Thursday 31 August 2017

उल्लेखनीय कृतीकार्यक्रम

उडान गट, भोटा, जळगाव
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेली आमच्या ‘उडान’ गटाची बैठक खुप संस्मरणीय झाली.
काही दिवसांपूर्वीच आमच्या भागात स्वदेशी जनजागरण मंचामार्फत चीनी मालावर बहिष्कार, चीनची भारतविरोधी भूमिका या आशयावर आधारित पत्रके वाटण्यात आली होती व त्यातील एक पत्रक मयूर व गौरी यांच्या हाती पडलं. ते पत्रक हाती घेऊनच ते गटाच्या बैठकीला आले.
माझ्या मनात तर प्लास्टिकचाच विषय होता, पण ऐनवेळी मी ते सर्व बाजूला ठेवलं आणि २५-३० मुलांच्या मताला महत्त्व द्यायचं ठरवलं. मग आमचा विषय रंगला.
मी मुलांना डोकलाम मुद्दा समजावून सांगितला. चिनी वस्तू, पाक व्याप्त काश्मीर मधील चिनी कोरीडोर, विदेशी वस्तू, स्वदेशी वस्तू अशा मुद्द्यांना स्पर्श होत गेला. मग मुलांनी ठरवलं की १५ ऑगस्टची संधी साधत आपण गावामध्ये चौकात या विषयाला अनुसरून पथनाट्य सादर करू. मुलांनी आपापल्या भूमिका वाटून घेतल्या. कथानक तयार झाले. स्वातंत्र्यदिनाला ज्या नेहमीच्या घोषणा दिल्या जातात, त्याबरोबरच चिनी व विदेशी मालाचा शक्य तेवढा कमी वापर व बंदी याला सुसंगत अशा घोषणा मुलांनी तयार केल्या. मुलांनी चिनी माल न वापरण्याची शपथ घेतली.
१५ ऑगस्टला मुलांनी गावकऱ्यांसमोर खुप चांगल्या प्रकारे पथनाट्य सदर केले आणि घोषणा पण खुप हटके बनवल्या.
मुलांनी बनवलेल्या काही घोषणा:
नको गं बाई, नको गं बाई, made in China नको गं बाई...’
मेड इन चायना, शाम तक टिकना...’
सून मेरे भाई, सून मेरी बहना, कभी न लेना मेड इन चायना...’
स्वदेशी वापरा, देश वाचवा...’
घामाचा पैसा, कष्टाचा पैसा, चीनला देऊ नका, नका...’

निमंत्रक: मंगेश ढेंगे

 मायाळू गट, सासवड, पुणे

शनिवारी संध्याकाळी कॉलेज संपल्यावर घरी गेलो. घरात शिरतानाच चेतनने आवाज दिला. “दादा, आम्ही आज झाड लावली.” मी म्हणालो, चला बघूया! पोरांनी समाज मंदिरापुढे चार झाडं लावली होती. थोड्यावेळात स्वप्निल, प्रीती, मोनिका, साहिल, आदित्य असे सगळे जमले. मी त्यांचं जरा कौतुक केलं आणि सविस्तर विचारलं.  स्वप्निल म्हणाला शाळेत रोपं पडलेली होती. मग आम्ही सरांना विचारून आणली आणि लावून टाकली. यात मला जास्त आवडलं ते हे की या तिघांनी म्हणजे स्वप्निल, आदित्य, चेतन, साहिल यांनी बाकीच्या मुलांची वाट न पाहता रोपं लावली. नुसतीच लावायची म्हणून लावली नाहीत तर मुरूम असल्यामुळे काळी माती वाहून आणून, खड्डा करून त्यात रोपं लावली. एवढ्यावरच न थांबता त्या रोपांना चांगलं काट्यांच कुंपण पण केलं. त्या रोपांना कोणी, कधी पाणी घालायचं ते पण ठरवून टाकलं.

आमच्या गटात समाज मंदिरापुढे आपण झाड लावू हा फक्त विषय झालेला, तो पण खूप महिन्यापूर्वी. तरीपण मुलांनी रोपं आणली. आता ही आणलेली रोपं ती आपआपल्या घरी पण लावू शकत होतीच की! पण तरी त्यांनी समाज मंदिरापुढेच लावली. रोपं लावण्यात हलगर्जीपणा दिसला नाही. आता हे सगळं झालं पण मला सगळं आल्यावर सांगितलं म्हणजे मुलांनी माझीपण वाट बघितली नाही.
अजून एक गंमत म्हणजे मला आधी वाटलं की आपला आधी विषय झालेला म्हणून किंवा गटात येतो म्हणून पोरांनी लावली असतील रोपं, पण नाही. मुलांनी तर गटांच नाव पण घेतलं नाही. मी स्वप्निलला विचारलं की तुम्हाला कसं काय सुचलं हे असं करावं म्हणून? त्यांनी सांगितलेलं उत्तर मजेशीर होतं. तो म्हणाला अरे शाळेत प्रत्त्येक शिक्षक येतो आणि झाडं लावा, प्रदूषण. तेच तेच सांगत असतात. मग टाकलीच लावून झाडं.
थोड्यावेळात एक आजोबा तिथं आले आणि त्यांना ओरडायला लागले रोपं लावली म्हणून नाही तर अशी कुठेपण लावली म्हणून. आता अजून एक गंमत म्हणजे या मोठ्यांनी रोपं लावली म्हणून आमच्या चिल्लर एक गॅंगने (४थी पर्यंत) यांनी पण लगेच दुसऱ्या दिवशी कुठूनतरी फुलांची रोपं आणली आणि टाकली लावून!       
 निमंत्रक: निखील जगताप
नेचर ग्रुप, एरंडोल, जळगाव
१४ ऑगस्टला आमच्या गटाची बैठक झाली आणि आम्ही त्यात आपल्याला काय करता येईल यावर खुप चर्चा केली. मग आमच्यापैकी हर्षल, प्रज्ञा आणि गुंजन यांना युक्ती सुचली. आमच्या शाळेला येताना, २ किमी अलीकडे एक भगत वाडी (झोपडपट्टी)  आहे. त्या वस्तीत आम्ही याआधीही एकदा जाऊन आलेलो आहे. त्यांना आठवड्यातून एकदा जाऊन शिकवावे अशी आमच्यात चर्चा पण झालेली आहे. तर या तिघांना कल्पना सुचली की आपण निमंत्रण पत्रिका बनवूया. आम्हाला सर्वांना ती कल्पना आवडली. मग आम्ही वस्तीतल्या मुलांसाठी निमंत्रण पत्रिका बनवल्या. मग आमच्या शिक्षकांची परवानगी घेऊन आमच्या शाळेची शिवा काकांची बस घेऊन आम्ही भगत वाडीत गेलो.
तिथल्या मुलांच्या अंगावर कपडे नव्हते व काही जणांनी अंघोळही केलेली नव्हती. आम्ही वाडीत प्रत्त्येकाच्या घरोघरी जाऊन चर्चा केली व त्यांच्या हातात निमंत्रण पत्रिका दिल्या व स्वातंत्र्य दिनाची माहिती दिली. सोबतच त्यांना निमंत्रण पत्रिका पण वाचून दाखवली. आणि त्यांना सांगितले की आमच्या शाळेत स्वातंत्र्यदिनाचा एक छानसा कार्यक्रम आहे तर तुम्ही सर्व जण या कार्यक्रमासाठी नक्की या.
आम्ही निमंत्रित केलेल्यांपैकी बरेचसे पालक व लहान मुले दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला आले. आम्हाला त्यांना पाहून खुप आनंद झाला. मग आम्ही शिक्षकांच्या मदतीने त्यांनापण कार्यक्रमाच्या रांगेत बसवले. ते सर्वजण संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत थांबले. नंतर आम्ही त्यांना बिस्किट्स आणि चॉकलेट्स दिले, त्यांच्यासोबत गप्पा केल्या. आम्हाला खुप आनंद वाटला.
निमंत्रक: शरद पाटील
प्रगती गट, बेडूकवाडी

कुमार निर्माणच्या प्रगती गटातील मुलींना जाता येताना गावातील वाचनालय बंद असलेलं दिसत होतं. गावातील लोकांना आणि मुला-मुलींना वाचनाची आवड लागावी म्हणून हे वाचनालय सुरु असणं गरजेचं आहे असं या मुलींना वाटलं. त्यांनी हा विषय बैठकीत मांडला आणि मग आपण वाचनालय सुरु करूया असं ठरलं. मग वाचनालय जे काका चालवायचे त्यांना गट जाऊन भेटला. कुणी वाचायला येत नसल्याने वाचनालय बंद आहे असं उत्तर मिळालं. मुला-मुलींनी विनंती करून त्यांच्याकडून वाचनालयाच्या चाव्या मिळवल्या व आम्ही वाचनालय चालवू असं त्या काकांना सांगितलं. त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती देखील मिळवली. पाहिले काही दिवस वाचनालयातील पुस्तकं गटाने व्यवस्थित लावली. मुलांनी सर्वांच्या मताने ठरवले की प्रत्येक रविवारी एक तासासाठी वाचनालय चालु करायचे. त्यादिवशी कुणालाही पुस्तके मिळतील. त्याची नोंदवहीमध्ये नोंद करायची. यासाठी मुलांनी एकदम मस्त कल्पना लढवली ती म्हणजे दर रविवारी गटातील दोन मुलं-मुली यासाठी वाचनालयामध्ये येतील. एकजण पुस्तक देण्याघेण्याचे काम पाहील आणि दुसरा नोंदणीचे काम पाहील.
पहिल्याच रविवारी गटातील सर्वांनी काम शिकून घेतलं. मुला-मुलींना पुस्तकं बघून खूप आनंद झाला. गटातील प्रत्त्येकाने एक-एक पुस्तक घेतले.
निमंत्रक- सदानंद चिंचकर
चोपडा गट, जळगाव
२४ जुलैला आमच्या गटाची बैठक झाली. त्यात चर्चेत चोपडा शहरात हरेश्वर येथे श्रावण मासानिमित्त होणाऱ्या दर सोमवारच्या यात्रेत खूप कचरा व अस्वच्छता असते ही समस्या मुलांच्या लक्षात आली यावर बरीच चर्चा झाली. नंतरच्या मिटींगला येताना मुले कचरा जमा होण्याच्या जागा पाहून आले त्यामुळे आम्ही कचरा गोळा करण्यासाठी काय उपाय करता येतील यावर चर्चा केली. यात काहींच्या मते चोपडा नगरपरिषदेला कळवावे, काहींच्या मते कचरा करणार्‍यांना फुले देऊ तर काहींच्या मते बॅनर लावू अशी चर्चा झाली. परंतु यावर आणखी सोपा उपाय कोणता यावर चर्चा करताना आपण कचरा कुंड्या ठेवूया असे निश्चित झाले. कचरा कुंड्या टाकाऊतून टिकाऊ असाव्यात म्हणून शाळेत पुरक आहार म्हणून मुलांनी मिळणार्‍या बिस्किटांचे खोके वापरले. ३० जुलै रोजी म्हणजे आदल्या दिवशी रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता हरेश्वर मंदिराजवळ जमून १२ कचरा कुंड्या स्टिकर लावून ठेवल्या. ३१ जुलैच्या संध्याकाळी सात वाजता म्हणजे यात्रा संपल्यावर सर्व मुलांनी कुंड्यांतील कचरा गोळा करून जाळला पुन्हा पुढच्या सोमवारीही म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी कचरा कुंड्या ठेवून ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता जमून कचरा गोळा करून जाळला.                                                    
निमंत्रक: जितेंद्र देवरे



No comments:

Post a Comment