मुलांनो,
तुम्ही सर्व छोटी छोटी मुलं, तुम्ही येऊन असा पुढाकार घ्यावा,
हे अवतीभवतीचे प्रश्न बघावे, ते प्रश्न सोडवण्यासाठी काही कृती करावी आणि मग ती
कृती कशी केली ते इथे येऊन सांगावं, हे फार विलक्षण आहे. आजच्या काळात ही प्रेरणा
देणारी आणि उत्साह वाटायला लावणारी गोष्ट आहे. कोणास सांगता येईल कदाचित तुमच्या
मधूनच एखादे बाबा आमटे होतील, एखादे गाडगेबाबा निघतील, एखादा शास्त्रज्ञ निघेल,
एखादा पर्यावरण वाचवणारा सुंदरलाल बहुगुणा निघेल. त्यामुळे तुम्ही हे जे छोटे-छोटे
समाज कार्य केले आहे त्यातून तुमच्यामध्ये दडलेल्या समाज सेवकाला उमलायला नक्कीच
वाव मिळाला आहे.
जशी आपली शारीरिक शक्ती वाढते, बुद्धिमत्ता वाढते तशीच आपली
सामाजिक शक्ती आणि सामाजिक बुद्धीही वाढली पाहिजे. कुमार निर्माण मध्ये या सर्व
गुणांचा विकास होईलच, पण तुम्ही तुमच्या गावामध्ये ज्या कृती केल्या त्या करताना
तुम्हाला ‘आनंद’ झाला पाहिजे आणि म्हणून मी म्हणतो की कुमार निर्माण साठी काम करू
नका, तुम्हाला एकत्र, एकमेकांसोबत काम करायला मजा येते म्हणून ते काम करा.
तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये काही अडचण दिसते, ती अडचण सोडवावीशी वाटते म्हणून
काम करा.
मा. डॉ. अभय बंग
मुलांनो,
आत्ता जे दशक चालू आहे त्या दशकाच्या सुरुवातीपासून एक बदल
मला जाणवतोय, आणि तो असा की आत्तापर्यंत मोठी माणसं लहान मुलांना शिकवत होती, पण
आता लहान मुलं मोठ्यांना शिकवत आहेत. मी सगळीकडे गेलो की निरनिराळ्या गोष्टी लहान
मुलं मोठ्यांना शिकवताना दिसतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की समाजकार्यसुद्धा
लहान मुलंच मोठ्यांना शिकवणार आहेत. कारण मुलांमधील समाजाविषयीची ‘संवेदनशीलता’
मोठ्यांना मोठ्या प्रमाणात शिकवण्याची गरज आहे. आणि कुमार निर्माणद्वारे हे काम
तुम्ही लहान मुलं नक्कीच कराल असा मला विश्वास वाटतो.
मा. विवेक सावंत
No comments:
Post a Comment