Wednesday 1 March 2017

गोष्ट—खराखुरा न्याय!


‘मोहन’हा ‘पांडूर’” नावाच्या ग्रहावर राहत होता तर ‘चैतन्य’ हा ‘खोषा’ ग्रहाचा निवासी होता. त्यांची ओळख दोन ग्रहांमध्ये संपर्क करु शकणाऱ्या उपकरणाद्वारे झाली होती. ओळखीचं रुपांतर लवकरच मैत्रीत झालं. ते दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र झाले होते पण अजून एकमेकांना भेटले नव्हते. चैतन्यने मोहनला आपल्या ग्रहावर येऊन भेटायचं आमंत्रण दिलं. मोहनला देखील आपल्या या मित्राला भेटायची उत्सुकता होतीच आणि त्यानिमित्ताने त्याचा ग्रह देखील मोहनला बघायला मिळाला असता. मग काय मोहनने लगेच आपली बॅग भरली आणि तो अंतरिक्षयानात बसून तिकडे गेला. त्याच्या स्वागतासाठी मोहन अंतरिक्षतळावर आधीच येऊन पोहचला होता.
तिथे पोहचल्यावर त्या नवीन ग्रहावरील वातावरण बघून मोहन अगदी भारावून गेला. सगळीकडे तो उत्सुक नजरेने बघत होता. चैतन्य ने मोहनला स्वतःच्या घरी नेले. तेथे सगळी कामं स्वयंचलित यंत्रमानव करत होते. त्यांनी मोहनला पाणी आणून दिले. थोडंसं जेवण करून मोहन आणि चैतन्य फिरायला बाहेर पडले. चैतन्य मोहनला त्याच्या ग्रहाची माहिती सांगत होता. शहरातील प्रेक्षणीय स्थळे दाखवत होता. पहिल्यांदाच भेटल्याने दोघांना देखील खूप आनंद झाला होता. त्या आनंदात भरभरून बोलत ते रस्त्यांवरून फिरत होते. आपल्याच नादात चालत असताना चुकून मोहनची टक्कर एका काचेच्या गोलासोबत झाली. मोहन प्रश्नार्थक नजरेने चैतन्य कडे बघू लागला. तेवढ्यात त्या काचेच्या गोलातून एक माणूस बाहेर आला. त्याच्या कपाळाला टेंगुळ आले होते. मोहन त्याला काही म्हणायच्या आत तिथे आकाशातून दोन यंत्रमानव आले. हे दोन्ही रोबोट पोलिसाच्या पोशाखात होते. त्यांनी मोहनला आणि त्या माणसाला पकडलं. त्या माणसाच्या जखमेला स्कॅन केलं आणि एक कार्ड छापून ते त्या माणसाच्या हातात दिलं. काही समजायच्या आतच त्या यंत्रमानवांनी दोघानाही उचललं आणि त्यांना घेऊन ते उडाले.
तेथून त्या यंत्रमानवानी त्यां दोघांना एका न्यायालयासारख्या दिसणाऱ्या वास्तू मध्ये आणलं. तेथे एका काचेच्या खोलीत त्यांना नेण्यात आलं. एका मोठ्या खुर्चीवर एक यंत्रमानव तेथे बसलेला होता. त्याने काळा कोट घातलेला होता. मोहनला वाटलं हा न्यायधीश असावा. तेव्हा मोहनला कळलं की ज्या माणसाशी त्याची टक्कर झालेली होती त्याचं नाव रोहितहोतं. त्या न्यायधीशासारख्या दिसणाऱ्या यंत्रमानवाने रोहितला आदेश दिला चल लवकर आवर”. कसलीही तमा न बाळगता रोहितने मोहनच्या तोंडावर एक जोरदार ठोसा मारला. मोहनचा गाल चांगलाच सुजला आणि नाकातून थोडं रक्त देखील आलं. मोहनला थोडं घेरी आल्या सारखं देखील झालं. पण त्याने स्वतःला सांभाळलं. तो काळ्या कोटातील यंत्रमानव मोहनजवळ आला आणि त्याने मोहनला लागलेल्या माराचं स्कॅनिंग केलं.
“खूपच जोरात मारलंयतो यंत्रमानव म्हणाला आणि त्याने एक कार्ड छापून मोहन कडे दिलं. त्या कार्डावर ७ ‘पास्कल’ (पास्कल हे दाब/pressure मोजण्याचं एकक/unit आहे.) असं लिहिलेलं होतं. रोहितला लागलेल्या मारापेक्षा मोहनला किती मार जास्त लागलाय आणि आता मोहन, त्या रोहितला किती ताकदीचा फटका मारू शकतो त्याचे ते गुण होते. पण मोहनला काही कळलचं नाही. तो रोबोट मग मोहनला म्हणाला, कार्डावर लिहिल्या प्रमाणे तेवढ्या ताकदीचा फटका आता तू रोहितला मारू शकतोस.
मोहन गोंधळून गेला. त्याला काही त्या रोहितला मारायची इच्छा नव्हती. त्याची ही अवस्था बघून तो यंत्रमानव पुढे बोलू लागला.
“ही या ग्रहावरील खऱ्या न्यायाची पद्धत आहे. तुझ्यामुळे रोहितला मार लागला आता तेवढाच मार रोहितने तुला द्यायचा म्हणजे मग न्याय होईल. म्हणून आम्ही रोहितला त्याच्या कार्डावर त्याला किती मार लागलाय ते लिहून दिलं होतं आणि त्याला तुला मारायची संधी दिली. पण त्याने त्याला दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जोराने तुला मारलं. किती जास्त मारलंय ते आम्ही तुला आता लिहून दिलंय तेवढ्या ताकतीने तू रोहितला मारायचं म्हणजे मग खरा न्याय होईल. 
हे सगळं चालू असताना रोहित बिचारा भीतीने मोहनकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात खूप भीती दाटलेली होती.
मोहन विचार करत होता. खरा न्यायकिती छान ना! कुणालाही जास्त त्रास नाही. ज्याने जेवढं नुकसान केलंय तेवढंच त्याने स्वतः सुद्धा सोसायचं. खरा न्याय! त्याला याबद्दल लवकरात लवकर जाऊन चैतन्यसोबत बोलायचं होतं. तो तिथून निघू लागला.
त्या दोन यंत्रमानवांनी त्याला अडवलं.
तो काळ्या कोटातील यंत्रमानव मोहनला म्हणाला; “तू असा नाही जाऊ शकत. तुला त्या कार्डवर लिहिल्याप्रमाणे रोहितला ठोसा मारावा लागेल तरच खरा न्याय होईल.
मोहन आणखी गोंधळून गेला. त्याला काही  रोहितला मारायची इच्छा नव्हती. रोहितने खरंच मोहनला जोरदार ठोसा मारला होता पण मोहनचं मन काही रोहितला मारायला तयार नव्हतं.
त्याने काचेच्या भिंतीतून आजूबाजूला बघितलं. त्याला दिसलं की अशाच असंख्य खोल्यामध्ये काळे कोट घातलेले यंत्रमानव बसलेले आहेत. लोक एकमेकांना मारतायत, ढकलून देताय. त्यांच्या हातात मोहनच्या हातात असलेल्या कार्डसारखं कार्ड होतं. सगळीकडे हीच परीस्थिती त्याला दिसली. त्याला थोडी भीती देखील वाटली.
त्याची अशी अवस्था बघून काळ्या कोटातील यंत्रमानव म्हणाला तुला घाबरायचं काहीही कारण नाहीये. ही खऱ्या न्यायाची पद्धतच आहे. दोघानाही अगदी सारखा न्याय मिळेल. तू जर आता रोहितला जास्त जोराने मारलं तर आम्ही पुन्हा त्याला असं कार्ड देऊ आणि तो तुला मारेल. असं जोपर्यंत दोघांनाही समान मार मिळत नाही तोपर्यंत चालू राहील.
मोहन थोडा विचार करून म्हणाला; “ठीक आहे, मी रोहितला माफ करतो. मला त्याला मारायचं नाहीये.
“नाही ! ते शक्य नाही.तो यंत्र मानव म्हणाला. तुला तुझ्या कार्डावर मिळालेले गुण वापरावेच लागतील. हीच खऱ्या न्यायाची प्रक्रिया आहे.
काय त्रास आहे ! मोहन विचार करू लागला. कुणाला माफ करणं कसं काय अशक्य असू शकतं? मोहनने थोडा विचार केला आणि हातातलं कार्ड फाडून फेकून दिलं आणि तो म्हणाला; “ बघ ! आता कुठलेच गुण शिल्लक नाही आहेत.
हे बघून त्या यंत्रमानवाची स्थिती खूपच बिघडली. त्यात बिघाड होऊ लागला. त्याचे दिव्यासारखे डोळे चालू बंद होऊ लागले. खोक्यासारख्या त्याच्या डोक्यातून धूर निघू लागला. त्याच्या घशातून विचित्र आवाज येऊ लागले आणि लवकरच तो यंत्रमानव धाड करून खाली कोसळला. अचानक सगळं शांत झालं. हा सगळा कोलाहल ऐकून एक मोठा यंत्रमानव तिथे आला. त्याने काळ्या कोटासोबतच उंच काळी टोपी डोक्यावर घातलेली होती. तो त्या पहिल्या काळा कोट घातलेल्या यंत्रमानवापेक्षा मोठा अधिकारी वाटत होता.
तो यंत्रमानव म्हणाला; “छान ! आता खरा न्याय झाला. खऱ्याखुऱ्या न्यायाची प्रक्रिया वापरल्याबद्दल तुझे खूप आभार मोहन.
दरवाजे उघडले गेले. मोहन बाहेर पडून चैतन्यला भेटला. आता त्याच्या लक्षात आलं की इथल्या खऱ्या न्यायाची प्रक्रिया पाळणारे एकमेकांना मारून मारून दमलेले आहेत. दमून खाली पडलेले आहेत पण न्याय काही होत नाहीये. एकमेकांना सारखा मार देण्याने किंवा एकमेकांचं सारखं नुकसान केल्याने न्याय होणार नाही हे त्यांना कळलेलं नाहीये म्हणून हे सगळं असं चाललंय.

लवकरच मोहन आपल्या ग्रहावर निघून गेला पण या खऱ्याखुऱ्या न्यायसाठी आजही त्याचं नाव खोषा ग्रहावर घेतलं जातं.

No comments:

Post a Comment