-आजोबा’ या ३ गोष्टींवर जास्त भर देण्यात आला. चर्चेदरम्यान मुलांनी बऱ्याच गोष्टी सुचवल्या ज्याचे कृतिकार्यक्रम होऊ शकतात. प्रत्येक गटाने सुचवलेले कृतिकार्यक्रम एकत्रितपणे फळ्यावर लिहिले व ते कशाप्रकारे करता येतील यावर चर्चा केली. ही मुले बरीच अॅक्टीव असल्याने त्यांनी खूप चांगले असे कृतिकार्यक्रम सुचवले.

कृतिकार्यक्रम
मित्र-मैत्रिणींनी मिळून फिरायला जाऊन मोठया व्यक्तीच्या मदतीने आकाश दर्शन करणे 
·       आपल्या लहान भावंडासोबत खेळणे तसेच शेजारच्या लहान मुलांसोबत खेळणे 
·       स्वतः पाणी कमी वापरणे व इतरांनाही पाण्याचे महत्व समजावून सांगणे 
·       ओला व सुका कचरा वेगळा करणे 
·       आर. ओ. फिल्टरचे पाणी वाया न जाऊ देता त्याचा वापर करणे 
·       पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवणे 
·       वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये रोपे लावणे 
·       सगळ्या मित्रांनी मिळून कागदी पिशव्या बनवणे व त्या स्वतःसोबत घरातल्यांनाही वापरायला सांगणे 
·       घरच्या झाडांना पाणी घालणे 
·       पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी बिया जमवणे 
·       आपल्या आजी-आजोबांना तसेच शेजारच्या आजी-आजोबांना मदत करणे 
·       आजी-आजोबांना वेळ देणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे, त्यांना छानसं पत्र पाठवणे 
·       अनाथ आश्रमास भेट देऊन तिथल्या  मुलांसोबत खेळणे आणि त्यांना पुस्तके भेट देणे 
·       सुट्ट्यांमध्ये आपले छंद जोपासणे 
·       नवीन मित्र बनवणे इ. इ.

नंतर मुलांना घरी स्वतःजवळ ठेवण्यासाठी वह्या दिल्या ज्यात मुलांनी तिन्ही गटांनी सुचवलेले कृतिकार्यक्रम लिहून घेतले. आणि  मुलांनी आम्हाला यातले जे जे काही शक्य होईल ते ते सुट्ट्यांमध्ये करण्याचे प्रॉमिस केले. संपूर्ण वेळ मुलांचा उत्साह खूपच भन्नाट होता.मुलांनी सुचवलेल्या कृतिकार्यक्रमांमध्ये गटाने तसेच एकटयाने करता येणारे कृतिकार्यक्रम होते. नंतर शैलेशने कार्यकर्त्याना एका छोटया अॅक्टीविटीच्या मदतीने कुमार निर्माणची ओळख करून दिली.
मुलांच्या इच्छेप्रमाणे ‘प्रश्न विचारू पुन्हा पुन्हा’ या गाण्याने सेशनचा शेवट झाला. सुरवातीला अनोळखी असलेल्या मुलांनी शेवटी निघताना ‘पुन्हा आमच्याकडे नक्की या’ असं बजावून सांगून आम्हाला आपलसं करून घेतलं. एकूण नवीन मुलांसोबतचा अनुभव खूपच छान होता आणि अर्थातच आम्हालाही नवीन मित्र मिळाले.

दोन्ही गटातील मुलांना ‘उन्हाळी कुमार निर्माण’ ची संकल्पना खूप आवडली. दोन्ही गट जे कृतिकार्यक्रम करणार आहेत त्याचे अनुभव शेअरिंगचे शिबीर जून मध्ये आयोजित करण्यात आले आहे. एकूण सर्वच मुलांचा सहभाग आणि प्रतिसाद खूप उत्साही होता.

गट भेट- इंदापूर

इंदापूरच्या सक्षम गटाने केलेले कृती कार्यक्रम जाणून घेण्यासाठी आणि सक्षम गटासोबत गप्पा मारण्यासाठी आम्ही सोमवारी दुपारी भर उन्हात इंदापूरला पोहचलो. तेथे मुले आमची वाट बघत हॉल मध्ये थांबलेली होती. आम्ही मग मुलांशी ओळख करून घेतली आणि गप्पा मारायला लागलो. कुमार निर्माण अंतर्गत सक्षम गटानी केलेले कृती कार्यक्रम मुलांनी आम्हाला सांगितले. या गटाने गावातील कचरा साफ करायचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी नगर परिषदेच्या इमारतीसमोरील कचरा उचलला व पुतळ्यांची सफाई केली. सफाई करतानी सुरवातीला त्यांना लाज वाटत होती पण नंतर त्यांचे काम बघून इतरलोकही त्यांच्या मदतीला आले. मग मात्र त्यांनी मन लावून काम केले. सफाई करून झाल्यावर या मुलांनी सफाई कामगारांना पुष्पगुच्छ देऊन thank you म्हटले.

 सक्षम गटातील बरीच मुले सुट्टी असल्याकारणाने बाहेर गावी गेलेली होती. गटातील नेहमीच्या मुलांसोबतच इतर उत्सुक मुलेही बैठकीस हजर होती. गप्पागोष्टी करता करता मग या सर्व मुलांनी कुमार निर्माण म्हणजे काय हे समजून घेतले. ही मुले मग कुमार निर्माण च्या संघासोबत काम करण्यास उत्सुक होती.


मुलांनी आम्हाला त्यांच्या कामाविषयी बनवलेली ppt दाखविली. नंतर आम्ही मुलांसोबत खेळ खेळलो आणि मुलांचा निरोप घेतला. मग आम्ही कुमार निर्माणचे इंदापूरच्या सक्षम गटाचे निमंत्रक श्री. रांजणकर सरांसोबत गप्पा मारल्या. त्यांचे इतर उपक्रम बघून आम्ही तेथून निघालो.

ओळख मलाला युसुफझईची

पाकिस्तानातील एक तुमच्या वयाची मुलगी. तिला शाळेत जायचं असतं. ती तशी शाळेत जातही असते. पण तालिबानी संघटना त्या परिसरातील मुलींच्या शिक्षणावर बंदी आणतात. मुलींनी शाळेत जाऊ नये असा फतवा काढतात. मग तिची शाळा बंद होते. पण तिला तर शाळेत जायला आवडायचं, तिथे तिला तिच्या मैत्रिणी भेटायच्या, त्यांच्यासोबत खेळता यायचं आणि अभ्यास करायला देखील तिला आवडायचं. तिने मग या तालिबानी संघटनांविरुद्ध आवाज उठवायला सुरवात केली. पत्रकार परिषदेत त्यांच्या विरुद्ध भाषण केलं. नंतर इंटरनेटच्या माध्यमातून तालिबानी संघटना आणि त्यांचे अत्याचार या विरुद्ध ती लिहायला लागली. तेव्हाच पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानी संघटना यांच्यात युद्ध सुरु झालं. या मुलीला, तिच्या घरच्यांना आणि गावातील इतर लोकांना गाव सोडून जावं लागलं. त्यांची शाळा पूर्णपणे बंद झाली. युद्धातील परिस्थिती आणि तिचा अनुभव ती वेगळ्या नावाने इंटरनेट वर लिहीतच होती. नंतर भाषणेही करायला लागली. आपल्या भाषणांतून ती मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने मांडायची. त्यासाठी तिला पाकिस्तानचा शांती पुरस्कार मिळाला.


मग काय, तालिबानी संघटना यामुळे तिच्यावर खूप भडकल्या. त्यांनी तिला मारण्याची धमकी दिली. पण या शूर मुलीने मात्र न घाबरता तिचे काम सुरूच ठेवले. तिची शाळा पुन्हा सुरु झाली. एक दिवस अशीच ती शाळेच्या बस मधून शाळेत जात असताना तालिबानचे दोन लोक गाडीत चढले आणि त्यांनी ती मुलगी कोण आहे अशी विचारणा केली. बाकीच्या मुलींनी तिच्याकडे बघताच त्यांनी तिच्या दिशेने गोळीबार केला. एक गोळी तिच्या एका बाजूने डोक्यातून मानेत आणि खांद्यात येऊन रुतली. तिच्या दोन इतर मैत्रिणीही या गोळीबारात जखमी झाल्या. त्यांना तातडीने मिलिटरीच्या इस्पितळात हलवण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार करून मग तिला इंग्लंड मधील दवाखान्यात हलवण्यात आले.
या घटनेमुळे ती जगभर प्रसिद्ध झाली. मुलींच्या शिक्षणासाठी तिने दिलेल्या लढ्यासाठी तिला शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आतापर्यंत तुम्ही ओळखले असेलच की ही मुलगी कोण आहे ते! हो अगदी बरोबर, ती आहे सर्वात कमी वयात नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझई.

मलालाचा जन्म पाकिस्तानातील स्वातच्या खोऱ्यातील एका गावात झाला. तिचे वडील शिक्षणाच्या चळवळीतील एक कार्यकर्ते होते. ते त्या परिसरात खासगी शाळा चालवत. सगळ्यांना शिक्षण मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती. मलाला देखील त्यांच्या शाळेत जाऊ लागली. तिला शाळेत जायला आवडायचं. तिथे तिच्या मैत्रिणी तिला भेटायच्या मग त्या मिळून अभ्यास करायच्या, खेळायच्या, गप्पा मारायच्या. पाकिस्तानातील आणि त्यातल्या त्यात स्वातच्या खोऱ्यातील भागात मुलींच्या शिक्षणालावातावरण फारसं पूरक नव्हतं. तालिबानी त्या परिसरात दहशत माजवू लागले होते.
एक दिवस मग तालिबानींनी मुलींच्या शाळा बंद करणारा फतवा काढला आणि मलालाची शाळा बंद झाली. मलालाला याबद्दल त्यांचा राग आला होता. २००८मध्ये पेशावर येथे होणाऱ्या एका पत्रकार परिषदेत मलालाचे वडील तिला घेऊन गेले. तिथे तिने एक भाषण केले. त्यात तिने ‘तालिबानची हिंमत कशी होते मुलींचा शिक्षणाचा मुलभूत हक्क हिसकावण्याची?’ असे भाषण केले. या भाषणाची दखल पाकिस्तानातील बहुतेक सर्व वृत्तपत्रांनी घेतली.
त्याचवेळेस बी.बी.सी. ही वृत्तसंस्था तालिबानचा परिसरातील वाढणारा प्रभाव दाखवण्यासाठी एक उपक्रम राबवीत होती. त्यासाठी त्यांना आपले अनुभव लिहून पाठवेल अशी लहान मुलगी हवी होती. त्यांनी मग शाळेतील मुलींना निनावीपणे इंटरनेटवर आपले अनुभव ब्लॉगच्या माध्यमातून लिहा असे आवाहन केले. पण तालिबानींना घाबरून कोणीच तयार होईना. मलालाच्याच शाळेतील एक मुलगी हे करायला तयार झाली, पण ऐनवेळी तिला धमकी मिळाल्याने तिने त्यातून माघार घेतली. शेवटी ११ वर्षांची लहान मलाला हे काम करायला तयार झाली. खरं तर हे काम अतिशय धोक्याचं होतं. तालिबानींनी तशी धमकीच देऊन ठेवली होती. तरीही मलाला ब्लॉग लिहायला तयार झाली. मग तिने ‘गुल मकई’ खोट्या नावाने आपला ब्लॉग लिहायला सुरुवात केली. तिच्या ब्लॉगमधून तिने तालिबानींचे आणि त्यांनी स्वातचे खोरे काबीज करण्यासाठी चालवलेल्या धुमाकुळाचे वर्णन करायला सुरवात केली.
तालिबानींनी परिसरात टी.व्ही. वापरण्यावर, संगीत ऐकण्यावर, मुलींच्या शिक्षणावर आणि महिलांना खरेदीसाठी बाजारात जाण्यावर बंदी आणली. तालिबानींनी मारलेल्या पोलिसांचे शव ते चौकात लटकावून ठेवू लागले. सगळीकडे भीतीचे वातावरण तयार झाले. मलाला या सत्य परिस्थितीचे वर्णन तिच्या ब्लॉगवर करतच होती.
काही दिवसांनी जेव्हा शाळेच्या परीक्षा जवळ आल्या होत्या, तेव्हा तालिबानने मुलींच्या शिक्षणावरील बंदी हटवली. मलाला आणि तिच्या मैत्रिणी पुन्हा शाळेत जाऊ लागल्या. लवकरच त्यांच्या परीक्षा झाल्या आणि त्यांना सुट्ट्या लागल्या. पण सुट्या नंतर शाळा पुन्हा सुरु होतील की नाही याची त्यांना खात्री नव्हती. शाळा संपली तेव्हाच मलालाचे ब्लॉगवर लिहिणेही बंद झाले.
मलालाचा ब्लॉग वाचून न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार अॅडम एलिक यांनी मलालाच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यांनी मलाला वर एक माहितीपट बनवला. याच दरम्यान तालिबानींचा त्रास कमी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य त्या परिसरात शिरले. तालिबानी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात लढाई सुरु झाली. तेव्हा परिसरातील सर्व लोकांना गाव सोडून दूर जाऊन रहाव लागलं. मलाला आणि तिच्या घरच्यांनादेखील गाव सोडून दूर नातेवाईकांकडे जाऊन राहावं लागलं. तिचे वडील दुसरीकडे राहिले आणि मलाला वेगळीकडे राहिली. युद्ध चालू असताना मलालाचे वडील तालीबान विरुद्ध चळवळीत सहभागी होते. त्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी तालिबान कडून देण्यात आली होती.
युद्ध संपल्यानंतर जेव्हा ते लोक परत आले तेव्हा त्यांनी बघितले की त्यांच्या घरातील बरेच सामान चोरीला गेलेले आहे. मलालाच्या घरातून टी.व्ही. आणि इतरही बरेच सामान चोरीला गेलेले होते. तरी त्यांचे घर आणि शाळा चांगल्या स्थितीत होत्या आणि बॉम्बस्फोट होऊनही बचावल्या होत्या.
माहितीपट बनल्यानंतर मग मलालाच्या पाकिस्तानातील सगळ्याच वृत्तवाहिन्यांवर मुलाखती घेण्यात आल्या. मलाला वेगळ्या नावाने ब्लॉग लिहिते हेही लोकांना माहित झाले. मलालाने तिच्या मुलाखतीमधून देखील तालिबानवर टीका केली. त्यांच्यामुलींच्या शिक्षणबंदीवर टीका केली. त्यामुळे मलाला तालिबानींच्या डोळ्यात सलू लागली.
मलालाचे काम बघून तिला  International Children's Peace Prize साठी नामांकन देण्यात आले. पण तो पुरस्कार तिला नाही मिळू शकला. मलालाला लवकरच पाकिस्तानचा पहिला National Youth Peace Prize हा पुरस्कार मिळाला. जशी मलालाची लोकप्रियता वाढू लागली तशी ती तालिबानच्या डोळ्यात अजून खुपू लागली आणि तिच्या जीवाला धोका वाढू लागला. तालिबानने तिला खुनाच्या धमक्या देणारे पत्रक बातमीपत्रांतून प्रसिद्ध केले. तिचा घराच्या दरवाजाखालून देखील अशी पत्रके टाकण्यात आली. फेसबुकवर देखील तिला धमक्या मिळायला लागल्या. पण तरीही मलालाने तिचा संघर्ष चालूच ठेवला.
एक दिवस शाळेच्या बसने शाळेत जात असताना अचानक तालिबानचे दोन लोक त्यांची गाडी अडवून गाडीत चढले. त्यांनी गाडीतील मुलींना मलाला कोण आहे असे विचारले. ‘सांगा, नाहीतर सगळ्यांना मारून टाकू’ अशी धमकी दिली. जेव्हा बाकीच्या मुलींनी मलालाकडे बघितले, तेव्हा त्या लोकांनी मलालाच्या दिशेने गोळीबार केला. एक गोळी मलालाच्या डोक्यात शिरून तिच्या मानेतून जाऊन खांद्यात घुसली. इतर गोळ्यांमुळे बसमधील इतर दोन मुली जखमी झाल्या. मलालाला लगेच मिलिटरीच्या इस्पितळात हलवण्यात आले.  तेथे तिचे ऑपरेशन करण्यात आले जे की पाच तास चालले. डॉक्टरांना तिच्या खांद्यात घुसलेली बंदुकीची गोळी काढण्यात यश आले. त्यानंतर तिला रावळपिंडी येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. पुढच्या उपचारांसाठी तिला बाहेर देशात पाठवण्याचे ठरले. बऱ्याच देशांनी तशी तयारी दर्शवली होती. तिला इंग्लंडमध्ये हलवण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार केल्यानंतर काही दिवसांनी ती ठीक झाली.
तालिबाननी तीच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे जगातील सर्व देशांचे लक्ष मलाला कडे वेधल्या गेले. सर्व जगातून तिला पाठींबा मिळाला. जगभर तिचे कौतुक झाले. तालिबानवर सगळीकडून टीकांचा भडीमार झाला. पाकिस्तानातील ५० मौलवींनी तालिबान विरुद्ध फतवा काढला.
त्यानंतर तिने संयुक्त राष्ट्रासमोर भाषण केले. संयुक्त राष्ट्रासमोर एवढ्या लहान व्यक्तीने भाषण करण्याची ही पहिलीच वेळ होती. १० ऑक्टोबर २०१४ मध्ये तिला कैलाश सत्यार्थी यांच्या समवेत शांतीसाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. ती हा पुरस्कार पटकावणारी सर्वात लहान व्यक्ती ठरली.
१२ जुलै २०१५ रोजी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने लेबनॉन मध्ये सिरीयन स्थलांतरित मुलांसाठी शाळा सुरु केली.
अशाचप्रकारे मुलींच्या शिक्षणासाठी आणि जागतिक शांततेसाठी काम करीत राहण्याची तिची इच्छा तिने वेळोवेळी तिच्या भाषणांमधून व्यक्त केलीये आणि त्या नुसार ती काम करतीय.
तिच्या कामासाठी तिला कुमार निर्माण कडून शुभेच्छा.
कृती
नोबेल पुरस्कार समारंभात  मलालाने केलेले भाषण मिळवून वाचा. त्यावर चर्चा करा.

  

थोडक्यात पण महत्वाचे

कुमार निर्माण अंतर्गत पुढील वर्षीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होईल. प्रवेश प्रक्रिया खालीलप्रमाणे पार पडेल.

1. इच्छुक निमंत्रक प्रवेश अर्ज भरून पाठवतील.
2. प्रवेश अर्जांची छाननी होऊन योग्य उमेदवारांशी संपर्क साधला जाईल व त्यांची मुलाखत घेतली जाईल.
3. अंतिम निवड झालेल्या निमंत्रकांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाईल.

जुन्या गटांच्या निमंत्रकांनीदेखील आपला प्रवेश अर्ज भरून पाठवायचा आहे.
प्रवेश अर्जासाठी कुठलेही शुल्क नाही.
या वर्षी मर्यादित गटांनाच प्रवेश मिळेल म्हणून लवकरात लवकर संपर्क करा आपला प्रवेश निश्चित करा.


गोष्ट - इसापनीती

खेड्यातला उंदीर व शहरातला उंदीर


एक साधा भोळा खेड्यातला उंदीर होता. त्याच्याकडे एक धष्टपुष्ट व गोजिरवाणा असा शहरातला उंदीर आला. खेड्यातल्या उंदराने आपल्या पाहुण्याचा चांगला आदरसत्कार केला. आपल्या घरातले काही पदार्थ, जवळच्या शेतातील कोवळी कणसे, वाटाण्याच्या शेंगा व भाकरीचे तुकडे त्याला दिले. पण खेड्यातले हे अन्न त्या शहरातल्या उंदराला आवडले नाही. मग तो त्या खेड्यातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, तुला जर राग येणार नसेल तर मी थोडं मनमोकळेपणाने बोलतो. अरे अशा ह्या कंटाळवाण्या जागेत तू राहतोस कसा? हे रान, आसपास गवत, झाडं, डोंगर नि पाण्याचे ओहळ याशिवाय दुसरं काही नाही. इथल्या पक्ष्यांच्या किलबिलाटापेक्षा माणसाचा आवाज बरा नाही का ? या ओसाड रानापेक्षा राजधानी बरी म्हणायची. विचार कर आणि ही जागा सोडून माझ्याबरोबर शहरात चल, तिथे तुला बरंच सुख मिळेल.' हे सगळे वर्णन ऐकून त्या खेड्यातल्या उंदराला मोह झाला व दोघे सकाळी खेड्यातून निघून रात्री शहरात पोहोचले. थोडे पुढे गेले तर तेथे त्यांना एक मोठा वाडा दिसला. आदल्या दिवशीच तेथे लग्नसमारंभ झाला होता. त्या वाड्याच्या आत जाऊन ते स्वैपाक घरात शिरले. तेथे नाना प्रकारचे पदार्थ होते. पण माणसे कोणी नव्हती. ते पाहून खेड्यातल्या उंदराला मोठा आनंद झाला. तेव्हा शहरातला उंदीर त्याला म्हणाला, 'तू खोलीच्या मध्यभागी बस. मी एक एक पदार्थ देईन, तो खाऊन पहा आणि त्याची चव कशी काय आहे ते मला सांग !' मग तो एकेक पदार्थ आपल्या पाहुण्याला देऊ लागला व तो चाखून 'अहाहा ! काय चविष्ट
पदार्थ आहे हा !' असे म्हणून  खेड्यातला उंदीर त्याचे कौतुक करू लागला. अशा प्रकारे एक तास मोठ्या आनंदात गेला. इतक्यात स्वयंपाकघराचे दार उघडले गेले व ते पाहून दोघेही उंदीर एका कोनाड्यात जाऊन लपले. इतक्यात दोन मोठे बोके तेथे आले व त्यांनी मोठ्याने आवाज केला. तो ऐकून खेड्यातला उंदीर भीतीने घाबरला, त्याची छाती धडधडू लागली. मग तो हळूच शहरातल्या उंदराला म्हणाला, 'अरे, असंच जर तुझं शहरातलं सुख असेल तर ते तुझं तुलाच लखलाभ होवो. मला खेडंच बरं, तिथल्या रानातल्या शेंगा बर्‍या पण रात्रंदिवस जिवाला भिती असणारी ही इथली पक्वान्न मला नकोत.'
तात्पर्य : _____________________________________________________________________________
कृती
1. एका गोष्टीला अनेक तात्पर्य असू शकतात का? यावर चर्चा करावरील गोष्टीतून काय काय तात्पर्य निघू शकतील?
2. इसापनीतीच्या गोष्टींचे पुस्तक मिळवून वाचा.


कुमार गीत - सृष्टीचे मित्र आम्ही

सृष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे
ओठावर झेलू या थेंब पावसाचे... || धृ ||

अंकुरत्या बीजाला हवा ऊनवारा
मायेची छाया अन् मनाचा उबारा
पाचूचे मखमाली चित्र जीवनाचे
ओठावर झेलू या... || १ ||

लवलवत्या पात्याचे नवे गीत गाऊ
विज्ञाना ममतेचे नवे सुर देऊ
युध्द नको, शांती हवी शब्द अमृताचे
ओठावर झेलू या... || २ ||
(दहावीफ’ या  मराठी चित्रपटातून)



चित्र चर्चा

(खालील चित्रे पाहून काय वाटते? चर्चा करा. यांवर एखादी गोष्ट रचता येईल का?)