Wednesday 1 March 2017

कुमार निर्माण

मागील अंकात आपण कुमार निर्माण थोडक्यात समजून घेतलं होतं. आता त्या विषयी थोडी अजून माहिती घेऊया आणि समजून घेऊया.
तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मागील काही दिवसांत तुम्ही, तुम्हाला सुचलेली आणि तुम्ही मनाने केलेली एखादी चांगली कृती आठवा. मागील काही दिवसांत नसेल केली तर अजून थोडा काळ मागे जाऊन बघा आणि आठवा की आपण आपल्याला सुचलेली (इतर कुणीही न सुचवता) चांगली कृती कधी केली होती. अशी कृती केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं होतं तेही आठवा. नक्कीच तुम्हाला तेव्हा खूप छान, भारी वाटलं असेल. तुम्ही केलेल्या त्या कृती बद्दल अभिमान देखील वाटला असेल. आता समजा तुमचे शिक्षक आहे आणि तीच कृती तुम्हाला स्वतःला न सुचता त्यांनी तुम्हाला सांगितली असती आणि तुम्ही ती केली असती, तर तुम्हाला ती कृती केल्यानंतर तेवढंच छान, भारी आणि तेवढाच अभिमान वाटला असता का ? मला तरी वाटतं... कदाचित नसतं वाटलं.
मग जर आपल्याला स्वतःला सुचलेल्या आणि मनाने केलेल्या कृती करून एवढा आनंद होत असेल, एवढा अभिमान वाटत असेल तर आपण अशा काही चांगल्या कृती का करत नाहीत?
त्याचं उत्तर आहे की आपणा सर्वांना दुसऱ्या कुणीतरी सांगितलेलं काम करायची सवय लागायला लागली आहे. हळूहळू आपल्या स्वतःला काहीही सुचेनासं व्हायला लागलेलं आहे. आपण विचार करेनासे झालो आहोत. मनाने काही तरी करा, असं जर आपल्याला कुणी सांगितलं तर काय करायचं याचा आपल्याला प्रश्न पडतो आणि त्या मुळेच आपण स्वतःस सुचलेल्या कृती करून मिळणाऱ्या अभिमान आणि आनंदापासून दुरावलो आहोत. हा आनंद खरं तर खूप काळ टिकणारा म्हणजेच शाश्वत असतो.
तर हाच आनंद मिळवण्यासाठी कुमार निर्माणचा आपला एक गट आहे. असा आनंद मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. आता गट का हवा ? एकेकटे काम करायला माणसाला आवडत नाही. आपल्याला छान काम करायला जर आपले मित्र सोबत असतील तर अजून जास्त मजा येते. म्हणून हा आपला गट!
यामध्ये आपण तुम्हाला सुचलेल्या छान छान कृती करणार आहोत. फक्त त्या कृती आपल्या परिसरातील विविध घटकांना मदत करणाऱ्या किंवा परिसराला अजून छान बनवणाऱ्या असायला हव्या. परिसरातील आपल्याला जाणवणाऱ्या समस्यांवर उपाय शोधणाऱ्या कृती आपण करायला हव्यात.
उदा.
१.      रस्त्यावरील खड्डा बुजवणे
२.      नळावरून पाणी न्यायला आजीला मदत करणे
३.      भरलेल्या कचराकुंडी बद्दल प्रशासनाला कळवणे
४.      पक्ष्यांसाठी दाणे-पाणी ठेवणे इ.
चला तर मग अशा तुम्हाला सुचलेल्या छान कृती करूया. काही लागलं तर आम्ही सोबत आहोतच.
फक्त असे कृतीकार्यक्रम करताना आपण काही काळजी घेऊया. त्या साठीचे काही नियम ठरवून घेऊया असं म्हणा हवं तर. हे नि

यम तसे तुम्हाला परिचयाचे आहेतच आणि आपल्या वरील चर्चेमध्ये देखील ते आले आहेत. फक्त आपण एकदा त्याची उजळणी करूया.
. कृतिकार्यक्रम गटातील एखाद्या मुला-मुलीला सुचलेला हवा.
. गटातील इतर सर्वांना तो मान्य हवा.
. कृतिकार्यक्रम केल्यावर आणि करताना तुम्हाला आनंद व्हायला हवा.
. आपल्या कृतीतून कुणालाही त्रास व्हायला नको किंवा परिसराचं नुकसान व्हायला नको.
एवढी काळजी तुम्ही घेत असालच.
समजा आपल्यातील एका मुलीला परिसरातील एक प्रश्न जाणवला आणि त्यावर आपण काही करायला हवं असं तिला प्रामाणिकपणे वाटलं तर तिने तो मुद्दा आपल्या बैठकीत मांडायला हवा. असा प्रश्न दिसायला तुम्ही पहिले निरीक्षण केलं पाहिजे बरंका! मग सर्व गटाने त्यावर चर्चा करायला हवी. तो प्रश्न निवडून त्यावर काही उपाय  करायचा का ? हे सगळ्या गटाने मिळून ठरवायला हवं. समजा गटाला ते मान्य झालं तर मग सर्वांनी मिळून तो प्रश्न जिथे आहे तिथे जाऊन तो प्रत्यक्ष बघायला हवा. याला आपण प्रश्नाचा अनुभव घेणे म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष प्रश्नाचा अनुभव घ्यायला हवा. मग त्या प्रश्नाविषयी अधिक माहिती मिळवायला हवी, त्या प्रश्नाशी निगडीत इतर गोष्टींची देखील माहिती मिळवायला हवी. याला आपण अभ्यास करणं असं म्हणूया. माहिती मिळवण्याचे अनेक पर्याय तुमच्याकडे आहेत. जसे की इंटरनेट, पुस्तके, मोठी माणसे इ. या सगळ्यांचा वापर करून आपण त्या प्रश्नाचा खोलवर अभ्यास करायला हवा. मग गटात बसून सर्वांनी यावर काय करूया किंवा काय करता येईल याचा विचार आणि चर्चा केली पाहिजे. त्यातून तुम्हाला तो प्रश्न वा समस्या सोडवण्याचे अनेक मार्ग सापडू शकतात. त्यातील एक किंवा अनेक मार्ग वापरून तुम्ही त्या प्रश्नाला भिडू शकतात. मग ठरलेला पर्याय वापरून तुम्ही प्रत्यक्ष कृतीचे नियोजन आणि कृती करायला हवी.
कृती करून झाल्यावर आलेले अनुभव, काय छान झालं, काय चुकलं, काय अजून छान करता आलं असतं, यावर पुन्हा गटाने मिळून चर्चा करायला हवी त्याला झालेल्या कृतिकार्यक्रमाच्या अनुभवांचे शेअरिंग असे म्हणूया.
अशाप्रकारे कुमार निर्माण मध्ये चांगला कृतिकार्यक्रम करताना पुढील पायऱ्या लक्षात ठेवता येतील
. निरीक्षण
. अनुभव
. अभ्यास
. विचार आणि चर्चा
. कृती
. शेअरिंग (अनुभवकथन)
मुलांनो लक्षात ठेवा कुमार निर्माण मध्ये फक्त कृती करणे हे आपलं ध्येय नाहीये म्हणून फक्त कृतींच्या मागे लागू नका. कृती करताना आपण वर दिलेल्या पायऱ्यांनुसार ती कृती करतोय का याकडे देखील लक्ष द्या. त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.
मुलांनो आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवूया की कुमार निर्माणचा हा गट तुमच्या ताई दादांचा किंवा तुमच्याशिक्षकांचा नाहीये; तर हा गट तुम्हा मुला-मुलींचा आहे. तेव्हा त्यांनी बोलावल्यावर बैठकीला जाऊ, ते सांगतील ती कृती करू असं करून आपल्याला चालणार नाही. गटाच्या बैठकीची, कृतिकार्यक्रमांची जबाबदारी पूर्णपणे आपली असणार आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही सगळे मिळून ती जबाबदारी नक्कीच घ्याल आणि यशस्वीपणे पार पाडाल.

कृतिकार्यक्रम सुचण्यासाठी तुम्ही मागील भरारी मध्ये दिलेल्या इतरांनी केलेल्या कृतिकार्यक्रमांची देखील मदत घेऊ शकता. तसंच काही आपल्याकडे देखील करता येईल का याविषयी सुद्धा नक्की विचार करा. काही अडलं तर आम्ही आहोतच मदत करायला.
मुलांनो आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवूया की कुमार निर्माणचा हा गट तुमच्या ताई दादांचा किंवा तुमच्याशिक्षकांचा नाहीये; तर हा गट तुम्हा मुला-मुलींचा आहे. तेव्हा त्यांनी बोलावल्यावर बैठकीला जाऊ, ते सांगतील ती कृती करू असं करून आपल्याला चालणार नाही. गटाच्या बैठकीची, कृतिकार्यक्रमांची जबाबदारी पूर्णपणे आपली असणार आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही सगळे मिळून ती जबाबदारी नक्कीच घ्याल आणि यशस्वीपणे पार पाडाल.

No comments:

Post a Comment