Saturday 31 December 2016

मुखपृष्ठ

या अंकात...




संपादकीय मंडळ


  
अमृत बंग
प्रफुल्ल शशिकांत
प्रणाली सिसोदिया
शैलेश जाधव
इ-मेल : contact.knirman@gmail.com
वेबसाईट : www.mkf.org.in/mso
फेसबुक : www.facebook.com/socialolympiad
संपर्क: ९४२०६५०४८४, ९५०३०६०६९८

 वर्ष दुसरे | अंक पहिला | जाने २०१७
हे द्वैमासिक खालील लिंकवर मूळ स्वरुपात वाचता येईल
(खाजगी वितरणासाठी)


संपादकीय

नमस्कार मित्रांनो,

खूप दिवसांनी आपली भेट होत आहे. विभागीय सादरीकरण आणि कौतुक सोहळ्यानंतर पुन्हा एकदा भरारीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत.
या दरम्यान बरंच काही घडून गेलं असेल. तुम्ही शाळेतील पुढच्या वर्गात गेला असाल. नव्याने शाळा पुन्हा सुरु होऊन आता सहामाही परीक्षा देखील झाली असेल. कदाचित तुम्ही भरारीची वाटही बघितली असेल. काही जणांची शाळा बदलली असेल. त्यांनी आत्तापर्यंत नवीन शाळेत नवीन मित्र बनवले असतील आणि बरंच काही घडलं असेल.
आम्हीही यादरम्यान खूप काही केलं आहे. तुमच्यासाठी या वर्षी नवीन काय काय करता येईल याचा आम्ही विचार करत होतो. यासाठी आम्ही आपले मार्गदर्शक डॉ. अभय बंग आणि श्री. विवेक सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील केली.
कुमार निर्माणच्या चौथ्या सत्रात अनेक नवीन गट आपल्या सोबत जोडल्या गेले आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील अनेक नवीन मित्र मिळणार आहेत. या नवीन मित्रांचं आपण कुमार निर्माण मध्ये स्वागत करूया. 
कुमार निर्माणच्या निमंत्रकांसाठी आम्ही नुकतीच पुणे येथे एक कार्यशाळा (कॅम्प) आयोजित केली होती. तिथे महाराष्ट्रभरातून कुमार निर्माणचे निमंत्रक एकत्र आले, आम्ही सर्वांनी मिळून खूप धमाल केली आणि खूप काही शिकलो देखील. तिथे आम्ही खेळ खेळलो, गाणी म्हटली, विविध विषयांवर चर्चा केली इ.
तर यावर्षी कुमार निर्माण मध्ये तुमच्यासाठी आम्ही खूप काही नवीन घेऊन आलोय याबद्दल खात्री बाळगा.
मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील तुम्ही अनेक भन्नाट उपक्रम कराल या बद्दल आम्हाला खात्री आहे. काही गटांनी तर सुरुवात देखील केली असेल. इतक्या दिवसांत तुम्ही काय काय केलं किंवा आजूबाजूला काय काय घडलं याविषयी आम्हाला नक्की लिहून पाठवा. एखादा नवीन उपक्रम तुम्हाला सुचला असेल किंवा केला असेल तर त्याबद्दलही कळवा.
चला तर मग कुमार निर्माण च्या नवीन सत्रात नवीन उपक्रम करण्यासाठी सज्ज होऊया. 

आणि हो आम्ही लवकरच येतोय तुमच्या भेटीला तुमच्या गावी… :)
पुढील प्रवासासाठी टीम कुमार निर्माणच्या  तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

- कुमार निर्माण टीम


कुमार निर्माण म्हणजे काय रे भाऊ !

मुलांनो तुम्ही कुमार निर्माण मध्ये सहभागी तर झालात, पण कुमार निर्माण म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का ?
चला तर मग कुमार निर्माण विषयी आपण थोडं जाणून घेऊया.
कुमार निर्माण हा निर्माण - सर्च, गडचिरोली. आणि MKCL KF, पुणे. या दोन संस्थांद्वारे तुम्हा मुलांसाठी चालवण्यात येणारा एक उपक्रम आहे.
शाळेतील शिक्षण भविष्याच्या दिशेने महत्त्वाचे असले तरी काहीवेळा ते कंटाळवाणे होऊ शकते. त्यातून थोडा बदल करून शाळेतील चार भिंतींच्या बाहेर जाऊन, प्रत्यक्ष कृती करून जर आपल्याला शिकता आलं तर शिक्षण अधिक आनंददायी होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला आनंदाने कृतीतून शिकता यावं म्हणून हा उपक्रम आहे. इथे शिकता यावं म्हणजे शाळेतील विषय शिकता येणे आपल्याला अभिप्रेत नाही तर इतरही अनेक भन्नाट गोष्टी शिकता येऊ शकतात.
मनातील चांगले उपक्रम, नवीन आईडिया, विधायक कृती, प्रयोग इ. करण्याची हक्काची जागा म्हणजे कुमार निर्माण! हा उपक्रम तुमचा असल्याने कुठलंही चांगलं काम करण्याचं तुम्हाला येथे स्वातंत्र्य आहे. चला तर मग तुमच्या बुद्धीला चालना द्या, डोकं चालवा आणि नवनवीन कल्पना करा, चांगले चांगले उपक्रम करा, इतरांना मदत करा, आपली त्यासोबतच आपल्या घरच्यांची, मित्रांची, परिसराची त्यातील व्यक्तींची, प्राण्यांची, झाडांची आणि इतरही सर्व गोष्टींची काळजी घ्या, आणि हे सगळं करत असतांना भरपूर मजा करा.
कुमार निर्माण मधील उपक्रम तुम्ही मुलांनी स्वतः निवडायचे आणि गटात चर्चा करून ठरवायचे आहेत. त्यासाठी तुम्ही तुमच्या गटासोबत काम करणाऱ्या ताई, दादा, पालक, शिक्षक यांची मदत घेऊ शकता. तुम्हाला उपक्रम सुचण्यासाठी तुम्ही परिसराकडे उघड्या डोळ्यांनी बघणे गरजेचे आहे. परिसराचे निरीक्षण करून, विचार करून, चर्चा करून उपक्रम निवडावे आणि ते राबवावे असे अपेक्षित आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला गरजेनुसार मदत करूच.
तुमच्या माहितीसाठी मागील वर्षात कुमार निर्माणच्या गटांनी केलेले काही कृती कार्यक्रम या अंकात देत आहोत. हे उपक्रम मुलांना सुचलेले आहेत आणि त्यांनीच ते प्रत्यक्षात उतरवलेले आहेत. तुम्ही देखील असे उपक्रम नक्कीच करू शकता आणि इतरही नवे उपक्रम करू शकता.
कुमार निर्माण मध्ये उपक्रम करताना एक काळजी नक्की घ्या की ते उपक्रम राबवताना कुणालाही त्रास होता कामा नये, परिसराचं नुकसान होऊ नये आणि गटातील कुणालाही इजा होता कामा नये.
चला तर मग तुम्हाला असे उपक्रम करण्यासठी अनेक शुभेच्छा. एखादा उपक्रम करताना किंवा सुचण्यास तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला देखील फोन करू शकता. त्या सोबतच उपक्रम राबवताना किंवा उपक्रम राबवल्या नंतर तुम्हाला काय अनुभव आला तेही आम्हाला नक्की लिहून अथवा फोन वर कळवा. आमचे फोन नंबर सुरुवातीला दिलेले आहेतच.
- कुमार निर्माण टीम



कुमार निर्माणची गट बैठक

मित्रांनो आता कुमार निर्माण म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात कळाले आहे. कुमार निर्माणचे उपक्रम तुम्ही चर्चा करून विचार करून आणि गटात ठरवायचे आहे हे तुम्हाला कळाले असेलच. पण मग त्यासाठी सर्वांनी एकत्र जमलं पाहिजे. म्हणून कुमार निर्माण मध्ये तुम्ही मुलांनी दर आठवड्याला कमीत कमी एकदा तरी एकत्र भेटून बैठक (मिटिंग) करणे गरजेचे आहे.
आठवड्याची बैठक कधी घ्यायची, कुठे घ्यायची हे सर्वस्वी तुम्ही मुलांनी आणि तुमच्या सोबत काम करणाऱ्या निमंत्रकांनी मिळून ठरवायचे आहे. बैठक नेहमी एकाच ठिकाणी घेणे गरजेचे नाही तुम्ही दर वेळी बैठकीचे ठिकाण बदलू शकता.
या बैठकीत तुम्ही तुम्हाला आवडेल ते करू शकता. खेळ खेळू शकता, गाणी (समूह गीत) म्हणू शकता, एकमेकांना गोष्टी सांगू शकता, विनोद सांगू शकता, कोडी सांगू शकता. हे सर्व करतानाच त्या सोबत विविध विषयांवर चर्चा, विचार आणि अभ्यासही तुम्ही या बैठकींमध्ये करणे अपेक्षित आहे. परिसरातील विविध घटकांचे निरीक्षण करणे, तुमची निरीक्षणे गटात मांडणे, त्यावर चर्चा करणे, सर्वांनी मिळून त्याचा अभ्यास करणे आणि प्रत्यक्ष कृतीकार्यक्रम ठरवणे हे सर्व देखील तुम्ही बैठकीत करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष कृती कार्यक्रम ठरवताना तो कधी करायचा, त्यासाठी साहित्य काय-काय लागेल, इतर कुणाची मदत किंवा परवानगी लागेल का ?, जबाबदारीची कामे असतील तर ती कोण करणार, प्रत्येक छोट्या छोट्या कामची जबाबदारी वाटून घेणे हे सर्व तुम्ही बैठकीमध्ये करू शकता.
आपण बैठकीमध्ये काय केलं याची माहिती नोंदवून ठेवण्यासाठी म्हणून कुमार निर्माणची एक स्वतंत्र वही तुम्ही बनवा. या नोंदवही मध्ये बैठकीची तारीख, वार, बैठकीस कोण कोण उपस्थित होतं, कशावर चर्चा झाली, कोणी काय ठळक मतं मांडली, काय निर्णय झाला, काय कृती कार्यक्रम ठरला, त्याची कोणती जबाबदारी कोणाकडे देण्यात आली याची सविस्तर नोंद ठेवा. बैठक संपताना, पुढील बैठक कधी होणार, त्यात चर्चेचा काय विषय असेल आणि दोन बैठकींच्या दरम्यान काय करणे अपेक्षित आहे याची देखील चर्चा करवी ते नोंदवहीमध्ये लिहून ठेवावे.
कृती कार्यक्रम केल्यानंतर किंवा करताना तुम्हाला काय अनुभव आले, काय नवीन शिकायला मिळाले आणि हा कृती कार्यक्रम तुम्हाला कसा सुचला याविषयी देखील तुम्ही नोंदवही मध्ये लिहून ठेवा. तुमचे निवडक अनुभव आपण भरारी मध्ये प्रकाशित करू.
पण समजा तुमची बैठक ठरलेली आहे आणि नेमकं तुमच्या सोबत काम करणाऱ्या निमंत्रकांना कुठेतरी बाहेर जावं लागतंय आणि त्यांना बैठकीला येणे शक्य नाही तर अशा वेळेस तुम्ही काय कराल?
कुमार निर्माणच्या बैठकीत निमंत्रकांनी उपस्थित असणं खरं तर गरजेचं आहे पण समजा त्यांना नसेल जमत तरी तुम्ही मुलं-मुली मिळून बैठक पार पाडू शकता. बैठकीची सविस्तर माहिती तुम्ही नोंद वहीत लिहालच, ती नोंद वही निमंत्रक आले की त्यांना दाखवा. म्हणजे त्यांनाही कळेल तुम्ही बैठकीत काय केलं ते.
आता ही नोंदवही कोणाकडे ठेवायची? बैठकीला सर्वांना कोणी बोलवायचं? वाटून घेतलेल्या जबाबदारी प्रमाणे सर्व कामं होतायेत का? हे कोणी बघायचं? तर या साठी कुमार निर्माणच्या गटाला एक गटप्रमुख असला पाहिजे. हा गटप्रमुख तुम्ही सर्वांनी मिळून निवडावा. तुम्ही एकच गटप्रमुख वर्षभर ठेवू शकता किंवा महिन्याला, दोन महिन्याला बदलू शकतातयाबाबतीतही तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे.
अशा बैठका तुम्ही वर्षभर घ्या, त्यात चर्चा करा, नवनवीन कल्पना शोधून काढा, त्या प्रत्यक्षात आणा आणि धमाल करा!