Friday 1 September 2017

निमंत्रकांच्या लेखणीतून

उबंटू गट, पुणे

बैठक १
कार्यशाळेहून परत आल्यावर सहजच मुलींकडे परत sanitary vending machine चा विषय काढला.
त्यावर मुलींचे उत्तर होते की , नुकतीच आमच्या शाळेत सर्व मुलींची मिटिंग घेतली. त्यात शिक्षिकांनी आम्हांला सांगितले की, तुम्ही तुमच्या दप्तरात जास्तीचे sanitary napkins ठेवत जा. इथून पुढे तुमची स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवली जातील. पाण्याचीही सोय केली जाईल. व काही अडचणी आल्यास शिक्षिकांना सांगा. आम्ही त्या सोडवू.”
त्यानुसार दुस-या दिवसापासून स्वच्छता व पाणी पुरवठा सुरळीत झाला.  इतकी वर्ष याकडे शाळेचे लक्ष नव्हते.मग हा बदल अचानक का व कसा झाला ?
कदाचित या मुलींनी शाळेत आपल्या मैत्रिणींना आम्हीं अर्ज करून vending machines बसवण्याची विनंती करणार आहोत, सोबत याल का ? असं विचारल होतं व यासंदर्भात मी मुख्याध्यापकांशी फोनवर बोलले होते. याचा तर परिणाम नसावा? आता तरी सुरळीत चाललय. पण मुलींना म्हटलं की हा प्रश्न कायमस्वरूपी सुटला का? हा उपाय तात्पुरता आहे की दीर्घकालीन? यावर मुलींचे मत आले “नाही हा तात्पुरता आहे. समस्या कायमस्वरूपी सुटली पाहिजे.”
मग काय करायचे?
यावर आमचा असा संवाद झाला -
मुली : आपण निधी गोळा करू
निमंत्रक : पण शाळा विकासनिधी घेतेच की.
मुली : आपण मुख्याध्यापकांना भेटून सांगू
निमंत्रक : फक्त सांगून ते ऐकतील का?
मुली : आपण अर्ज लिहू. (मग त्याचे स्वरूप काय ? कसा लिहिणार? कोण लिहिणार? त्यात काय असावे? यावर चर्चा)
निमंत्रक : फक्त जुजबी अर्ज लिहाल तर दाद मिळेल का?
मुली : म्हणजे काय?
निमंत्रक : फक्त तुम्हां ४-५ मुलींना वाटते समस्या आहे म्हणून ते मशिन बसवतील का?
मुली : नाही समस्या सर्व मुलींनाच आहे. पण त्यापुढे येणार नाहीत.
निंमत्रक : प्रयत्न तर करा.
मुली : कसा ?
निमंत्रक : कोणत्या मार्गाने तुम्हीं कमी वेळेत जास्त माहिती ब-याच लोकांकडून गोळा करू शकता? (मग विविध क्लृप्त्या देवून या उत्तरापर्यंत आणले)
मुली : प्रश्नावली! पण ती तयार केली तरी मुली भीतीने भरून नाही देणार. त्यापेक्षा आम्हींच आमच करतो.
यावर त्यांना त्यांच्यापध्दतीने मार्ग निवडण्याची मुभा दिली.

बैठक २
हे करताना सर्वप्रथम तुम्हांला sanitary pads ठराविक वेळाने न बदलल्यास काय दुष्परिणाम होतात हे माहीत आहे का? असे विचारले. त्यावर त्याचें उत्तर होते की, ‘नाही माहीत.’
“मग तुम्हीं लोकांना कसे पटवून द्याल की समस्या किती गंभीर आहे?
त्यांना हे पटले व त्या आता एखाद्या महिला डॉक्टरला भेटून याची माहिती घेणार आहेत. त्याच्या व्यवस्थित नोंदी करून त्या अर्ज लिहिताना त्यात नमूद करणार आहेत.
यामुळे त्याच्यां अर्जाचा गांभीर्याने विचार केला जाईल व त्यावर उपाय ही केले जातील.  
                     
बैठक ३
काल जेव्हा त्या मैत्रिणी मिळून महिला डॉक्टरकडे याविषयी माहिती घ्यायला निघाल्या तेव्हा शेजारच्या काकू त्यांना म्हणाल्या, “आमची इज्जत जाईल असे काही करू नका.”
मुलींनी आज मला हे सांगितले.
मग मी त्यांनाच प्रतिप्रश्न केला, “तुम्हांला अस वाटतय का की तुम्हीं काही चुकीच करताय? वा तुमच्या पालकांना काही चुकीच वाटतय का यात?
मुली म्हटल्या, “नाही.”
“नाही वाटत ना काही चुकीचं तर मग इतरांचा विचार करू नका.” कालच्या घटनेने थोड्या’ नाराज झालेल्या मुली आज डॉक्टरकडे जायला तयार झाल्या.
गटातील मुलींनी परवा डॉक्टरकडे जाऊन चर्चेसाठी वेळ मागून घेतली होती.
भेटीपुर्वी त्यांनी गटात चर्चा करून डॉक्टरांना विचारण्यासाठी काही प्रश्न तयार केले. त्यांना देण्यासाठी स्वत: आभारपत्र तयार केले.

प्रत्यक्ष भेट
ठरल्यानुसार काल त्यांनी महिला डॉक्टरची भेट घेतली.
त्यांच्याशी चर्चा केली. sanitary napkinचे फायदे - तोटे जाणून घेतले. अस्वच्छतेमुळे होणारे आजार व ते कसे टाळता येतील इ. ची सविस्तर माहिती डॉक्टरांनी मुलींना दिली.
यात डॉक्टरांनी स्वत: उत्स्फुर्तपणे  शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी एक विनंती पत्र लिहिले की ‘आपल्या शाळेच्या मुलींनी माझ्याशी या समस्येसंदर्भात चर्चा केली.’ त्यात त्यांनी असुविधेचे दुष्परिणाम इ. ची माहिती लिहिली होती व या समस्येकडे गांभीर्याने पाहून लवकर निराकरण करावे असे नमूद केले.
मुलींनी हे पत्र डायरेक्ट मुख्याध्यापकांना दिले. त्यासोबत त्यांनी लिहिलेला लेखी अर्जही जोडला होता. मुली अगदी न लाजता बिनधास्तपणे मुख्याध्यापकांना (पुरुष) समस्येचे गांभीर्य सांगू लागल्या.
तर सरांनी मुलींना थांबवून मी तुमची अडचण समजतो. २-३ आठवड्यात या मशीन्स आपल्या शाळेत लावू असे मुलींना आश्वासन दिले. त्यासंदर्भात मुलींसमोरच ४-५ शिक्षिकांना बोलावून या मशिन्सविषयी माहिती काढायला सांगितली.

काही अडचणी
·       मुलींना output ची खूप घाई झाली आहे.
·       समस्येचा सखोल अभ्यास करण्याची त्याचीं तितकीशी तयारी नाही.
·       त्यांनी जो अर्ज मुख्याध्यापकांना दिला तो कसा लिहिला हे मला दाखवले नाही व त्याची पोच घेतली नाही.
·       या समस्येचा सखोल अभ्यास व्हावा यासाठी आणखी काय करता येईल?
निमंत्रक: कीर्ती कोलते (७८४१०२२८६६)

मोहोर गट, लांजा
गेल्या आठवड्यापासून प्लास्टिक पिशव्यांचा कमीत कमी वापर ही कृतिकार्यक्रम ठेवून वाटचाल सुरु आहे.
पहिला शनिवार – निरीक्षणाच्या पायरीवर मुलांना परिसरातील कचरा व त्यात असणारे घटक याची नोंद करायला सांगितली असता प्लास्टिक खाऊचे कागद, ग्लास, पिशव्या, चोकलेटचे कागद, बाटल्या व काचेच्या बाटल्या असे न कुजणारे घटक मुलांनी सांगितले. त्या दरम्यान एक कृती मुलांना सुचवली की, स्वतःच्या घराशेजारील व शक्य झाल्यास वाडीतील कचऱ्याच्या ठिकाणांना भेट देऊन जास्त प्रमाणात कोणते प्लास्टिक घटक आढळून येतात, ते शोधणे. 
दुसरा शनिवार – अनुभवाच्या पायरीवर मुलांना नेण्यासाठी दोन प्रकारचे विडी मुलांना दाखवले. एक म्हणजे प्लास्टिकचे महत्त्व पटवून देणारा व दुसरा हानी स्पष्ट करणारा होता. त्यातून प्लास्टिक पूर्णपणे टाळता येणार नाही हे मुलांना कळले. पण ते पसरवता येणेही थांबता येण्यासारखे आहे, हेही त्यांनीच सांगितले.
मुलांना निष्कर्षापर्यंत पोचण्याची खूप घाई झाली होती. पण मी अजूनही अनुभवावर केंद्रित मुले प्लास्टिक दुष्परिणामाबद्दलच जास्त बोलत होते.
आदित्यने एक अनुभव सांगितला की ऋतिकच्या घरचा बैल प्लास्टिक खाऊनच मरण पावला. अशा प्रकारचे अनुभव आपल्या आजूबाजूला कोणकोणते आहेत याबाबत मोठ्या (किमान ३) प्रश्न विचारण्याचा स्वाध्याय प्रत्त्येकाला दिलेला आहे. पुढच्या वेळेला काय घडतेय ते बघूया.
निमंत्रक म्हणून मला आलेल्या काही अडचणी:
-    उपक्रमाचा विषय मी स्वतः निवडला असल्याने मला अपेक्षित निरीक्षणे वा काम मुलांकडून होत नव्हते तर काही जण कंटाळा आला म्हणून सांगत होते. त्यावेळी मला सुद्धा वैताग यायचा. पटकन एखादी गोष्ट अथवा उपाय सांगून मोकळे व्हावे असा मोह व्हायचा.
-     निवडलेल्या कृतीबाबत अनुभव व अभ्यास कसा असावा या दोन टप्प्यांचा खुप विचार करावा लागला. निरीक्षणात त्यांना खाऊचे प्लास्टिक कागद जास्त प्रमाणात दिसले, पण ही समस्या दुर्लक्षित करून स्वतःला हवी असलेली कृती करून घेणे योग्य ठरेल का? यावर विचार सुरु आहे.
-       विविधांगी अनुभव कसा देता येईल याबाबतीत माझ्या कल्पना मला मर्यादित वाटतात.
-       ‘अभ्यास’ या पायरीची कधी आणि कशी सुरुवात करावी यावरही मार्ग काढणे सुरु आहे.
निमंत्रक: सुहास शिगम (८२७५३९२४००)

No comments:

Post a Comment