Monday 26 February 2018

संघप्रमुख व संघबैठक


संघप्रमुख
रविवारची मस्त सकाळ उजाडली. आज शाळा नसल्यामुळे सुरज मात्र अंथरुणातच लोळत होता. रात्री उशीरापर्यंत जागून त्याने भारत – इंग्लंड क्रिकेट मॅच पहिली होती. त्यामुळे आईनेदेखील त्याला अजून उठवायला हाक मारली नव्हती. बाबा आणि आई कालच्या मॅच विषयीच बोलत होते.
‘काय सुंदर मॅच झाली ना काल?’, आई म्हणाली.
‘विराट सारखा कप्तान असल्यावर टीम सुंदर काम करणारच’, बाबा म्हणाले.
सुरज अर्धवट झोपेत हे संभाषण ऐकत होता. अचानक त्याला आठवलं की आज सकाळी कुमार निर्माण संघाची बैठक आहे. सुरज आपल्या कुमार निर्माण संघाचा प्रमुख होता. संघाच्या बैठका बोलावणं, त्यामध्ये काय झालं हे लिहून ठेवणं, मुलांशी व निमंत्रकांशी संपर्क ठेवणं ही त्याची जबाबदारी होती.
सुरज खडबडून जागा झाला, अंथरून फेकून देतच तो उठला व आन्हिक आवरायला पळाला. आई-बाबा त्याच्या गडबडीकडे आश्चर्याने पहातच राहिले.
‘आज कुमार निर्माणची बैठक आहे, संघप्रमुख म्हणून मी सर्वात आधी पोचायला हवं!’, सुरजने घोषणा केली.
अंघोळ करून सुरजने स्वच्छ कपडे घातले. आईने दिलेला दुधाचा ग्लास एका घोटात रिकामा करून तो बाहेर पडणार इतक्यात त्याला त्याचं अंथरूण दिसलं.
‘कुमार निर्माण संघात असताना मी माझी कामं स्वत: करायलाच हवीत, त्यात मी तर संघप्रमुख आहे! अंथरुणाची घडी घालूनच जायला हवं’, त्याच्या मनात विचार आला.
अंथरुणाची घडी घालून त्याने ते जागेवर ठेवलं. संघाची नोंदवही आणि पेन घेऊन उत्साहाने तो घराबाहेर पडला.
------------------------------------------------------------------------------------
१.      संघप्रमुखाच्या जबाबदाऱ्या काय यावर चर्चा करा.         
२.      संघप्रमुख लोकशाही पद्धतीने निवडा.
संघ बैठक
सुरज लगबगीने बैठकीच्या ठिकाणी म्हणजे शाळेसमोरील झाडाखाली पोहचला. संघातील प्रिया व मोनाली या दोघी तिथे आधीच पोहोचलेल्या होत्या. त्यांच्यासोबत संघ निमंत्रक ‘वृषाली ताई’ देखील होत्या. मग सुरज, प्रिया आणि मोनाली यांनी मिळून कोण कोणाला बोलावणार हे ठरवलं व त्याप्रमाणे त्यांनी संघातील इतर सर्वांना बोलावून आणलं. सगळे आल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली पण या सगळ्यात बैठकीला ठरलेल्या वेळेपेक्षा जवळपास अर्धा तास उशीर झाला होता.
सगळयांनी एक छान गाणं म्हणून बैठकीची सुरुवात केली. त्या नंतर चर्चेला सुरुवात झाली. गप्पा छान रंगात आल्या होत्या पुढची
कृती काय करणार यावर सगळे हिरीरीने आपापली मतं मांडत होती. तेवढ्यात वृषाली ताईंनी मुलांना घड्याळ दाखवत थांबवलं.
“चला मुलांनो मला आता निघायला लागेल. माझं जरा तालुक्याच्या ठिकाणी काम आहे.”
मुला-मुलींना एवढी रंगत आलेली बैठक सोडून जायला नको होतं. या बैठकीत काय कृती करायची हे ठरवायचंच असं त्यांनी ठरवलं होतं. बैठकीच्या शेवटी नेहमीप्रमाणे खेळ देखील खेळायचा होता आणि आता मध्येच ताई जायचं म्हणत होत्या. काहींना तर ताईंचा राग देखील आला.
“ताई जरा वेळात आपली बैठक संपेलच” प्रशांत म्हणाला.
पण ताईंना तालुक्याच्या गावी जाण्यासाठी एकच एसटी होती त्यामुळे ताईंना वेळेत निघायला हवं होतं.
“तुम्ही बैठक सुरु ठेवा, बैठकीत काय झालं ते सुरज मला सांगेल.” असं म्हणून ताई तिथून निघाल्या. ताई मधूनच गेल्याने सर्वांचाच मूड गेला.
“ताई अशा कशा जाऊ शकतात बैठक सोडून?” प्रशांत जरा रागातच म्हणाला.
“आपण उशिरा आल्याने बैठक उशिरा सुरु झाली म्हणून ताईंना अशी बैठक अर्ध्यात सोडून जावं लागलं” प्रिया समजूतदार पणे म्हणाली.
“माझा अभ्यास बाकी होता, मी तो संपवून आलो म्हणून मला उशीर झाला.” मनोज म्हणाला.
“माझी आवडती सिरीयल सुरु होती” सानिका जीभ चावत म्हणाली.
“काही असलं तरी आपली बैठक आहे हे आपल्या सर्वांना माहिती होतं तरी देखील आपण उशिरा आलो म्हणून आज ताईंना असं बैठक सोडून जावं लागलं” मोनाली म्हणाली. सर्वांनी यावर काही वेळ विचार केला. शेवटी इथून पुढे योग्य नियोजन करून बैठकीला वेळेत हजर राहायचं सगळ्यांनी कबुल केलं.
“पुढच्या बैठकीला ताईंना आपण सॉरी म्हणूया.” प्रशांत म्हणाला
“चला तर मग पुढची बैठक वेळेत सुरु करूया आणि आता खेळ खेळूया” असं म्हणत मुलं-मुली खेळ खेळला मैदानाकडे पळाली..
-----------------------------------------------------------------------------------------
असंच इतर गटांच्या बैठकीत काय झालं ते बघूया...
झोळंबे, सिंधुदुर्ग
आमची पहिली बैठक १० फेब्रुवारीला झाली. बैठकीत मुलांच्या आवडीचे बरेच खेळ घेतले. एक गाणंही घेतलं. मुलांनी संघाला काही नावं सुचवली, त्याचा निर्णय पुढच्या बैठकीत करायचा ठरला. नोंदवहीदेखील तेव्हाच करायची ठरली.
मग संघप्रमुख कसा निवडावा यावर चर्चा सुरु झाली आणि मुलांनी वेगवेगळ्या कल्पना सुचवल्या. जसे की, चिठ्ठ्या करून एक प्रमुख निवडणे, ज्यांची इच्छा आहे त्यांनी उभे राहून साधे मतदान करणे, दोन गट करून प्रत्येक गटाचा एक प्रतिनिधी ठरवून नंतर त्या दोघांत मतदान घेणे आणि प्रत्येकाने आपल्याला कोण प्रमुख व्हावा असे वाटते त्याची चिठ्ठी बनवणे व ज्याच्या नावाच्या जास्त चिठ्ठ्या येतील तो प्रमुख!
यातून शेवटी पहिल्या पद्धतीला बहुमत आल्याने चिठ्ठ्या करून एक प्रमुख निवडला. प्रमुख मात्र दर महिन्याला बदलायचे ठरले. म्हणजे पुढच्या महिन्यात; १० मार्चला नवीन प्रमुख होणार. तेव्हा कॅलेंडर पाहून मुलांच्या लक्षात आलं की तेव्हाही शनिवार आहे. मग प्रत्येक महिन्यात असं होतं का की याच महिन्यात असं आहे? लीप वर्ष आहे का हे? लीप वर्ष म्हणजे काय? अशी चर्चा आपसूक सुरु झाली. एक मुलगी स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्ता चाचणीच्या अभ्यासातील वर्ष आणि वारांचे नियम सांगू लागली. मला हे सगळं पाहून फार मज्जा येत होती. माझ्या अपेक्षेपेक्षा मुलांनी छान प्रतिसाद दिला. बैठक छान झाली!
निमंत्रक: अश्विनी जोशी, झोळंबे, सिंधुदुर्ग
राईझिंग स्टार्स संघ, जळगाव
आम्ही आमची बैठक माझ्या घरीच घेतली. संघाचं नाव व प्रमुख मतदान करून ठरवावे लागले. आमच्या संघाचं नाव राईझिंग स्टार्स असं ठरलं आहे.
नंतर नुकताच कुमार निर्माणचे मार्गदर्शक डॉ. अभय व राणी बंग यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराचा आधार घेऊन चर्चा सुरु झाली. पुढचे दोन तास वेगवेगळ्या बाजूंनी आम्ही यावर चर्चा करत होतो. एकूण बैठक छान झाली.
निमंत्रक: मंजुषा पत्की, जळगाव


संस्कृती संघ, मुक्ताईनगर
आमच्या संघाची पहिली बैठक जोशात पार पडली. त्यातील काही ठळक मुद्दे – बैठकीची सुरुवात व शेवट उत्साहपूर्ण खेळाने झाली. वेगळ्या पद्धतीने सर्वांचा परिचय करून घेतला. कुमार निर्माणबद्दल सर्वांना माहिती सांगितली व त्यावर चर्चा केली. मग संघाचे नाव ठरवायची वेळ आली तेव्हा संस्कार आणि संस्कृती अशी दोन नावे समोर आली. मग मुलांनी मतदान करून संस्कृती हे नाव ठरवलं. संघप्रमुखाची निवडही मतदान करूनच केली. त्यानंतर कुमार निर्माणचे माहिती पत्रक वाचण्यात आले आणि बैठकीचा समारोप झाला.
निमंत्रक: योगेश जवंजाळ, मुक्ताईनगर
स्पंदन संघ, दापोली
आमच्या संघाची पहिली बैठक ११ फेब्रुवारीला झाली. सुरुवातीला आम्ही चिठ्ठ्या टाकून संघाचं नाव स्पंदन ठेवलं. सगळ्यांनी मिळून संघातील गायत्रीला संघप्रमुख म्हणून नेमलं. मग पालकसभा घ्यावी असं मी सुचवलं तेव्हा उद्या पालकांना विचारून तारीख ठरवुया असं मुलं म्हणाली. मग २५ फेब्रुवारीला म्हणजे रविवारी गावाच्या नदीवर डबापार्टी करण्याचे ठरले आणि त्याचे नियोजन पुढील सभेत करू असं मुलांनी ठरवलं. ‘वादळ सुटलं वारा सुटला’ हा खेळ आम्ही खेळलो आणि नंतर ‘पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी... या मनामनातून भांधूया एक वाट जाणारी’ हे गाणं सर्वांनी मिळून म्हटलं. मुलं फारच उत्साहात होती, त्यांना मजा वाटत होती वेगळं काहीतरी करणार याची!
निमंत्रक: सुप्रिया पाटणकर, दापोली




प्रगती संघ, दापोली
आमच्या प्रगती संघाची पहिली सभा ७ फेब्रुवारीला झाली. संघाचं नाव मुलांनी पहिलेच ठरवलं होतं. मग मुलांनी चिठ्ठ्या टाकून प्रियांशूची संघप्रमुख म्हणून निवड केली. मग उप संघप्रमुखही निवडायचं ठरवलं. पुन्हा चिठ्ठ्या टाकून तन्वीची उप संघप्रमुख म्हणून निवड झाली. मुलांनी पुढच्या बैठकीत पालकसभा आणि डबा पार्टी घेण्याचं ठरवलंय. मुलांनी प्रश्नखोका तयार केला आहे. त्यात त्यांना पडलेले प्रश्न चिठ्ठ्यांवर लिहून टाकले आहेत. जसे की, सह्याद्री शिखर उंच का आहे?, काच कशाची बनते?, फुलांमध्ये मध कुठून तयार होतो? आपल्या शरीरात मन नावाचा अवयव नाही तरीही आपण मनापासून हे करा ते करा असं का म्हणतो?, कांगारूच्या पोटाला पिशवी का असते?, समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का दिसतो?, जगात ज्वालामुखी का असतात?, पृथ्वीसारखी जीवसृष्टी सूर्यमालेतील इतर ग्रहांवर का नाही?, इ. यातील काही प्रश्नांची आम्ही चर्चा केली आणि नंतर मग आम्ही ‘लंबी दाढीवाले बाssबाss’ हे गाणं म्हटलं आणि बैठक संपली!
निमंत्रक: विद्यालंकार घारपुरे, दापोली
लिटील ग्रुप, अकोला
आम्ही आमच्या बैठकीला प्रार्थनेने सुरुवात केली. नंतर एक खेळातून सर्वांशी ओळख करून घेतली. मग मुलांना कुमार निर्माणची
माहिती सांगितली, त्यात मुलांनीही काही प्रश्न विचारले. डॉ. अभय बंग यांच्या विषयी जाणून घेण्यास मुले उत्सुक होती.
संघाचं नाव ठरवताना प्रत्येकाने आपल्या संघाचं नाव काय असावं ते सांगितलं. त्यात मुलांनी बरीच नावं सुचवली. मग प्रत्येकाने स्वतःला हवं असणाऱ्या नावाची एक-एक चिठ्ठी टाकली. त्यातून एक चिठ्ठी उचलली अन त्यानुसार मुलांनी संघाचं नाव लिटील ग्रुप असं ठेवलं. चिठ्ठ्यांच्या मदतीनेच गौरव हा संघप्रमुख तर आदर्श हा उप संघप्रमुख बनला.
आम्ही परत एक खेळ खेळलो आणि पुढच्या बैठकीत आम्ही डब्बापार्टी करायचं ठरवलं आहे. अशाप्रकारे आमच्या संघाची सुरुवात छान झाली!
निमंत्रक: प्रतिभा काटे, सारिका तेलगोटे, अकोला
प्रगती संघ, बेडकुचीवाडी, बीड
आमच्या प्रगती संघाची बैठक ८ फेब्रुवारी रोजी झाली. बैठकीची सुरवात छानपैकी खेळाने करण्यात आली.
नंतर मुलांनी पालकसभा भरवली. दादांनी सुरुवातीला पालकांना कुमार निर्माण बद्दल सविस्तर माहिती दिली. आम्ही कुमार निर्माण मध्ये काय काय करतो, निमंञक म्हणुन दादा काय करतात हे पण पालकांना सांगितलं. आमचा संघ मागील एक वर्षापासून कुमार निर्माण मध्ये असल्यामुळे संघातील सागरने पुर्ण वर्षभरात आम्ही काय काय केलं व कशी मज्जा आली ते पालकांना सांगितलं. त्यानंतर पालकांनी काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं आम्ही दिली. हे सर्व आटोपल्यानंतर पालक गेले.
मग दादांनी बैठकीत संघप्रमुख निवडीबद्दल विचारलं. आम्ही भन्नाट आयडिया सुचवल्या; एकजण म्हणे चिठ्ठी टाकून निवडू तर दुसरा दादांना म्हणे तुम्हीच ठरवा. दादा म्हटले संघप्रमुख तुम्हीच निवडावा. तर ओंकारने मतदान करून निवड करायची असं सुचवलं. तर सर्वजण तयार झाले. पण सुरुवातीला उमेदवार म्हणुन चार-पाच जण उभे राहिले, मग आधी संघप्रमुखाची कामं काय काय असतील यावर आम्ही चर्चा केली तर सगळे उभे राहिलेले उमेदवार खाली बसले. त्यानंतर सागर आणि रूपाली स्वत:हून निवडणूकीला उभे राहिले. ओंकार व अभिजीत या दोघांनी निवडणुकीचे नियम ठरवले, तसंच उमेदवाराला त्यांचं चिन्ह विचारून घेतलं.
नियम –
·        निवडणुकीमध्ये कुणीही गोंधळ घालायचा नाही.
·        मतदान करताना एकावेळी एकच जण खोलीत जाईल.
·        नावाच्या पुढे फक्त एकच खुण करायची.
·        मतमोजणी करून जिंकलेल्या संघप्रमुखाचे अभिनंदन करायचं.
·        सर्वांनी ठरवलं की संघप्रमुख दर तीन महिन्याला याच पध्दतीने बदलण्यात येईल.
मग एका वहीवर प्रगती संघ निवडणुक २०१८ व तसेच  दोन्ही उमेदवाराची नावे, त्यांची चिन्ह टाकून तयार केली. दोघेजण दरवाज्याजवळ थांबुन एकेकाला आतमध्ये सोडत होते. अशाप्रकारे प्रगती संघाची निवडणुक एकदम सुरळीत पार पडली!
मतमोजणी करून जिंकलेल्या उमेदवाराचं म्हणजे रूपालीचं सर्वांनी आभिनंदन केलं. विशेष म्हणजे आमच्यातील काही मुलांनी सागरला सॉरीही म्हटलं की आम्ही तुला मत नाही दिलं.
बैठकीच्या शेवटी दादांनी आम्हाला डब्बा पार्टी बद्दल विचारलं तर सर्वांनी खुप आनंदाने ठरवलं की शेजारील गावाजवळ नदीच्या कडेला छान मंदिर, नदीवर बंधारा आहे तिकडे जाऊया. आम्ही १३ तारखेचा महाशिवराञी निमित्त सुट्टीचा दिवस निवडला.
एकंदरीत आमची बैठक मस्त झाली आणि आम्ही खुप मज्जाही केली.
निमंत्रक: सदानंद चिंचकर, बेडकुची वाडी, बीड

No comments:

Post a Comment