Wednesday 1 March 2017

मुलांच्या लेखणीतून

बैठक वृत्तांतजागृती गट, डोमरी, बीड.
वार: गुरुवार
दि. ०९-०२-२०१७
दिवाळी नंतर बऱ्याच बैठका झाल्या पण ही बैठक जरा खास होती. या बैठकीचा उद्देश्यसुद्धा जरा वेगळाच होता. गटाचे काम हे स्थिर झाले होते. ते नव्याने चालू करण्यासाठीची ही बैठक. सुरुवातीला गाणे म्हणून या बैठकीची सुरुवात झाली.
उन्हाळी सुट्ट्या लागण्यासाठी अवघा दीड महिना उरला आहे. एवढ्या कमी वेळेत जास्त व कल्पक कामे काय करायचीत? यावर चर्चा सुरु झाली. बरेचसे नवीन कल्पक उपक्रम गटातील विद्यार्थ्यांनी सुचविण्यास सुरुवात झाली. त्यापैकी काही निवडक उपक्रम खालीलप्रमाणे
· गुरुकुलातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. अभ्यास करावा का वाटत नाही ? हे गटातील विद्यार्थ्यांनी शोधून म्हणजे अभ्यास न करण्याचे कारण शोधून त्यावर योग्य असे उपाय सुचवायचे असं ठरवलं. त्याचबरोबर अभ्यास मनोरंजक वाटावा त्यासाठी काही खेळातून अभ्यास म्हणजे अभ्यास हा विद्यार्थ्यांना आनंदी वाटू लागेल.
· गुरुकुलाच्या परिसरात पडलेल्या टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची थोडक्यात माहिती घेऊन त्या योग्य रित्या उपयोगात आणणे.
· गटातील विद्यार्थ्यांच्या माध्यमाने शैक्षणिक साहित्य गोळा करून गुरुकुलाच्या परिसरामधील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करणे.
· जयंती किंवा इतर वेळेस सगळ्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या विविध सपर्धा घेणे व नवीन उपक्रम घेणे.
· जे भारतीय खेळ आहेत. उदा. कुस्ती, खो-खो, सूरपारंब्या, कबड्डी इ. हे थोडक्यात कमी प्रमाणात खेळले जातात. शिवजयंतीच्या निमित्ताने गटातील विद्यार्थ्याचे तसेच सगळ्या गुरुकुलातील मुलांचे व जवळच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे खेळ घेणे/ खेळणे.
· गटबैठक ही उत्तम होण्यासाठी व प्रत्येक बैठकीतून काहीतरी शिकायला मिळण्यासाठी बैठकीत नवीन उपक्रम म्हणजे, एखादा विषय देऊन त्यावर चर्चा घेणे, अवांतर वाचन करणे, नवीन इंटरनेटवरील गोष्टींची माहिती, नाट्यछटा इ. सारखे उपक्रम बैठकीत घेणे.
· यांसारखे उपक्रम गट बैठकीत विद्यार्थ्यांमार्फत सुचविण्यात आले.
निमंत्रक: रज्जाक  पठाण

उडान गट, भोटा, जळगाव
आमच्या गटाचे नाव उडानआहे. हा गट मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा या गावातील आहे. आम्ही सर्वजण एकमेकांशी प्रेमाने वागतो, बोलतो आणि कामही करतो. सर्वजण आपल्याजवळ असलेल्या आठवणी आणि इतर गोष्टी शेअर करतात. आम्ही आमच्या गटासाठी उडान’ गट, या नावाने बिल्ला देखील बनवला आहे व त्यामागे आपले नाव व नंबर टाकलेला आहे. दर आठवड्याला होण्याऱ्या मिटींगला आम्ही सर्वजण आपापले बिल्ले लावून येत असतो.
एक दिवस वाढणारे ऊन पाहून आमच्या गटातील वैभवने मिटींगमध्ये सुचवले की, आपण शालेय परिसरात येणाऱ्या पक्षांसाठी पाणी व धान्य ठेवू, मग आम्ही त्यावर चर्चा केली आणि सर्वांनी यासाठी सहमती दिली. मग आम्ही सर्वजण कामाला लागलो.
मग आम्ही पक्षांसाठी पाणी ठेवायला म्हणून काहीतरी बनवावे अशी चर्चा केली आणि त्यासाठी इंटरनेटची मदत घ्यायची ठरवली. त्यावर आम्हाला पक्षी पाणी पित असलेल्या एका चित्र सापडले आणि त्यातील कल्पना आम्हाला आवडली. नंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे आम्हीपण आपापल्या घरून तेलाच्या रिकाम्या कॅन जरा वेगळ्या प्रकारे कापून शाळेतील परिसरातल्या झाडावर लावल्या. काही कॅन गावातील पक्षी येणाऱ्या झाडावर पण ठेवल्या व काही भांड्यांत तांदूळ आणि ज्वारीचे दाणे टाकले.
आमच्या गटातील काही मुलं रोज या भांड्यांत दररोज पाणी व दाणे टाकतात.
या भांड्याजवळ जमा होऊन जेव्हा आम्ही पक्ष्यांना पाणी पिताना, तांदळाचे ज्वारीचे दाणे खाताना, किलबिल करताना पाहतो तेव्हा आम्हाला खुप खुप आनंद होत!
-मयूर तायडे, ९वी,
निमंत्रक: मंगेश डेंगे



‘मी माणूसगट स्मशानभूमी भेट, नाशिक
आम्हाला स्मशानात जाण्याचं कसं सुचलं? आम्ही एकदा अनाथआश्रमात जावे का या विषयावर बोलत असताना आमच्या गटातील माही म्हणाली की, “आपण स्मशानात जाऊया का?” मग सर्वेश बोलला, “मी नाही येणार, मला भीती वाटते.आमचं कसं ठरलं? माहीने विषय काढला आणि मग सर्वांनी त्यावर चर्चा केली आणि पालकांना विचारले तर आमच्या पालकांचे प्रोत्साहन चांगले होते. आणि आम्ही ८ ते १ या वेळेत गेलो. ८ वाजता  सर्वांनी कपाळेश्वर मंदिरासमोर भेटण्याचे ठरवले आणि तिथपासून अमरधाम पर्यंत पायी गेलो. गंगेवर आम्ही सफेद रंगाचे गोल-गोल भाताचे पिंड पहिले. काकांनी आम्हाला सांगितले की एखादी व्यक्ती वारली की असं करतात.


नंतर आम्ही पुढे चालत निघालो तिथे एक काका १० रु. ला २ वडापाव विकत होते. माहीचे तिकडे लक्ष गेले. तिने काकांना जेव्हा वडापाव घेण्याचा आग्रह केला तिला तेव्हा काकांनी आधी एक प्रश्न केला, “तो माणूस १० रु. ला २ वडापाव का विकतोय?” ती बोलली की त्याचा व्यापार व्हावा म्हणून. तर काकांनी सांगितले की गंगेवर खुप सारे लोकं येतात, त्यात काही गरीब आणि भिकारीही असतात. भिकारी किती पैसे देऊ शकतात, २-५ रु. तर मग ५रु. ला १ वडापाव मिळत असेल तर त्यांना त्यांची भूक भागवणं सोपं जातं.
मला तेथे जाऊन असं वाटलं की येथे राहणारी माणसं कित्ती साऱ्या लोकांना जाळतात त्यांची जाळल्यानंतर उरलेली हाडे बाजूला काढतात, मग एखाद्या दिवशी यांना भूत किंवा आत्मा दिसले नाही का कधी? मग आम्ही तिथली हाडे हाताळली आणि तिथल्या दादा आणि काकांना विचारले की तुम्हाला इथे कधी अमावास्येच्या दिवशी भूत-आत्मा दिसले नाही का?” तर ते म्हणले, “आम्ही इथे दिवसरात्र काम करतो, आम्हाला कसलीच भीती वाटत नाही. आपणच एक भूत असतो.
तिथे आम्ही एक वेगळ्या प्रकारचा प्राणी पहिला. त्याचं नाव कबडबिच्छूआहे असं तिथल्या काकांनी आम्हाला सांगितलं. त्यांनी सांगितलं की हा प्राणी माणसांना खातो. हे आमच्यासाठी अगदीच नवीन होतं.
पण मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की, तेथे एक आजोबा लाकूड फोडत होते आणि त्यांना कुणीही मदत करत नव्हतं. असं का? मी जाऊन त्यांना विचारलं, “आजोबा, तुम्ही हे लाकडं फोडता आहात, एवढा घाम गाळताय, कशासाठी?” त्यावर ते काही बोलले नाही, पण त्यांनी माझ्या हातात एक हाड बघितले व मला म्हणाले, “हे तु घरी घेऊन जाणार का? वा वा छान! जा जा घेऊन जा घरी!एवढे बोलून त्यांनी आपलं काम सुरु केलं.
आम्ही तिथे खेळलोसुद्धा आणि खुप मजाही केली आणि सोबतच आम्हाला खुप शिकायला मिळालं.
साक्षी,
गट निमंत्रक: अजित टक्के
मायाळू गट, सासवड, पुणे
आम्ही नेहमीप्रमाणे गेल्या रविवारी जमलो होतो. मग आम्ही सर्वजण एकत्र जमलो, लई खेळलो. मग सगळी पोरं म्हणाली की पुढच्या रविवारी काय करायचं? मग त्यावेळी ऋतिक म्हणाला की आपण आपल्या ग्राउंडवरचं गावात कापायचं. मग सगळीच म्हणाली की गवत कापू. पण आम्ही म्हणालो की पुढच्या रविवारी जाऊन काहीतरी करायचं, कारण पुढच्या रविवारी न्यू इयर २०१७ साजरा करायचा. मग सगळी पोरं म्हणली की करायचं तरी काय? सगळ्यांनी मिळून ठरवलं की सर्वांनी पैसे काढून भेळ आणायची. मग सगळ्यांनी मिळून १०-१० रुपये आणायचे.
ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे जमलो. जमल्यावर आम्ही गवत कापायला सुरुवात केली. आम्ही सगळ्यांनी जोमाने गवत काढायला सुरुवात केली. आम्ही सगळ्यांनी जोमाने गावात काढलं. सर्वांनी मिळून गवत काढल्यावर एका ठिकाणी गोळा करून ठेवलं. सर्व  ग्राउंड मोकळं झाल्यावर ग्राउंड स्वच्छ आणि सुंदर दिसल्यामुळे आम्हाला लई बरं वाटलं. मग आम्ही पैसे गोळा केल्यानंतर दोघेजण हॉटेल वर भेळ आणायला गेलो. आमचे सर्वांचे मिळून ९० रुपये गोळा झाले. ९० रुपयाची आम्ही भेळ आणली. भेळ घेऊन येताना आम्ही पाहिलं की सर्वजण आपली मान उंच करून भेळेची वाट पाहत होती. आणि छोटी छोटी लहान मुलं गोळा होऊन आपापली जागा धरून बसली होती. मग आम्ही भेळ आणल्यावर आम्ही सगळे गोल करून बसलो. भेळ सोडल्यावर व्यवस्थित कालवायला सुरुवात केली. त्यावेळी आमच्या सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं. मग आम्ही सगळ्यांनी भेळ खायला सुरुवात केली. आम्ही दोन मिनिटाच्या आत भेळ संपवली सुद्धा! त्यावेळी आम्ही नवीन वर्ष साजरा केलं. मग सगळं झाल्यावर आम्ही पुढच्या रविवारी काय करायचं ते ठरवायला सुरुवात केली. सर्व ठरल्यावर मुलं आपापल्या घरी गेली आणि आमचा सुंदर दिवस संपला.
चेतन, ६वी
निमंत्रक: निखील जगताप
भरारी गट, पहूर, जळगाव
आम्ही गटाची मिटिंग संपल्यावर क्लासमधून सर आणि सगळे मुलं गटातील एका मुलाच्या शेतात जायला निघालो.  जाताना आम्ही गोगडी रस्त्याने जाणाऱ्या रेल्वेलाईन वरून चाललो. त्यावरून चालताना खूप मजा आली. पुढे चालून आम्ही नदीत उतरलो. नदी पार करून थोड्याच अंतरावर त्याचं शेत होतं. त्यांनी त्यांच्या शेतात सिमेंटचे फार्म हाउस बांधले आहे. तिथे आम्ही औषधी फवारणी पंप पहिला. बाहेर येऊन सरांनी आम्हाला कागदी पिशवी कशी बनवायची ते शिकवले. नंतर टिकमने आम्ही सगळ्यांनी मिळून भातकंदाच्या झाडाचे भातकंदं काढले. ते काढतानाही मजा आली. ते काढून मग भाजण्यासाठी काड्या आणल्या, काहींनी भातकंदं कापून घेतले, काहींनी जाळ केला मग काढलेली भातकंदं भाजण्यास ठेवली आणि तोपर्यंत आम्ही शेणखतावर प्रक्रिया कशी केल्या जाते हे पहिले. भूषणने ते आम्हाला त्या टाकीत हात घालून दाखवलं. ते चहापत्तीप्रमाणे दिसत होतं. त्याने सांगितलं की शेणखताचा ढीग करून त्यावर मोटारने पाणी घातलं जातं. तो ढीग आम्ही काडीने खोदून पहिला तर त्यात काही किडे दिसले आणि तो ढीग कुजून गेला होता. शेणखताचे खूप फायदे आहेत. जसे की कमी खर्चात उपलब्धी, शेतीसाठी उपयुक्त, जमीन नापीक होत नाही, कुठल्याही प्रकारच्या पिकाला टाकू शकतो व आपापल्या शेतात सहज उपलब्ध असते.
मग नंतर आम्ही तेथून मोसंबीच्या झाडाकडे चालत गेलो. त्या झाडावर पिवळ्या खोक्यात औषध लाऊन भिस्कीट ठेवले होते; फळांना डास लागून नये म्हणून. पुढे जाऊन आम्ही ती मोसंबी खाल्ली. तेव्हा दादाने सांगितले की मोसंबीमध्ये BC व्हिटामिन असते, जामनेर तालुक्यात तुरळक प्रमाणात आढळते, तिचे 2 प्रकार असतात मोठी व लहान मोसंबी. मोठ्या लिंबूवर मोठ्या आणि लहान लिंबूवर लहान मोसंबीची कलम बांधली जाते. दादाने सांगितलेली माहिती समजून घेतल्यानंतर आम्ही एका झाडाखाली बसून फोटो काढले व तिथे बसलेलो असताना सरांनी एक प्रयोग केला. माचीसची काडी पेटवून, मोसंबीचे ताजे सालटे घेऊन त्याचा रस त्या पेटत्या काडीवर टाकला तेव्हा मोठा जाळ झाला. यावरून समजते की त्यात काहीतरी ज्वलनशील असलं पाहिजे. परत आल्यावर आम्ही ती भाजलेली भातकंदं खाल्ली. आदिवासीही हीच भातकंदं खातात. भातकंदापासून साबुदाणा कसा बनतो हे दादाने आम्हाला सांगितले. त्याने सांगितले की सडवून त्यावर आलेल्या थरीपासून साबुदाणा बनतो. नंतर आम्ही शेततळे पहिले. त्या तळ्याचे पाणीही पिले. खूप मजा पण केली. मग आम्ही टमाटे आणले व झाडाखाली खायला बसलो तर तिथे आम्हाला एक खारूताई मेलेली दिसली. तिला आम्ही त्याच झाडाखाली गाडले कारण की ती कुजून  तेथील झाडांना खत म्हणून उपयोग व्हावा.
दिवसभर आम्ही खूप मजा केली आणि संध्याकाळी घरी परत आलो.
निमंत्रक: सतीश काकडे
अंबाजोगाई गट, बीड
आमच्या गटाची शनिवारी बैठक झाली. तेव्हा आम्ही ठरवलं की ग्रंथालय व बाराखांबी मंदिर पाहायला जायचंआहे. तिथे उत्खनन चालू होते. मग आम्ही योगेश्वरी मंदिराजवळ रविवारी ८.०० वाजता भेटायचे ठरवले. जमल्यानंतर त्या मंदिरापासून बाराखांबी मंदिराकडे जायला निघालो. वाटेत आम्ही खूप प्राणी व पक्षी पहिले. जसे की, मोर, घोडा, हरीण, काळवीट ई.
आम्ही सर्वप्रथम त्या मंदिराचे जवळ जाऊन निरीक्षण केले, त्यात आम्हाला काही मूर्त्या दिसल्या. सरांनी आम्हाला या मूर्त्यांची माहिती सांगितली. त्यापैकी काही मूर्त्यांचे नुकसान झाले होते. त्या मूर्त्या व मंदिर पाहिल्यावर असे लक्षात आले की ते मंदिर आणखी खाली खोदले तर तेथे आणखी मूर्त्या व अवशेष सापडतील. पण मूर्त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पुरातन विभागाने तेथील खोदकामाचे काम थांबवले आहे. आम्ही तिथेच बसून डब्बे खाल्ले व आम्ही तेथे मुंग्यांचे एक छानसे वारूळ पहिले. आम्ही तिथल्या मूर्त्या जवळून पहिल्या तेव्हा दिसलं की पुरातन विभागाने त्या मूर्त्यांवर नंबर टाकले होते कारण त्यांना कदाचित पुन्हा त्या मूर्त्या जोडायच्या असतील. दिवसभर आम्ही उत्खनन जागा पहिली, एकत्र डब्बे खाल्ले, खूप खेळलो आणि मजा करून घरी परत आलो.
गट निमंत्रक: दिनकर जोशी

अग्निपंख गट, नशिराबाद, जळगाव
आमच्या गटात एकूण १५ मुले आहोत. आमचे पालक जंगलात मजुरीसाठी जातात. कधीकधी आम्हीही शाळेला दांडी मारून त्यांच्यासोबत जातो. १० जानेवारीला आमच्या गटाची मिटिंग झाली, त्याच्यात मॅडमने आम्हाला अधिकार, हक्क याबाबत माहिती सांगितली. संविधानाने आपल्याला काय दिले? मग हक्क आणि अधिकार कोणाला कसे मिळाले? जसे बाहेर आहे तसेच घरात काय परिस्थिती आहे आहे? भावाला सर्व गोष्टी न मागताच मिळतात. आम्ही शेतात आणि घरीही कामं करतो पण ते सर्व घरखर्चासाठी वापरले जाते. सर्व मुलींच्या घरी हीच परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्ट बाबांना विचारावी लागते. आईपण रोज शेतात जाते, घरी सर्व कामं करते पण बाबा पैसे घेऊन जातात. घर कोणाच्या नावावर आहे? आजोबा नाहीतर बाबा. गल्लीत/ गावात सर्वांत जास्त कुणाला ओळखतात? आजोबा नाहीतर बाबा.. सर्व मान बाबांनाच मिळतो. घरात सल्ला घेण्यासाठी आईपेक्षा बाबांनाच जास्त विचारतात. म्हणून आईलापण आनंद मिळावा यासाठी, तिचाही आमच्या असण्यात वाटा आहे, आणि तिलाही सर्व हक्क असावेत म्हणून आईच्याच नावे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आईला पत्र पाठविले. पत्र आईच्याच नावाचे असल्यामुळे पोस्टमन काकाने जेव्हा आईच्या नावाने जोरात हाक मारली तेव्हा आजूबाजूला सर्वांना नवल आणि कुतूहल वाटले. काय असेल? कशाची नोटीस तर नाही. आईला जेव्हा वाचून तेव्हा खूप आनंद झाला. तिचा आनंद पाहून आम्हालाही खूप आनंद झाला.

गट निमंत्रक: निर्मला फालक

No comments:

Post a Comment