Saturday 31 December 2016

उल्लेखनीय कृतीकार्यक्रम

बस थांबा पाटी

उमरी गावातील कुमार निर्माणच्या गटातील  मुले ज्या शाळेत जातात ती शाळा गावापासून थोडी अंतरावर आहे. परिसरात दुसरी मोठी शाळा नसल्याने आसपासच्या गावातील मुलेही याच शाळेत येतात. शाळा सुटल्यानंतर, बाहेर गावातील मुलांना जाण्यासाठी सोयीस्कर अशी एक बस लगेचच आहे. पण शाळेजवळ बसथांब्याची पाटी नसल्याने बस तिथे थांबत नव्हती. मुले गावात जाईपर्यंत बस निघून गेलेली असायची. मग मुलांना ६:३० पर्यंत बसची वाट बघत थांबावे लागे किंवा मग पायपीट करत घर गाठावं लागे.
कुमार निर्माण गटाच्या हे निदर्शनात आल्यावर त्यांनी बैठक बोलावली व बैठकीत चर्चा केली. बैठकीत असं कळलं की शाळेजवळ बसथांबा आहे पण बस थांब्याची पाटी नसल्याने तेथे  बस थांबत नाही. मग आपण ती पाटी बसवूया असं मुलांनी ठरवलं. पण मग पाटी बसवायची तर खर्च येणार तो खर्च कसा करायचा याच्यावरही बैठकीत चर्चा झाली. खर्चासाठी मुलांनी त्यांच्या त्यांच्यामध्ये वर्गणी केली. जमलेल्या पैश्यातून पाटी बनवून मुलांनी ती शाळेजवळ बसवली.
आता नियमित पणे बस शाळेजवळ थांबते आणि बाहेर गावातील मुलांना घेऊन जाते.
- जय ज्योती गट , उमरी
कागदी पिशव्या
औरंगाबादच्या गटातील एका मुलाने वृत्तपत्रात अशी बातमी वाचली की ‘औरंगाबाद शहरात इथून पुढे प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणलेली असून आता विक्रेत्यांना प्लास्टिक पिशव्या वापरण्यास मनाई आहे.’
ही बातमी वाचून गटाने बैठक घेऊन चर्चा केली की यावर आपण काही करू शकतो का? चर्चेअंती गटाने असं ठरवलं की ‘आपण कागदी पिशव्या बनवून सातारा परिसरातील काही औषध विक्रेत्यांना तसेच काही भाजी विक्रेत्यांना द्यायच्या.’
संक्रांतीच्या निमित्ताने गटाने जवळपास १५० कागदी पिशव्या बनवल्या आणि ठरल्याप्रमाणे परिसरातील औषध व भाजी विक्रेत्यांना दिल्या. आणि सोबतच या विक्रेत्यांना प्लास्टिक वापराचे तोटे समजावून सांगितले.
आम्ही जेव्हा गटाला भेट दिली तेव्हा गटाने आम्हाला वरील उपक्रम सांगितला. या भेटीत गटाने आम्हालाही त्यांनी बनवलेल्या सुंदर कागदी पिशव्या संक्रांतीनिमित्त भेट म्हणून दिल्या.
- कुमार निर्माण गट, सातारा , औरंगाबाद

 मैदान सफाई
कुमार निर्माण टीम च्या चौसाळा भेटीदरम्यान मुलांशी बऱ्याच प्रश्नांवर चर्चा झाली होती. त्यापैकी एक म्हणजे शाळेच्या मैदानावर पसरलेली खडी. मुलांना खेळताना ही खडी पायाला टोचायची. चालताना चप्पल नसली तर खडीमुळे त्रास व्हायचा. चर्चेत मुलांनी ठरवले की आपण ही खडी उचलून एका जागी टाकू जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही.
मग काय एके दिवशी जाणीव गटाची मुले कामाला लागली. त्याचं बघून तिसरीतील मुलेही मग त्यांना मदत करायला आली. सगळ्यांनी मिळून खडी एकत्र केली आणि परत खडी कोणी पसरवू नये म्हणून त्यावर काटेही टाकले.
याआधी जाणीव गटाच्या मुलांनी तिसरीतील मुलांना खवा-भट्टी बघायला नेऊन त्यांना मदत केली होती तर आता तिसरीतील मुलांनी जाणीव गटाच्या मुलांना त्यांच्या कामात मदत केली यामुळे त्यांची आता छान गट्टी जमलीय.
- जाणीव गट चौसाळा
नवरात्रीत रस्ता झाडला
कुमार निर्माणच्या उमरी गावातील जय ज्योती गटातील विकास, कृष्णा आणि बाकीचे मित्र टेकडीवर फिरायला गेले होते. नवरात्र असल्याने गावातील अनेक लोक अनवाणी पायाने या टेकडीवरील देवीच्या दर्शनाला जात होते. या मुलांना फिरताना असं दिसलं की अनवाणी असल्याने दर्शनासाठी जाणाऱ्यांना पायऱ्यांवरील खडे टोचतात व त्यांना त्रास होतो. यावर त्यांना वाटलं की आपण आपण या पायऱ्या झाडून साफ करूया. आणि जय ज्योती गटाच्या मुलांनी लगेच तो विचार अमलात आणला. या मुलांनी लगेच सगळ्या पायऱ्या झाडून साफ केल्या. देवीच्या दर्शनाला येणाऱ्या महिलांनी त्याचं कौतुक केलं.
- जय ज्योती गट , उमरी
रावण दहन
दसऱ्यानिमित्त वेगळा उपक्रम करायचे असे जागृती गटाच्या १६ तारखेच्या बैठकीत निर्णय झाला. दसरा साजरा करायचा पण तो कसा? हा प्रश्न सर्वांना पडला. प्रत्येक मुलाकडे जबाबदारी देऊन काम करायचे हे ठरले. जबाबदाऱ्या अशा की रावण बनवणे, राम-लक्ष्मण, सीता, हनुमान यांची सजावट करणे, गदा बनवणे, स्वरचित घोषणांचे चार्ट बनवणे, इ. जबाबदाऱ्या गटातील मुलांकडे देण्यात आल्या. दसऱ्याच्या आदल्या दिवशी गटातील सर्व मुले उद्याच्या शोभायात्रेचे आमंत्रण देण्यासाठी डोमरी गावात गेली. सर्व लोकांनी मुलांना चांगला प्रतिसाद दिला.
शोभायात्रेचा आमचा खरा उद्देश हाच की, लोकांमधील रावणाचं प्रतिबिंब त्यांना लक्षात आणून देणं, लोकांमधील दुर्गुण त्यांना लक्षात आणून देणं. दुर्गुण म्हणजे वाईट इच्छा, आळस, भ्रष्टाचार, स्त्रीभ्रूणहत्या इ. असे हे दहा दुर्गुण रावणाच्या दहा तोंडाला लावण्यात आले. या कार्यक्रमाची तयारी मुलांनी दहा दिवस आधीच सुरू केली होती. हा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरा न करता आधुनिक पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला. रावणाची प्रतिकृती गटातील दोघांनी हाताने चित्ररुपात बनवली होती. रावणाच्या हातात बंदूक दाखवली होती, रावणाच्या पोटाला सिक्स पॅक दाखवले होते, डोक्याला गुंडासारखी टोपी दाखवली होती, अशा प्रकारे हा आधुनिक रावण होता. संपूर्ण रॅलीत गुरुकुलातील सर्व विद्यार्थी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. निसर्गाची हानी थांबवण्यासाठी हा एक प्रयोग केला की, कोणीही पारंपारिक आपट्याचा सोनं म्हणून वापर केला नाही. गटातील विद्यार्थ्यांनी स्वरचित घोषणांचे चार्ट बनवले होते. त्या चार्टमुळे शोभायात्रेची शोभा आणखी वाढली. रावण जाळल्यानंतर राहिलेला कचरा सुद्धा गटातील विद्यार्थ्यांनी अपेक्षित जागी टाकला. कार्यक्रम संपल्यानंतर गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत होता. या उपक्रमात भरपूर अनुभव व आनंद मिळाला.
जागृती गट, डोमरी
स्वच्छता अभियान
कुरूळ अलिबाग येथील गटाने परिसरातील कचऱ्याचा प्रश्न दोन वर्षांपासून उचलून धरला आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले आहेत. या गटाने हा प्रश्न कसा निवडला आणि तो सोडवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, त्यांना कोणी मदत केली आणि कोणी नाही केली ऐकुया त्यांच्याच शब्दांत.
“आम्हाला सरांनी कुमार निर्माण विषयी सांगितले आणि त्यात आपण आपला परिसर (ज्यात आपण स्वतः पण येतो) अजून सुंदर आणि आहे त्यापेक्षा एक पाऊल पुढे कसा नेऊ शकतो या साठी प्रयत्न करतो असे सांगितले. कुमार निर्माणच्या गटात काम करण्याची कोणाची इच्छा आहे असे विचारताच आम्ही हात उंचावले व आम्हाला गटात उपक्रम  राबवायला आवडतील असे सांगितले. अशा प्रकारे आम्ही कुमार निर्माणच्या गटात सामील झालो.
गटात काय कृती करायची जेणे करून परिसरात काही तरी चांगला बदल घडेल याचा आम्ही विचार करू लागलो. आमच्या शाळेसमोरच एक खड्डा आहे आणि परिसरातील लोक त्या खड्ड्यात कचरा टाकतात त्यामुळे घाण वास येतो आणि त्याचा त्रास शाळेतील मुलांना होतो. म्हणून आम्ही या खड्ड्यातील कचरा साफ करायचे असे ठरवले. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती निमित्त आम्ही या खड्डातील कचरा साफ केला. परिसरातील लोकांनी परत खड्ड्यात कचरा टाकू नये म्हणून आम्ही घरोघरी जाऊन लोकांना सागितले की या खड्ड्यात कचरा टाकू नका. तुम्ही कचरा टाकला नाही तर तुम्हालाही त्रास होणार नाही आणि आम्हालाही त्रास होणार नाही. घरातील कचरा घंटा गाडीत टाका असेही सांगितले. त्यावेळेस सगळे लोक आम्हाला हो म्हणाले. पण नंतर परत खड्ड्यात कचरा टाकू लागले आणि पुन्हा परिस्थिती पहिल्या सारखी झाली.”
खड्ड्यातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मग ही मुले ग्रामपंचायतीकडे गेली आणि त्यांना याविषयी निवेदन दिले. ग्रामपंचायतीचे अधिकारी म्हणाले की तुम्ही मुले लहान असूनही जर एवढे प्रयत्न करताय तर आम्ही पण नक्की मदत करू. ग्रामपंचायतने तिथे दोन कचराकुंड्या बसवल्या. तरी काही लोक कचरा कचरा-कुंडीच्या बाहेरच टाकत. मग आम्ही परत त्या लोकांना सांगायला गेलो की कचरा बाहेर न टाकता कचरा कुंडीतच टाका. या वेळेसही घरोघर जाऊन आम्ही सगळ्यांना समजून सांगितले. परिसरातील लोकांना आम्ही कागदाच्या व कापडी पिशव्या घरी बनवून वाटल्या. त्यांना सांगितले की प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता बाजाराला किंवा खरेदीला जाताना या कापडी पिशवा वापरा. गावातील तळ्याजवळ राहणाऱ्या लोकांनाही मुलांनी या पिशव्या दिल्या आणि त्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनाही तळ्यात कचरा न टाकण्याची विनंती मुलांनी केली.
गटाच्या या प्रयत्नांनी खड्ड्यातील कचरा कमी होण्यास चांगलीच मदत झाली. पण तरीही काही लोक खड्ड्यात कचरा टाकतातच. त्यावर मुलांनी मग त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात एक नाटिका सादर करायचे ठरवले. गटातीलच एका मुलीने यासाठी नाटक लिहले आणि त्यांनी ते वार्षिक स्नेहसंमेलनात सर्व गावकऱ्यांसमोर सादर केले. अजुनही मुलांचा लढा सुरूच आहे.
शब्दांकन -  कुमार निर्माण  टीम
जाणीव गटाला झाली जाणीव!
काल साजरा करण्यात आलेल्या विजयादशमीच्या सणानंतर आज आम्ही शाळेत आल्यावर सर्वजण एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देत होतो. आमच्या शाळेजवळच आपट्याचे झाड आहे. शाळेत सर्व मुलांनी भरपूर पाने आणली होती. ते एकमेकांना वाटल्यानंतर काही वेळातच ही पाने इकडे-तिकडे पहावयास मिळाली. मग सरांनी विचारले की, “या पानांचं आता करायचं? त्या झाडावर तर आता एकपण पण नाही राहिलंय?” यानंतर आम्ही सर्वांनी विचार केला की शुभेच्छांसोबत दिलेल्या पानांचा नंतर काहीही उपयोग झाला नाही पण तीच पाने जर झाडाला राहिली असती तर त्यांचा झाडाला उपयोग झाला असता. पर्यायाने आम्ही सर्वांनी त्या झाडाच्या अन्न प्रक्रियेमध्ये अडथळा आणून त्याचे मोठे नुकसान केले.
याचा विचार करता आम्ही ठरवले की कोणत्याही झाडांची पाने तोडायची नाही आणि इतरांना तोडू द्यायची नाही. मग आम्ही सर्व वर्गातली पाने जमा केली. शेवटी आम्ही विचार केला की आता ही तोडलेली पाने तर आपण परत झाडाला चिकटवू शकत नाही मग शेवटी आम्ही ठरवले की या जमा झालेल्या पानांचा उपयोग पुन्हा त्या झाडाला व्हावा म्हणून त्या झाडाखाली खड्डा करून त्यात ती पाने पुरून टाकली, जेणे करून त्या झाडाला त्याचे खत म्हणून उपयोग होईल.
जाणीव संघ, बीड
गट निमंत्रक: सचिन महामुनी (८२७५२६८५२४)
सारथी गटाने ठेवल्या कचरापेट्या
पवनीच्या ‘सारथी गटा’च्या ३ महिन्यांपूर्वीच्या बैठकीत काही मुलांनी असे मत मांडले की, ‘बसमधून प्रवास करणारे प्रवासी काहीही खाल्लं की सरळ खिडकीतून बाहेर फेकतात, तिकिटे सुद्धा प्रवास झाला की रस्त्यावर फेकतात’. मग यावर चर्चा झाली आणि गटाने ठरवले की पवनीतून सुटणाऱ्या सगळ्या बसेसमध्ये कचऱ्याच्या पेटया ठेवायच्या आणि तिथे जाऊन लोकांना सांगायचं की कचरा या पेट्यांमध्येच टाका. परंतु जेव्हा मुलांनी कंडक्टरना भेटून विचारले तेव्हा त्यांनी मुलांना उडवून लावले. ‘सगळ्या बसेसमध्ये आपण कचरापेट्या ठेवणं शक्य नाही’, असा विचार करून मुलांनी तो विषय डोक्यातून काढला. परंतु जेव्हा गटाच्या बैठकीत पुन्हा त्याच विषयावर चर्चा झाली तेव्हा मात्र मुलांनी ठरवलं की ‘जरी आपण सर्व बसेसमध्ये कचरापेट्या नाही ठेवू शकलो तरीही काही ठराविक ठिकाणी आपण त्या पेटया नक्कीच ठेवू शकतो.’
मागील महिन्यात मुलांनी खोक्यांना सजवून, त्यावर ‘कुमार निर्माण’चे नाव टाकून त्याच्या कचरापेटया बनवल्या. शाळा ते बस स्थानकापर्यंत रॅली काढून गावातील लोकांना साठलेल्या कचऱ्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी सांगून स्वच्छतेचा संदेश दिला. यासोबतच काही ठराविक दुकानांच्या समोर (जिथे मोठया प्रमाणावर कचरा असतो), बस स्थानक तसेच पवनी-नागपूर बसेसमध्ये मुलांनी बनवलेल्या कचरापेट्या ठेवल्या व तेथील लोकांना त्यातच कचरा टाकण्याची विनंती केली.
एका ठिकाणी कचरापेटी ठेवताना मुलांना एक गृहस्थ खर्रा खाताना दिसले. त्याबद्दल मुलांनी लिहिलेले त्यांच्याच शब्दात,
“कचरापेटी ठेवण्यासाठी आम्ही एका दुकानात गेलो. तेथे एक काका व्यसन करत होते. त्यांना आम्ही सांगितले की कृपया तुम्ही व्यसन करू नका कारण त्यामुळे कर्करोग होतो. त्यामुळे तुमच्या मूला-बाळांवरही वाईट परिणाम होतील. असं सांगितल्याबरोबर त्यांनी आपल्या तोंडातून सगळा खर्रा थुंकला व मी आजपासून कधीच व्यसन करणार नाही असे सांगितले. हे ऐकून आम्हाला खूप आनंद वाटला. आणि आजच्या कचरापेट्या ठेवण्याच्या व त्याचे दुष्परिणाम लोकांना समजावण्याच्या कामात आम्हाला यश मिळालं. आमचा हा अनुभव खूप चांगला होता.”
सारथी गट, पवनी
गट निमंत्रक: वृंदन बावनकर (९७६६३७०९५९)

चिमणीचा जीव वाचला
दिवाळीची सुट्टी होती. सर्वजण दिवाळीचा आनंद घेत होते, त्यामध्ये मी सुद्धा होतो. एके दिवशी माझी आई मला म्हणाली की शेजारच्या मोहरी या गावातील देवीला जाऊन ये.
नारळ, उदबत्ती घेऊन मी माझ्या दोन मित्रांसोबत सकाळी ९ च्या सुमारास निघालो. अर्ध्या तासात मी व माझे दोन मित्र सायकलवरून तिथे पोचलो. मंदिर डोंगरावर होते. वर जाण्यासाठी पायऱ्या होत्या. आम्ही पायऱ्या चढत होतो. तेव्हाच एका झाडाशेजारी एक चिमणी पाण्याअभावी तडफडत आहे असे माझ्या लक्षात आले.
त्या चिमणीकडे पाहून मला दुःख वाटले. काहीतरी करावे असे वाटले. चिमणीला पाणी पाजावे असे वाटले परंतु आमच्याकडे पाणी नव्हते. तेव्हा मला एक युक्ती सुचली, ती म्हणजे नारळातील पाणी त्या चिमणीला पाजणे. माझी ही युक्ती मी माझ्या मित्रांना सांगितली परंतु मित्रांनी त्याला नकार दिला. ते म्हणाले, “आपण हे नारळ देवीसाठी आणलं आहे, चिमणीसाठी नाही.” मी माझ्या मित्रांना समजावून सांगितले मग त्यांनी माझे ऐकले. आम्ही तो नारळ फोडला व त्यातले पाणी चिमणीला पाजले.
नंतर मी व माझे मित्र त्या चिमणीला घेऊन वर गेलो. तो फोडलेला नारळ देवीला ठेवला आणि त्या चिमणीला गार सावलीत ठेवले. खूप वेळ आम्ही तिथेच बसलो. नंतर थोड्यावेळाने ती चिमणी हळूहळू चालायला लागली. ते पाहून मला व माझ्या मित्रांना खूप आनंद झाला तो म्हणजे त्या चिमणीचा जीव वाचवल्याचा.
म्हणजेच एका नारळाने दोन कामे केली; एक चिमणीचा जीव वाचवण्याचे व दुसरे देवीच्या प्रसादाचे. त्या आनंदात मी घरी परतलो. त्या एका मुक्या जीवाला वाचवण्याचा आनंद तर होताच, पण मी चांगले काम केले आहे याचाही मला खूप आनंद होत होता.
किशोर ढाळे
जागृती गट
उबंटू गटाची पालक सभा
कुमार निर्माणच्या वाघोली येथील उबंटू गटाने पालक सभा आयोजित केली होती

¨ गटातील सर्व मुलांनी तसेच शिकवणीतल्या इतर मुलांनी मिळून पालक सभेचे आयोजन केले होते. अंदाजे १५ ते २० मुले होती.
¨ गटातील वीरश्री ने इंग्रजीच्या पुस्तकात एक activity वाचली होती की, ‘Ask General Knowledge questions to parents’.  मग तिने ती activity गटातील  मुलांना सांगितली आणि आपण हे घेऊ शकतो असेही सांगितले.  यासाठी गटातील मुले तयार झाली.
¨ त्यासाठी गटातील मुलांनी किर्ती ताईंसोबत मिटिंग घेतली आणि पालक सभेच्या आयोजनाविषयी चर्चा केली.  त्यात मग मुलांनी ताईना पण सरप्राईज ठेवले होते.  त्यात मुलांनी सभेचे काही नियम ठरवले होते. जसे की, मुलांनी सभेत काहीही प्रश्न विचारले तरी पालक घरी जाऊन त्यांच्या मुलांना रागावणार/मारणार नाहीत, मुलेही भान ठेऊन प्रश्न विचारतील.
¨ वीरश्रीने सांगितले की “माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं.  मी विचार करत होते की आपण पालकांना सामान्य ज्ञानाबद्दल प्रश्न विचारण्यापेक्षा आपणा सर्व मुलांच्या मनात पालकांसाठी जे प्रश्न/ समस्या आहेत ते आपण या सभेत विचारायला पाहिजे. पण मी हे मुद्दाम गटातील कुणालाच नाही सांगितले. मी मुलांना सर्व ऐनवेळेला म्हणजे सभेच्या दिवशी सांगितले. पण तरीही गटातील मुलांनी मला मदत केली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही सभा आयोजित केली.”
¨ वीरश्रीने सांगितल्याप्रमाणे गटातील मुलांना अगदी वेळेवर सभेचे खरे प्रयोजन कळले. पण तरीही मुलांनी सभा छान पार पाडली
¨ सर्व मुलांनी पालकांना ‘तुम्हाला आम्ही सामन्य ज्ञानाबद्दल प्रश्न विचारणार आहोत.’ असे खोटे सांगून बोलावले होते म्हणून सभेच्या सुरवातीला सर्व मुलांनी पालकांना Sorry म्हटले आणि पालकांना सांगितले की आम्ही तुमच्याबद्दलच्या आमच्या मनात असणाऱ्या समस्यांविषयी प्रश्न विचारणार आहोत.
¨ सभेला १५ ते २० मुले तसेच १२ ते १५ महिला पालक उपस्थित होते.
¨ मुलांनी स्वतःच्या आणि पालकांच्या नावाच्या चिठ्ठ्या बनवून त्या किर्ती ताईना उचलायला सांगितले आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी येईल त्याने प्रश्न विचारायचा असे ठरले होते.
¨ पालकांचे प्रश्न साधे  होते परंतु मुले खूप भन्नाट प्रश्न विचारीत होती. त्यांचे प्रश्न समोरच्याला विचार करायला लावणारे होते.
¨ काही मुलांच्या डोळ्यात पालकांना प्रश्न विचारायला मिळाल्याबद्दल असुरी आनंद/ बदल्याची भावना दिसून येत होती. काही मुले बिनधास्त बोलत होते
¨ प्रत्येक प्रश्नावर किर्ती ताईनी चर्चा करून शक्य तितके मुलांचे तसेच पालकांचे समाधान केले.
¨ खूप मुलांनी तसेच त्यांच्या पालकानीही एकमेकांना प्रॉमीस केले की ते त्यांच्या एकमेकांना खटकणाऱ्या गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करतील.

एकंदरीत पालक सभा भन्नाट झाली.
वैदुवाडीची पालकसभा
वैदुवाडीमध्ये असलेल्या कुमार निर्माणच्या गटाने त्यांच्या परिसरात चालणारा जुगार बंद करण्यासाठी पालक सभा आयोजित केली होती.
गटातील मुलींना वाडीतील लोक पत्ते(जुगार) खेळत बसतात ते खटकतं म्हणून त्यांनी ते बंद करायच असं ठरवलं. या कामाचीसुरुवात स्वतःच्या पालकांपासून करूया असं या गटाने ठरवलं आणि ही पालकसभा आजोजित केली. या कामात मुलींना त्याच वाडीतील एका शुभांगी ताईने मदत व मार्गदर्शन केले.
या पालक सभेला बहुतेक महिला पालक उपस्थित होत्या. पालक सभेला सुरुवात करताना वंदना ताईंनी सांगितले की तुमच्या मुलींना लोक पत्ते खेळतात हे आवडत नाही आणि त्यांनी ते पालकांना समजावून सांगून बंद करायचं, असं ठरवलं आहे. या कामात तुम्ही त्यांना पाठींबा देणार का? असा प्रश्न देखील वंदना ताईंनी विचारला. सगळ्या महिला पालकांनी गटाला या कामात पाठींबा द्यायची तयारी दर्शिवली.
महिलांनीही, त्यांनी पत्ते खेळणे बंद करण्यासाठी काय-काय प्रयत्न केले होते, पण ते कसे निष्फळ ठरले हे सांगितलं. महिलांनी अजूनही बऱ्याच समस्या सांगितल्या. त्यावर देखील चर्चा झाली.
गटातील मुलींनी त्यांची बाजू मांडली. पत्ते खेळताना लोक थुंकतात घाण करतात त्यामुळे रोगराई पसरते असे मुलींनी सांगितले. एका मुलीने दारू गुटखा पण बंद करावा असे सांगितले. एक मुलगी म्हटली की तिची आई मिसरी वापरते ते पण बंद करायचे आहे.
नंतर वंदना ताईनी पालकांना सांगितले की मुली कुमार निर्माण अंतर्गत असे अनेक उपक्रम करणार आहेत तरी तुम्ही त्यांना पाठींबा द्या.
नंतर पालकांनी मुलींनी चांगला विचार केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

शाळेच्या परिसरात भाजीपाला शेती
कुमार निर्माणच्या सोनाळे येथील गटाने शाळेच्या परिसरात शेंद्रीय पद्धतीने भाजीपाला शेती केली. त्यात गटाने भेंडी, वांगे, गिलके या भाज्या लावलेल्या आहेत. सर्व शेती मुलं सेंद्रिय पद्धतीने करतात. यासाठी त्यांनी शाळेकडून तेवढी जागा मागून घेतली आणि तिथे शेती केली. या साठीच्या जबाबदाऱ्यांची मुला-मुलींनी आपापसात वाटणी केली आणि त्यानुसार सर्वांनी कामे केली. भाजीपाल्याच्या लागवडीपासून ते त्यांच्या काढणीपर्यंत प्रत्येक वाढीची गटाने नोंद ठेवलेली आहे.
या शेतीमध्ये पिकलेला भाजीपाला मुलांनी त्यांच्या शिक्षकांना विकला उरलेला भाजीपाला गावच्या आठवडी बाजारात जाऊन देखील विकला. आलेल्या नफ्यातून मुलांनी पुढील पिकासाठीचे बियाणे खरेदी केले.
तरीदेखील जे पैसे उरले त्यातून मुलांनी शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे (पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स) वाटप देखील केले.

  

No comments:

Post a Comment