Monday 26 February 2018

अनुक्रमणिका


अनुक्रमणिका

संपादकीय मंडळ
  • ·       अमृत बंग
  • ·       प्रफुल्ल शशिकांत
  • ·       प्रणाली सिसोदिया
  • ·       शैलेश जाधव


संपर्क

प्रणाली ९७६७४८८३३७
शैलेश  ९५०३०६०६९८
इमेल
contact.knirman@gmail.com


अंक पहिला | फेब्रुवारी २०१८
हे मासिक खालील लिंक वर मूळ स्वरुपात वाचता येईल
http://kumarnirman.blogspot.in/

(खाजगी वितरणासाठी)

संवादाकीय


संवादकीय
हेल्लो मित्रांनो...
कसे आहात? सर्व मजेत ना?
आम्हीही इकडे मजेत आहोत.
नवीन वर्षाचे हे पहिले ‘भरारी’! त्यामुळे उशिराने का होईना तुम्हा सर्वांना आमच्याकडून नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा! सोबतच होळीच्याही शुभेच्छा!
नुकताच आपण कुमार निर्माणच्या ५व्या सत्रात प्रवेश केला आहे. मागील सत्रात तुम्ही सर्वांनीच आपापल्या ठिकाणी उल्लेखनीय काम केल्याबद्दल तुमचे विशेष कौतुक आणि या सत्रात तुम्हा जुन्या मित्रांचे प्रेमपूर्वक स्वागत! तुमच्यासोबत या सत्रात काही नवीन मित्रही जोडल्या गेले आहेत. या नवीन मित्रांचेही कुमार निर्माण मध्ये मनःपूर्वक स्वागत!
नुकत्याच कुमार निर्माणच्या पाचव्या सत्राच्या ‘निमंत्रक प्रशिक्षण कार्यशाळा’ जळगाव व पुणे येथे संपन्न झाल्या. यावर्षी महाराष्ट्रभरातून साधारण ९५ संघांची नोंदणी झालेली आहे. या कार्यशाळांत आम्ही ‘कुमार निर्माण’ समजून घेतले, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली, तुम्ही केलेले कृतिकार्यक्रम तुमच्याच निमंत्रकांकडून शेकोटीसमोर बसून ऐकले, छोटे सिनेमेही पहिले. सोबतच खुप खेळलो, गाणी म्हटली आणि भरपूर मज्जा केली!
तुम्ही केलेले कृतिकार्यक्रम तुमच्या निमंत्रकांच्या तोंडून ऐकताना आम्हाला खुप आनंद झाला. तुम्ही करत असलेले कृतिकार्यक्रम आणि त्यातून तुम्हाला मिळणारा आनंद ही कुमार निर्माणच्या पाठीवर मिळालेली एक कौतुकाची थापच आहे!
तुमच्या बैठका सुरळीत चालल्या असतील याची आम्हाला खात्री आहे. काही संघांत यावर्षी नवीन मित्रही जोडल्या गेले असतील. त्यांना संघातील जुन्या मुला-मुलींनी कुमार निर्माण समजावून सांगणे आणि संघाचा भाग करून घेणे गरजेचे आहे.
सोबतच काही ठिकाणी नवीन संघांची स्थापना झाली असेल. नवीन मुलांना ‘कुमार निर्माण म्हणजे काय बरं असेल?, त्यात आपण काय करणार?’ असे एक ना अनेक प्रश्नही पडले असतील. तर मित्रांनो, तुमच्या निमंत्रकांच्या मदतीने आणि काही आमच्या मदतीने तुम्हाला हळूहळू सगळं समजेल पण सध्यासाठी एक मात्र पक्कं लक्षात ठेवा की ‘कुमार निर्माण मध्ये तुम्ही खुप खेळणार आहात, फिरायला जाणार आहात, नवीन मित्र-मैत्रिणी जोडणार आहात, अनेक विषयांवर चर्चा करणार आहात आणि तुमच्या कृतीने तुमचा परिसर आहे त्यापेक्षा अजून सुंदर बनवणार आहात.’ थोडक्यात काय तर इथून पुढे वर्षभर आपण सर्व मिळून खुप मजा-मस्ती करणार आहोत!
आतापर्यंत स्वतःच्या नवीन संघाला तुम्ही छानसे नावही ठेवले असेल, संघातील कुणाचीतरी संघप्रमुख म्हणून नेमणूक झाली असेल आणि तुमच्या बैठकाही सुरु झाल्या असतील किंबहुना सुरुवात जोरदारच झाली आहे हे आम्हाला तुमच्या निमंत्रकांकडून कळलेले आहेच.
तुमचा उत्साह पुढेही असाच टिकून राहावा म्हणून आम्ही दर २ महिन्यांनी तुम्हाला हे ‘भरारी’ पाठवत राहू, जेणेकरून तुम्हाला इतर संघांत काय सुरु आहे हेही कळेल.  त्या माध्यमाने तुमच्याशी संपर्कात राहू, अधून-मधुन आम्ही तुम्हाला भेटायलाही येऊ. तुम्हाला ‘कुमार निर्माण’ सबंधित काहीही मदत लागल्यास आम्हाला नक्की फोन करा. आमचे संपर्क क्रमांक पहिल्या पानावर आहेतच आणि हो, बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही तर लवकरच आम्ही तुम्हा सर्वांना भेटायला येतोय. सोबतच आम्हाला आपल्या नवीन मित्रांनाही भेटण्याची उत्सुकता लागली आहे.  तेव्हा लवकरच भेटु, खुप-खुप खेळू आणि मज्जा करू!
तोपर्यंत तुमच्या पुढील प्रवासास खुप साऱ्या शुभेच्छा!

कुमार निर्माण म्हणजे काय रे भाऊ !


कुमार निर्माण म्हणजे काय रे भाऊ !
मुलांनो तुम्ही कुमार निर्माण मध्ये सहभागी तर झालात, पण कुमार निर्माण म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का ?
चला तर मग कुमार निर्माण विषयी आपण थोडं जाणून घेऊया.
कुमार निर्माण हा निर्माण - सर्च, गडचिरोली आणि MKCL KF, पुणे या दोन संस्थांद्वारे तुम्हा मुलांसाठी चालवण्यात येणारा एक उपक्रम आहे. नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळालेले डॉ. अभय बंग व एम के सी एल चे संस्थापक श्री. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा उपक्रम पाच वर्षांपूर्वी सुरु झाला.
शाळेतील शिक्षण भविष्याच्या दिशेने जसे महत्त्वाचे आहे तसेच शाळेच्या बाहेरील जगातून मिळणारे अनुभवाचे शिक्षण देखील खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षणासोबतच चार भिंतींच्या बाहेर जाऊन, प्रत्यक्ष कृती करून जर आपल्याला शिकता आलं तर अधिक आनंददायी असं अनुभवातून शिक्षण देखील आपल्याला घेता येऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला आनंदाने कृतीतून शिकता यावं म्हणून हा उपक्रम आहे. इथे शिकता यावं म्हणजे अनेक भन्नाट गोष्टी करून शिकता येणं अपेक्षित आहे.
मनातील चांगले उपक्रम, नवीन आईडिया, विधायक कृती, प्रयोग इ. करण्याची हक्काची जागा म्हणजे कुमार निर्माण! हा उपक्रम तुमचा असल्याने कुठलंही चांगलं काम करण्याचं तुम्हाला येथे स्वातंत्र्य आहे. चला तर मग तुमच्या बुद्धीला चालना द्या, डोकं चालवा आणि नवनवीन कल्पना करा, चांगले चांगले उपक्रम करा, इतरांना मदत करा, आपली, त्यासोबतच आपल्या घरच्यांची, मित्रांची, परिसराची त्यातील व्यक्तींची, प्राण्यांची, झाडांची आणि इतरही सर्व गोष्टींची काळजी घ्या, आणि हे सगळं करत असतांना भरपूर मज्जा करा!
कुमार निर्माण मधील उपक्रम तुम्ही मुलांनी स्वतः निवडायचे आणि संघात चर्चा करून ठरवायचे आहेत. त्यासाठी तुम्ही तुमच्या संघासोबत काम करणाऱ्या ताई, दादा, पालक, शिक्षक यांची मदत घेऊ शकता. (या तुमच्या ताई, दादा, पालक, शिक्षक यांना आम्ही ‘निमंत्रक’ असे म्हणतो) तुम्हाला उपक्रम सुचण्यासाठी तुम्ही परिसराकडे उघड्या डोळ्यांनी बघणं गरजेचं आहे. परिसराचं निरीक्षण करून, विचार करून, चर्चा करून उपक्रम निवडावे आणि त्यावर कृती करावी असं अपेक्षित आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला गरजेनुसार मदत करूच.
तुमच्या माहितीसाठी मागील वर्षात कुमार निर्माणच्या संघांनी केलेले काही कृती कार्यक्रम या अंकात देत आहोत. हे उपक्रम मुलांना सुचलेले आहेत आणि त्यांनीच ते प्रत्यक्षात उतरवलेले आहेत. तुम्हीदेखील असे उपक्रम नक्कीच करू शकता आणि इतरही नवे उपक्रम करू शकता.
कुमार निर्माण मध्ये उपक्रम करताना एक काळजी नक्की घ्या की ते उपक्रम करताना कुणालाही त्रास होता कामा नये, परिसराचं नुकसान होऊ नये आणि संघातील कुणालाही इजा होता कामा नये.
चला तर मग तुम्हाला असे उपक्रम करण्यासठी अनेक शुभेच्छा! एखादा उपक्रम करताना किंवा सुचण्यास तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला देखील फोन करू शकता. त्या सोबतच उपक्रम करताना किंवा उपक्रमानंतर तुम्हाला काय अनुभव आला तेही आम्हाला नक्की लिहून अथवा फोन वर कळवा.
तुमचे,
कुमार निर्माण टीम

संघप्रमुख व संघबैठक


संघप्रमुख
रविवारची मस्त सकाळ उजाडली. आज शाळा नसल्यामुळे सुरज मात्र अंथरुणातच लोळत होता. रात्री उशीरापर्यंत जागून त्याने भारत – इंग्लंड क्रिकेट मॅच पहिली होती. त्यामुळे आईनेदेखील त्याला अजून उठवायला हाक मारली नव्हती. बाबा आणि आई कालच्या मॅच विषयीच बोलत होते.
‘काय सुंदर मॅच झाली ना काल?’, आई म्हणाली.
‘विराट सारखा कप्तान असल्यावर टीम सुंदर काम करणारच’, बाबा म्हणाले.
सुरज अर्धवट झोपेत हे संभाषण ऐकत होता. अचानक त्याला आठवलं की आज सकाळी कुमार निर्माण संघाची बैठक आहे. सुरज आपल्या कुमार निर्माण संघाचा प्रमुख होता. संघाच्या बैठका बोलावणं, त्यामध्ये काय झालं हे लिहून ठेवणं, मुलांशी व निमंत्रकांशी संपर्क ठेवणं ही त्याची जबाबदारी होती.
सुरज खडबडून जागा झाला, अंथरून फेकून देतच तो उठला व आन्हिक आवरायला पळाला. आई-बाबा त्याच्या गडबडीकडे आश्चर्याने पहातच राहिले.
‘आज कुमार निर्माणची बैठक आहे, संघप्रमुख म्हणून मी सर्वात आधी पोचायला हवं!’, सुरजने घोषणा केली.
अंघोळ करून सुरजने स्वच्छ कपडे घातले. आईने दिलेला दुधाचा ग्लास एका घोटात रिकामा करून तो बाहेर पडणार इतक्यात त्याला त्याचं अंथरूण दिसलं.
‘कुमार निर्माण संघात असताना मी माझी कामं स्वत: करायलाच हवीत, त्यात मी तर संघप्रमुख आहे! अंथरुणाची घडी घालूनच जायला हवं’, त्याच्या मनात विचार आला.
अंथरुणाची घडी घालून त्याने ते जागेवर ठेवलं. संघाची नोंदवही आणि पेन घेऊन उत्साहाने तो घराबाहेर पडला.
------------------------------------------------------------------------------------
१.      संघप्रमुखाच्या जबाबदाऱ्या काय यावर चर्चा करा.         
२.      संघप्रमुख लोकशाही पद्धतीने निवडा.
संघ बैठक
सुरज लगबगीने बैठकीच्या ठिकाणी म्हणजे शाळेसमोरील झाडाखाली पोहचला. संघातील प्रिया व मोनाली या दोघी तिथे आधीच पोहोचलेल्या होत्या. त्यांच्यासोबत संघ निमंत्रक ‘वृषाली ताई’ देखील होत्या. मग सुरज, प्रिया आणि मोनाली यांनी मिळून कोण कोणाला बोलावणार हे ठरवलं व त्याप्रमाणे त्यांनी संघातील इतर सर्वांना बोलावून आणलं. सगळे आल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली पण या सगळ्यात बैठकीला ठरलेल्या वेळेपेक्षा जवळपास अर्धा तास उशीर झाला होता.
सगळयांनी एक छान गाणं म्हणून बैठकीची सुरुवात केली. त्या नंतर चर्चेला सुरुवात झाली. गप्पा छान रंगात आल्या होत्या पुढची
कृती काय करणार यावर सगळे हिरीरीने आपापली मतं मांडत होती. तेवढ्यात वृषाली ताईंनी मुलांना घड्याळ दाखवत थांबवलं.
“चला मुलांनो मला आता निघायला लागेल. माझं जरा तालुक्याच्या ठिकाणी काम आहे.”
मुला-मुलींना एवढी रंगत आलेली बैठक सोडून जायला नको होतं. या बैठकीत काय कृती करायची हे ठरवायचंच असं त्यांनी ठरवलं होतं. बैठकीच्या शेवटी नेहमीप्रमाणे खेळ देखील खेळायचा होता आणि आता मध्येच ताई जायचं म्हणत होत्या. काहींना तर ताईंचा राग देखील आला.
“ताई जरा वेळात आपली बैठक संपेलच” प्रशांत म्हणाला.
पण ताईंना तालुक्याच्या गावी जाण्यासाठी एकच एसटी होती त्यामुळे ताईंना वेळेत निघायला हवं होतं.
“तुम्ही बैठक सुरु ठेवा, बैठकीत काय झालं ते सुरज मला सांगेल.” असं म्हणून ताई तिथून निघाल्या. ताई मधूनच गेल्याने सर्वांचाच मूड गेला.
“ताई अशा कशा जाऊ शकतात बैठक सोडून?” प्रशांत जरा रागातच म्हणाला.
“आपण उशिरा आल्याने बैठक उशिरा सुरु झाली म्हणून ताईंना अशी बैठक अर्ध्यात सोडून जावं लागलं” प्रिया समजूतदार पणे म्हणाली.
“माझा अभ्यास बाकी होता, मी तो संपवून आलो म्हणून मला उशीर झाला.” मनोज म्हणाला.
“माझी आवडती सिरीयल सुरु होती” सानिका जीभ चावत म्हणाली.
“काही असलं तरी आपली बैठक आहे हे आपल्या सर्वांना माहिती होतं तरी देखील आपण उशिरा आलो म्हणून आज ताईंना असं बैठक सोडून जावं लागलं” मोनाली म्हणाली. सर्वांनी यावर काही वेळ विचार केला. शेवटी इथून पुढे योग्य नियोजन करून बैठकीला वेळेत हजर राहायचं सगळ्यांनी कबुल केलं.
“पुढच्या बैठकीला ताईंना आपण सॉरी म्हणूया.” प्रशांत म्हणाला
“चला तर मग पुढची बैठक वेळेत सुरु करूया आणि आता खेळ खेळूया” असं म्हणत मुलं-मुली खेळ खेळला मैदानाकडे पळाली..
-----------------------------------------------------------------------------------------
असंच इतर गटांच्या बैठकीत काय झालं ते बघूया...
झोळंबे, सिंधुदुर्ग
आमची पहिली बैठक १० फेब्रुवारीला झाली. बैठकीत मुलांच्या आवडीचे बरेच खेळ घेतले. एक गाणंही घेतलं. मुलांनी संघाला काही नावं सुचवली, त्याचा निर्णय पुढच्या बैठकीत करायचा ठरला. नोंदवहीदेखील तेव्हाच करायची ठरली.
मग संघप्रमुख कसा निवडावा यावर चर्चा सुरु झाली आणि मुलांनी वेगवेगळ्या कल्पना सुचवल्या. जसे की, चिठ्ठ्या करून एक प्रमुख निवडणे, ज्यांची इच्छा आहे त्यांनी उभे राहून साधे मतदान करणे, दोन गट करून प्रत्येक गटाचा एक प्रतिनिधी ठरवून नंतर त्या दोघांत मतदान घेणे आणि प्रत्येकाने आपल्याला कोण प्रमुख व्हावा असे वाटते त्याची चिठ्ठी बनवणे व ज्याच्या नावाच्या जास्त चिठ्ठ्या येतील तो प्रमुख!
यातून शेवटी पहिल्या पद्धतीला बहुमत आल्याने चिठ्ठ्या करून एक प्रमुख निवडला. प्रमुख मात्र दर महिन्याला बदलायचे ठरले. म्हणजे पुढच्या महिन्यात; १० मार्चला नवीन प्रमुख होणार. तेव्हा कॅलेंडर पाहून मुलांच्या लक्षात आलं की तेव्हाही शनिवार आहे. मग प्रत्येक महिन्यात असं होतं का की याच महिन्यात असं आहे? लीप वर्ष आहे का हे? लीप वर्ष म्हणजे काय? अशी चर्चा आपसूक सुरु झाली. एक मुलगी स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्ता चाचणीच्या अभ्यासातील वर्ष आणि वारांचे नियम सांगू लागली. मला हे सगळं पाहून फार मज्जा येत होती. माझ्या अपेक्षेपेक्षा मुलांनी छान प्रतिसाद दिला. बैठक छान झाली!
निमंत्रक: अश्विनी जोशी, झोळंबे, सिंधुदुर्ग
राईझिंग स्टार्स संघ, जळगाव
आम्ही आमची बैठक माझ्या घरीच घेतली. संघाचं नाव व प्रमुख मतदान करून ठरवावे लागले. आमच्या संघाचं नाव राईझिंग स्टार्स असं ठरलं आहे.
नंतर नुकताच कुमार निर्माणचे मार्गदर्शक डॉ. अभय व राणी बंग यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराचा आधार घेऊन चर्चा सुरु झाली. पुढचे दोन तास वेगवेगळ्या बाजूंनी आम्ही यावर चर्चा करत होतो. एकूण बैठक छान झाली.
निमंत्रक: मंजुषा पत्की, जळगाव


संस्कृती संघ, मुक्ताईनगर
आमच्या संघाची पहिली बैठक जोशात पार पडली. त्यातील काही ठळक मुद्दे – बैठकीची सुरुवात व शेवट उत्साहपूर्ण खेळाने झाली. वेगळ्या पद्धतीने सर्वांचा परिचय करून घेतला. कुमार निर्माणबद्दल सर्वांना माहिती सांगितली व त्यावर चर्चा केली. मग संघाचे नाव ठरवायची वेळ आली तेव्हा संस्कार आणि संस्कृती अशी दोन नावे समोर आली. मग मुलांनी मतदान करून संस्कृती हे नाव ठरवलं. संघप्रमुखाची निवडही मतदान करूनच केली. त्यानंतर कुमार निर्माणचे माहिती पत्रक वाचण्यात आले आणि बैठकीचा समारोप झाला.
निमंत्रक: योगेश जवंजाळ, मुक्ताईनगर
स्पंदन संघ, दापोली
आमच्या संघाची पहिली बैठक ११ फेब्रुवारीला झाली. सुरुवातीला आम्ही चिठ्ठ्या टाकून संघाचं नाव स्पंदन ठेवलं. सगळ्यांनी मिळून संघातील गायत्रीला संघप्रमुख म्हणून नेमलं. मग पालकसभा घ्यावी असं मी सुचवलं तेव्हा उद्या पालकांना विचारून तारीख ठरवुया असं मुलं म्हणाली. मग २५ फेब्रुवारीला म्हणजे रविवारी गावाच्या नदीवर डबापार्टी करण्याचे ठरले आणि त्याचे नियोजन पुढील सभेत करू असं मुलांनी ठरवलं. ‘वादळ सुटलं वारा सुटला’ हा खेळ आम्ही खेळलो आणि नंतर ‘पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी... या मनामनातून भांधूया एक वाट जाणारी’ हे गाणं सर्वांनी मिळून म्हटलं. मुलं फारच उत्साहात होती, त्यांना मजा वाटत होती वेगळं काहीतरी करणार याची!
निमंत्रक: सुप्रिया पाटणकर, दापोली




प्रगती संघ, दापोली
आमच्या प्रगती संघाची पहिली सभा ७ फेब्रुवारीला झाली. संघाचं नाव मुलांनी पहिलेच ठरवलं होतं. मग मुलांनी चिठ्ठ्या टाकून प्रियांशूची संघप्रमुख म्हणून निवड केली. मग उप संघप्रमुखही निवडायचं ठरवलं. पुन्हा चिठ्ठ्या टाकून तन्वीची उप संघप्रमुख म्हणून निवड झाली. मुलांनी पुढच्या बैठकीत पालकसभा आणि डबा पार्टी घेण्याचं ठरवलंय. मुलांनी प्रश्नखोका तयार केला आहे. त्यात त्यांना पडलेले प्रश्न चिठ्ठ्यांवर लिहून टाकले आहेत. जसे की, सह्याद्री शिखर उंच का आहे?, काच कशाची बनते?, फुलांमध्ये मध कुठून तयार होतो? आपल्या शरीरात मन नावाचा अवयव नाही तरीही आपण मनापासून हे करा ते करा असं का म्हणतो?, कांगारूच्या पोटाला पिशवी का असते?, समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का दिसतो?, जगात ज्वालामुखी का असतात?, पृथ्वीसारखी जीवसृष्टी सूर्यमालेतील इतर ग्रहांवर का नाही?, इ. यातील काही प्रश्नांची आम्ही चर्चा केली आणि नंतर मग आम्ही ‘लंबी दाढीवाले बाssबाss’ हे गाणं म्हटलं आणि बैठक संपली!
निमंत्रक: विद्यालंकार घारपुरे, दापोली
लिटील ग्रुप, अकोला
आम्ही आमच्या बैठकीला प्रार्थनेने सुरुवात केली. नंतर एक खेळातून सर्वांशी ओळख करून घेतली. मग मुलांना कुमार निर्माणची
माहिती सांगितली, त्यात मुलांनीही काही प्रश्न विचारले. डॉ. अभय बंग यांच्या विषयी जाणून घेण्यास मुले उत्सुक होती.
संघाचं नाव ठरवताना प्रत्येकाने आपल्या संघाचं नाव काय असावं ते सांगितलं. त्यात मुलांनी बरीच नावं सुचवली. मग प्रत्येकाने स्वतःला हवं असणाऱ्या नावाची एक-एक चिठ्ठी टाकली. त्यातून एक चिठ्ठी उचलली अन त्यानुसार मुलांनी संघाचं नाव लिटील ग्रुप असं ठेवलं. चिठ्ठ्यांच्या मदतीनेच गौरव हा संघप्रमुख तर आदर्श हा उप संघप्रमुख बनला.
आम्ही परत एक खेळ खेळलो आणि पुढच्या बैठकीत आम्ही डब्बापार्टी करायचं ठरवलं आहे. अशाप्रकारे आमच्या संघाची सुरुवात छान झाली!
निमंत्रक: प्रतिभा काटे, सारिका तेलगोटे, अकोला
प्रगती संघ, बेडकुचीवाडी, बीड
आमच्या प्रगती संघाची बैठक ८ फेब्रुवारी रोजी झाली. बैठकीची सुरवात छानपैकी खेळाने करण्यात आली.
नंतर मुलांनी पालकसभा भरवली. दादांनी सुरुवातीला पालकांना कुमार निर्माण बद्दल सविस्तर माहिती दिली. आम्ही कुमार निर्माण मध्ये काय काय करतो, निमंञक म्हणुन दादा काय करतात हे पण पालकांना सांगितलं. आमचा संघ मागील एक वर्षापासून कुमार निर्माण मध्ये असल्यामुळे संघातील सागरने पुर्ण वर्षभरात आम्ही काय काय केलं व कशी मज्जा आली ते पालकांना सांगितलं. त्यानंतर पालकांनी काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं आम्ही दिली. हे सर्व आटोपल्यानंतर पालक गेले.
मग दादांनी बैठकीत संघप्रमुख निवडीबद्दल विचारलं. आम्ही भन्नाट आयडिया सुचवल्या; एकजण म्हणे चिठ्ठी टाकून निवडू तर दुसरा दादांना म्हणे तुम्हीच ठरवा. दादा म्हटले संघप्रमुख तुम्हीच निवडावा. तर ओंकारने मतदान करून निवड करायची असं सुचवलं. तर सर्वजण तयार झाले. पण सुरुवातीला उमेदवार म्हणुन चार-पाच जण उभे राहिले, मग आधी संघप्रमुखाची कामं काय काय असतील यावर आम्ही चर्चा केली तर सगळे उभे राहिलेले उमेदवार खाली बसले. त्यानंतर सागर आणि रूपाली स्वत:हून निवडणूकीला उभे राहिले. ओंकार व अभिजीत या दोघांनी निवडणुकीचे नियम ठरवले, तसंच उमेदवाराला त्यांचं चिन्ह विचारून घेतलं.
नियम –
·        निवडणुकीमध्ये कुणीही गोंधळ घालायचा नाही.
·        मतदान करताना एकावेळी एकच जण खोलीत जाईल.
·        नावाच्या पुढे फक्त एकच खुण करायची.
·        मतमोजणी करून जिंकलेल्या संघप्रमुखाचे अभिनंदन करायचं.
·        सर्वांनी ठरवलं की संघप्रमुख दर तीन महिन्याला याच पध्दतीने बदलण्यात येईल.
मग एका वहीवर प्रगती संघ निवडणुक २०१८ व तसेच  दोन्ही उमेदवाराची नावे, त्यांची चिन्ह टाकून तयार केली. दोघेजण दरवाज्याजवळ थांबुन एकेकाला आतमध्ये सोडत होते. अशाप्रकारे प्रगती संघाची निवडणुक एकदम सुरळीत पार पडली!
मतमोजणी करून जिंकलेल्या उमेदवाराचं म्हणजे रूपालीचं सर्वांनी आभिनंदन केलं. विशेष म्हणजे आमच्यातील काही मुलांनी सागरला सॉरीही म्हटलं की आम्ही तुला मत नाही दिलं.
बैठकीच्या शेवटी दादांनी आम्हाला डब्बा पार्टी बद्दल विचारलं तर सर्वांनी खुप आनंदाने ठरवलं की शेजारील गावाजवळ नदीच्या कडेला छान मंदिर, नदीवर बंधारा आहे तिकडे जाऊया. आम्ही १३ तारखेचा महाशिवराञी निमित्त सुट्टीचा दिवस निवडला.
एकंदरीत आमची बैठक मस्त झाली आणि आम्ही खुप मज्जाही केली.
निमंत्रक: सदानंद चिंचकर, बेडकुची वाडी, बीड

मुलांच्या लेखणीतून


आमच्या गावची यात्रा!
आमच्या संघाचे नाव ‘उडान’ आहे. १८-११-१७ रोजी शनिवारी आमची बैठक झाली. येणाऱ्या शुक्रवारी आमच्या गावात यात्रा
भरणार होती. यात्रेत आमाले काहीतरी करायचं होतं. बैठकीत आम्ही ठरवलं की, आपण यात्रेत येणाऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करू. आणि गोपालने सांगलं की यात्रेत खुप कचरा होतो, तो होऊ नये म्हणून आपण यात्रेत कचराकुंड्या ठेवू. मग आम्ही सर्व तयारीला लागलो.
पुन्हा बुधवारी आम्ही तयारीसाठी छोटी मिटिंग घेतली.
यात्रेत पाणपोई लावण्यासाठी आम्ही फायबरच्या मोठ्या तीन टाक्या स्वच्छ पाण्याने एका मोक्याच्या जागी भरून ठेवल्या. प्रत्येकाकडून एक-एक ग्लास असे १०-१२ ग्लास जमा केले. शाळेतला एक टेबल नेऊन त्या टेबलावर पाणी वाटप केलं.
शाळेत असणाऱ्या विध्यार्थी हजेरीतले कोरे पानं कापून एक हजेरी तयार केली. दोन-दोन मुलांची दोन तास अशी पाणी वाटण्याची ड्युटी लावली कारण सर्वांना यात्रेत फिरायला पण वेळ मिळायला पाहिजे.
सर्वांनी दोन-दोन तास पाणी वाटायचं काम व्यवस्थित केलं. आमच्या शाळेत आम्ही गॅदरिंगच्या वेळेस बनवलेलं बॅनर होतं. आम्ही ते बाहेर काढलं. आमच्या व गावकऱ्यांच्या तर्फे जलसेवा असं दादांनी एका कार्डशीटवर लिहिलं अ आम्ही ते त्या बॅनरवर लावलं.
आम्ही यात्रेत जागोजागी कचराकुंड्या पण ठेवल्या होत्या. दादांनी आम्हाला किराणा दुकानातून पुठ्ठे आणून दिले होते. आम्ही ते पुठ्ठे चिकटपट्टीने पक्के चिकटवून त्यांचे बॉक्स तयार केले. त्यावर ‘कुमार निर्माण – उडान गट’ व ‘कचरापेटी’ असं दादांकडून लिहून त्या १२ कचराकुंड्या यात्रेत सर्वदूर ठेवल्या.
यात्रेत दोन दिवस आम्ही खुप लोकांना पाणी पाजलं व आमच्या कचराकुंड्यांमुळे यावर्षी यात्रेत कचरापण कमी झाला.
दीक्षा जगदेव इंगळे
निमंत्रक: मंगेश ढेंगे, मुक्ताईनगर
आमची फन फेअर!
आम्हा मुलांना एक फन फेअर करायची खुप इच्छा होती म्हणून आम्ही फन फेअर करायची ठरवली. त्यातून मिळणारे पैसे आम्ही अंध शाळेला द्यायचे ठरवले. डिसेंबरमध्ये अडचण असल्याने आम्ही २६ नोव्हेंबरला फन फेअर करायची ठरवली. त्यासाठी सर्वांची परवानगी घेतली. आम्ही जय्यत तयारी केली. तीन दिवस आधी प्रत्येक बिल्डिंगमध्ये पोस्टर्स लावले. अखेर तो दिवस आला. फन फेअर संध्याकाळी ६.३० ला चालू होणार होतं. आम्ही ४ वाजताच खुर्च्या मांडल्या व तयारी केली. ६ वाजता तयार होऊन आम्ही परत आलो व सगळे सामान आणले. मी भेळ बनवत होतो. ६.३० वाजले. आत येणारा पहिला मुलगा सी विंगमधला रोनीत होता. सगळे त्याला स्वतःच्या स्टॉलवर बोलावू लागले. मग हळू-हळू अजून लोकं आली. दाराच्या सगळ्यात जवळ सुमेध होता. तो बटाटेवडे विकत होता, मग मी होतो, माझ्या बाजूला टेबलवर मिती-मधुरा व स्वानंद होते. मिती-मधुरा दाबेली विकत होत्या तर स्वानंद सॅन्डविच! त्याची आई सॅन्डविच खुप मस्त बनवते म्हणून मी त्याला आणायला विचारले होते आणि त्याने आणले. त्याच्यापुढे अर्णव खुप चविष्ट मिल्कशेक विकत होता. ईशा व अद्वैत खेळ खेळवत होते. अद्वैतचा खेळ लोकांनी खुप वेळ खेळला. आमच्या सगळ्यांचे खाण्याचे स्टॉल रात्री ८.३०ला संपले आणि आमची फन फेअरपण संपली. या फन फेअरमधुन आम्ही ३००० रु. जमवले. ते आम्ही अंधशाळेला दिले.
ईशान मराठे
निमंत्रक: प्रसन्न मराठे, पुणे
आम्ही गावात कचराकुंड्या ठेवल्या!
आम्ही एके दिवशी बैठकीला बसलेलो होतो आणि आमच्या गावाबद्दल चर्चा सुरु होती. आमचं गाव तसं छोटसंच आहे. तेव्हा गावात इकडे-तिकडे खुप कचरा पडलेला असतो यावर चर्चा सुरु झाली. मग गावातील कोणकोणत्या जागी जास्त कचरा पडलेला असतो यावरपण आमची चर्चा झाली. मग आम्ही ठरवलं की गावातल्या दुकानांसमोर काही कचराकुंड्या ठेवायच्या. मग कशाप्रकारच्या कचराकुंड्या ठेवाव्यात यावर आम्ही बोलत असताना संघातील एक जण म्हटला की प्लास्टिकच्या कचराकुंड्याचा विचार केला तर एका कचराकुंडीसाठी ३००-४०० रु. लागतील तर ते पैसे कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला. मग आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना जाऊन भेटलो आणि आमची कल्पना आणि आमच्यात झालेली चर्चा त्यांना सांगितली आणि आमची अडचणपण सांगितली. तेवढ्यात सर म्हणाले, “अरे! शाळेत रिकामे खोके पडलेले आहेत. त्यापासून तुम्ही कचराकुंड्या तयार करू शकता.”
मग काय, आम्हाला भारीच आयडिया मिळाली. मग आमच्या संघातील रोहन व मयुरने मोठमोठे ६-७ खोके आणले. त्यावर आम्ही ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे!’, ‘कुमार निर्माण – भराडीची भरारी गट’ असं लिहिलं. ठरल्याप्रमाणे आम्ही गावातील काही दुकानांच्यासमोर त्या कचराकुंड्या ठेवल्या आणि लोकांना त्यात कचरा टाकण्याची विनंतीपण केली.
निमंत्रक: समाधान ठाकरे, भराडी
आम्ही पाऊस मोजला!
एका बैठकीत चर्चा करत असताना आमचा पाण्याचा विषय निघाला. कारण गावाकडे तसेच एकंदरीत मराठवाड्यात पाण्याची समस्या खुपच गंभीर आहे. मग आम्ही पाण्यासंबंधी सर्व बाजूंनी चर्चा सुरु केली. नंतर आमच्या संघातील वैष्णवीने हिने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बद्दल मुलांना माहिती सांगितली. मग आम्ही त्याबद्दल चर्चा केली. पण आम्हाला याविषयी सखोल माहिती नव्हती म्हणून आम्ही पुरेशी माहिती जमवून पुढच्या बैठकीत या विषयावर चर्चा करायची असं ठरवलं.
आम्ही पुढच्या बैठकीला जमलो तेव्हा आम्ही सुरुवातीला खेळ खेळलो. मग आमच्या निमंत्रक दादांनी आम्हाला ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ संबंधीचे काही विडीयो दाखवले. ते बघताना आम्हाला खुप प्रश्न पडले, त्यावर आम्ही भरपूर चर्चा केली. आणि मग आम्हाला हा ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा  प्रयोग करायची उत्सुकता लागली.  हा प्रयोग संघातील एका मुलीच्या छतावर करायचं ठरलं.
आम्ही बैठकीला येण्याआधी याबद्दल बराच अभ्यास केला होता. एक छोटासा प्रयोग करून गावातील लोकांत पाण्याचे महत्त्व व ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ या संकल्पनेची जनजागृती करायची असं ठरलं.
पुढच्या बैठकीत दादांनी आम्हाला एक विडीयो दाखवला ज्यात पाऊस मोजण्याची एक सोपी पद्धत दाखवली होती. ते बघितल्यावर आम्ही तो प्रयोग करायचं ठरवलं. त्यासाठी काय काय साहित्य लागेल याची यादीपण बनवली. त्यामध्ये रिकाम्या पाणी बॉटल, मोजपट्टी (स्केल), चिकटपट्टी, कात्री अशी यादी तयार झाली.
दुसऱ्या दिवशी यादीप्रमाणे सर्व साहित्य घेऊन आम्ही एकत्र जमलो. साहित्य व्यवस्थित मांडून घेतलं आणि पाऊस मोजण्यासाठीचं
छोटसं यंत्र बनवायला सुरुवात केली. आम्ही २ छोटे यंत्र बनवले आणि संघातील दोघांच्या घराच्या छतावर बसवायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही आरती आणि रेणुकाच्या घराची निवड केली. त्यानुसार आम्ही ते यंत्र बसवलं. नंतर  आम्ही दोन गट केले. एक गट आरतीच्या घरावर बसवलेल्या यंत्रामधील पाऊस मोजायचा आणि दुसरा गट रेणुकाच्या घरावर बसवलेल्या यंत्रामधील पाऊस मोजायचा. आमच्या दोन्ही गटांनी पुढचे चार-पाच दिवस रोज सकाळी जाऊन बॉटलमधील पाण्याचे प्रमाण मोजले आणि त्याचे नीट निरीक्षण केले. संघातील हनुमंत व अभिजित यांनी दोन्ही ठिकाणचे मापं एकदम बरोबर घेतले. यातून आम्हाला समजलं की दोन दिवसांत १२ ते १६ मिमी पाऊस पडलेला आहे. म्हणजे पाऊस कमी पडला होता कारण तेव्हा पावसाळा संपत आला होता.
हा प्रयोग करताना आम्ही खुप मज्जा पण केली आणि पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा  प्रयोग नक्की करायचा असंही ठरवलं!
सदानंद चिंचकर, बेडकुची वाडी,बीड
आमची व्यसनमुक्तीची रॅली!
आम्ही शाळेत येत असताना रस्त्यावर काही लोक व्यसन करत होते. तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकत होते. आम्ही शाळेत आल्यावर
व्यसनमुक्तीची एक रॅली काढायचं ठरवलं. सर्वांनी त्याला होकार दिला. तसे आम्ही सरांना सांगितले. सर म्हणाले ही कल्पना उत्तम आहे, आपण मुख्याध्यापकांना याविषयी विचारले पाहिजे. मग आम्ही त्यांना विचारले, त्यांनीही आम्हाला परवानगी दिली.
आमच्या संघातील कौस्तुभ म्हणाला की “आपण रॅली २६ जानेवारीला काढली पाहिजे कारण त्यादिवशी उत्साह जास्त असतो.” अनिकेतने कल्पना दिली की आपण व्यसनमुक्तीबद्दल घोषवाक्ये बनवली पाहिजेत. ‘घोषवाक्ये बनवायची कशावर?’, आम्हाला प्रश्न पडला. तेवढ्यात शुभमने अतिशय उत्तम कल्पना सुचवली. ती अशी की, ‘आपण ड्रॉइंग पेपरवर घोषवाक्ये लिहून घ्यावी अन त्याला मागून पुठ्ठा आणि काठी लावावी.’ मग आम्ही घोषवाक्ये बनवली. २५ जानेवारीला आम्ही बनवलेली सर्व घोषवाक्ये आणली व सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यात थोडाफार बदल केला.
२६ जानेवारीला आमची ही व्यसनमुक्तीची रॅली आंबेडकर चौकातून निघून व जुन्या मोंढ्यापासून एक फेरी करून शाळेत आली.
आम्ही गल्लीतून जात असताना व्यसनमुक्तीच्या घोषणा दिल्या व त्याद्वारे लोकांना समजावलं की व्यसन करू नका. सरांनी मुलांना रस्ता ओलांडण्यास मदत केली. ही आमची रॅली व्यवस्थितपणे पार पडली!
अनिकेत, कौस्तुभ व हेमचंद्र
निमंत्रक: निलेश राठोड, माजलगाव
आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा केला!
२६ जानेवारीच्या निमित्ताने आमच्या संघाच्या वस्तीत आम्ही मुलांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात आम्ही पालकांकारिता प्रदर्शनी भरवली होती. या प्रदर्शनीमध्ये आम्ही वर्षभर केलेल्या कृतिकार्यक्रमांचे फोटो, चित्रं, पोस्टर्स लावले होते. नंतर आम्ही भाषणं आणि काही सांस्कृतिक कार्यक्रमही पालकांसमोर सादर केले. यानंतर दादांच्या मदतीने कुमार निर्माणमधुन भेट मिळालेले फास्टर फेणेची पुस्तकं आणि कौतुकपत्र आम्हाला आमच्या पालकांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी वस्तीतील सर्व पालकांनी चांगली उपस्थिती दर्शविली आणि प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसंच जी जुनी मुले संघ सोडून गेली होती त्यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. मग सर्वांना खाऊ दिला.
या कार्यक्रमासाठी आम्ही पहिल्यांदाच रस्त्यावरील सर्व परिसर स्वतःच झाडून स्वच्छ केला आणि बसण्याकरिता घरून ताडपत्री वैगरे आणून व्यवस्था केली. हे करताना आम्ही सर्वांनी खुप धम्माल केली.
निमंत्रक: नितीन कायरकर, नागपूर