Friday 1 September 2017

कुमार निर्माण

कुमार निर्माण – थोडक्यात
उद्दिष्ट
शालेय वयोगटातील मुलांसाठी एक अशी आनंददायी शैक्षणिक प्रक्रिया उभी करणे ज्यातून भविष्यात त्यांच्यामध्ये विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होईल व
· शालेय वयोगटातील मुलांमध्ये ‘वैश्विक मानवी मुल्यांची’ रुजवणूक होईल
· शालेय वयोगटातील मुलांची ‘स्व’ ची व्याप्ती वाढेल
· शालेय वयोगटातील मुलांमध्ये ‘सामाजिक कृतीची प्रवृत्ती’ जोपासण्यास सुरुवात होईल
 वैश्विक मानवी मूल्ये
कुमार निर्माण अंतर्गत आपण ज्यावर भर देणार आहोत अशी मूल्ये खालीलप्रमाणे
· न्याय (Justice)
· अनुकंपा (Compassion)
· वैज्ञानिक दृष्टीकोन (Scientific Outlook)
‘स्व’ ची व्याप्ती
शालेय वयोगटातील मुलांनी स्वत:सोबतच इतरांचाही विचार करावा. इतरांची व्याख्या  सुरुवातीला मुल स्वत:, मुलांचे कुटुंबीय, मित्र, वर्गमित्र यांपासून होऊन परिसरातील लोक, शाळेतील इतर मुले, त्यांचा परिसर इ. अशी वाढत जावी.

आपल्या कृतींमध्ये स्पर्धेच्या ऐवजी सहकार्याचा विचार करण्यास मुलांनी सुरुवात करावी.

सामाजिक कृतीची प्रवृत्ती
मुलांनी सामाजिक कार्य करणे अभिप्रेत नसून मुलांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना तयार होणे, आपल्या आजूबाजूच्या परीसराप्रती आपल्या कर्तव्यांची जाण होणे व या भावना लहान लहान कृतीतून व्यक्त होणे हे अपेक्षित आहे.
मार्गदर्शक तत्वे 

· कृतीतून शिक्षण
· स्पर्धा नव्हे सहकार्य
· शिकण्याचे स्वातंत्र्य
· बहुआयामी बुद्धिमत्ता
· जीवन हेच शिक्षण

विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न, कृती, उपक्रमापर्यंत कसे आणावे?
· बातमी, गोष्ट, खेळ, चर्चा ई. च्या माध्यमातून विषयाला हात घालावा
· क्षेत्रभेटीद्वारे मुलांना विविध गोष्टींचे प्रत्यक्ष दर्शन घडवून आणावे
· त्यांची निरीक्षणशक्ती व जिज्ञासा जागृत करण्याचा प्रयत्न करावा
· मुलांसमोर प्रश्न पडावेत अशी चर्चा व्हावी
· त्यांना उत्तरे शोधण्यास संधी द्यावी, वेळ द्यावा, साधने सुचवावीत
· गरज पडेल तेथेच अधिक प्रश्न किंवा माहिती पुरवावी.
· आपल्याला हव्या त्या प्रश्न/उद्देश्यापर्यंत विद्यार्थी स्वतःहून पोचण्यातच गट निमंत्रकाचे खरे कसब आहे


 कुमार निर्माण - पायऱ्या
कुमार निर्माणची उद्दिष्ट साध्य व्हायची असतील तर मुलांनी कृती कार्यक्रम करणे गरजेचे आहे. पण आपण कृती कार्यक्रम सांगितला आणि मुलांनी तो केला तर आपली उद्दिष्ट्ये साध्य होतील याची शाश्वती देता येत नाही.
कुमार निर्माण मध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं मुलांचं शिक्षण योग्य रीतीने व्हावं, त्यांच्या विचारांना कल्पकतेला वाव मिळावा आणि मुलांना स्वतःला समस्या सोडवता याव्या या साठी कृती कार्यक्रम करताना मुलांनी काही पायऱ्या वापराव्या असं आपण म्हणतो.
कुमार निर्माणची शिक्षणाची ही प्रक्रिया थोडी खोलवर समजून घेऊया.
०.      निरीक्षण:- कृतीकार्यक्रमांसाठी ही अतिशय महत्त्वाची पायरी आहे. निरीक्षणामुळे मुलांना समस्या दिसतील आणि मग मुलं कृती करण्यासाठी उद्युक्त होतील. कुमार निर्माण मध्ये मुलांनी फक्त प्रत्यक्ष जाऊन बघणे याला आपण निरीक्षण म्हणत नाही तर निरीक्षणासाठी प्रत्यक्ष भेट(क्षेत्रभेट), बातमीपत्र, दूरदर्शन, माहितीपट, चित्र, गोष्ट, घटनेचं वर्णन अशा ज्याही माध्यमातून मुलांना परिस्थिती कळेल आणि समस्या जाणवेल असे आणि अनेक माध्यमं वापरता येतील.
१.      अनुभव:- प्रत्यक्ष समस्या दिसल्या नंतर मुलांनी त्या समस्येचा प्रत्यक्ष अनुभव घेणे गरजेचे आहे. त्यातून मुलांना समस्येची तीव्रता जाणवायला आणि संबंधित घटकाविषयी अनुकंपा वाटायला मदत होते. दुसऱ्याच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघायला मुलं यातून अपोआप शिकतात.

अनुभव घेण्यासाठी क्षेत्रभेट, मुलाखत, रोल प्ले, खेळ, एखादी विशिष्ट कृती अशा माध्यमांचा उपयोग करता येतो.
२.      अभ्यास:- दिसलेल्या आणि अनुभवलेल्या समस्येविषयी फक्त भावनिक होऊन समस्येचा उपाय मिळत नाही. समस्येचं नेमकं स्वरूप कळायला हवं. त्यासाठी महत्त्वाचा ठरतो तो त्या समस्येचा अभ्यास! अभ्यासाने आपली त्या समस्येची समज तर वाढतेच पण त्याच सोबत आपण सुचवलेला उपाय अधिकाधिक नेमका आणि प्रभावी होत जातो. एकाच समस्येसाठी आपल्याला अनेक उपाय किंवा पर्यायही सापडू शकतात.
अभ्यास करण्यासाठी मुलं अनेक मार्ग वापरू शकतात जसे की बातमीपत्र, पुस्तक, सरकारी कार्यलय,मुलाखत, सर्वेक्षण, इंटरनेट, शिक्षक, तज्ञ व्यक्ती आणि या खेरीज विषयानुरूप काही इतर मध्यम देखील असू शकतात. योग्य मार्गदर्शनाखाली मुलं माहिती अधिकार कायद्याचा देखील उपयोग करू शकतील.
३.      विचार:- बरेचदा मुलं अभ्यास करताना विखुरलेली असतात म्हणून प्रत्त्येकाने मिळवलेली माहिती गटातील इतर मुलांना कळायला हवी. म्हणून अभ्यास केल्यानंतर जमा झालेल्या माहितीवर गटात बसून विचार करणे महत्त्वाचे ठरते. त्या सोबतच गटात विचार केल्याने, केलेल्या अभ्यासातून निष्कर्ष काढणे, समस्येसाठी उपाय सुचवणे, सुचलेल्या उपायांपैकी योग्य तो उपाय निवडणे, त्यासाठी गरजेची असलेली तयारी करणे, जबाबदाऱ्यांची वाटणी करणे अशा अनेक गोष्टी साधल्या जातात.
या विचाराच्या पायरीवर सर्व मुलं-मुली सहभागी होतील आणि स्वतःचे मत मांडतील याची काळजी निमंत्रकांनी घ्यावी. शक्यतो कुमार निर्माणच्या बैठकीत ही विचाराची प्रक्रिया व्हावी.
४.      कृती:- आपलं काम फक्त वैचारिक न राहता त्याला कृतीची जोड मिळायला हवी. प्रत्यक्ष कृती करतानाचा अनुभव खूप काही शिकवून जातो. म्हणून तो अनुभव देखील महत्त्वाचा ठरतो.
वरील सर्व प्रक्रियेतून गेल्यानंतर मुलांनी कृती करावी. कृती करताना ती पूर्वनियोजित असावी. त्यासाठी असलेल्या कामाची योग्य विभागणी केलेली असावी. सर्वांचा सहभाग असावा. कृती करताना काहीतरी कल्पक उपायांची निवड मुलांनी करावी. आपल्या कृतीचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
५.      शेअरिंग:- कृती करताना मुलांचं खूप शिक्षण होत असतं. मुलांना अनेक वेगवेगळे अनुभव येतात. पण ते अनुभव बोलले न गेल्याने आठवणीतून निसटून जाऊ शकतात. त्याच सोबत या चांगल्या कामासाठी मुलाचं कौतुक होणं हे देखील महत्त्वाचं ठरतं. यासाठी कृती कार्यक्रम झाल्या नंतर मुलांशी त्याबद्दल चर्चा करावी. यात सुरुवातील आपले अनुभव आणि निरीक्षण सांगावे म्हणजे मुलांना काय बोलायचं याविषयी कल्पना यायला मदत होते. गोलात किंवा औपचारिक पद्धतीने न बसता अनौपचारिक पद्धतीने गप्पांच्या स्वरुपात ही चर्चा करावी आणि शेवटी मुलांचे कौतुक करावे.
मुलांचे कौतुक करण्यसाठी आणि अनुभव ऐकण्यासाठी आपण वर्षाच्या शेवटी कौतुक सोहळा देखील आयोजित करतो.
टीप: प्रत्येक पायरीवरून पुढील पायरीवर गटाला नेण्यासाठी आणि कुठलीही पायरी राहून जाऊ नये यासाठी निमंत्रकाने मुलांना योग्य ते प्रश्न विचारावे.
कृती कार्यक्रमाची प्रक्रिया – एक उदाहरण
सर्वप्रथम आपण एक मूल्य ठरवून घेऊ ज्याच्या दिशेने कृती घडतील.
मूल्य: वैज्ञानिक दृष्टीकोन
अपेक्षित कृती: गटातील मुला-मुलींनी परिसरात असलेल्या झाडांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती संकलित करणे. संबंधित स्वराज्य संस्थेस ही माहिती पुरवून परिसरातील वृक्षांची काळजी घेण्याची विनंती करणे.
उदा. ठरविलेल्या परिसरात किती झाडे आहेत. किती झाडे कुणाच्या तरी घरी आहेत आणि किती झाडे सार्वजनिक ठिकाणी आहेत. झाडे कुठल्या प्रकारची आहेत. प्रत्त्येक प्रकारची किती झाडे आहेत. त्या झाडांचे गुणधर्म/उपयोग काय आहेत. त्यांचे वैज्ञानिक नाव काय आहे. झाडांना क्रमांक देणे आणि त्यांचे संरक्षण करणे. ही सर्व माहिती शिस्तबद्ध पद्धतीने मांडणे. (तक्त्यांच्या स्वरुपात)
मुलांशी चर्चा करून असे अजून अनेक मुद्दे ठरवता येतील किंवा समोर येतील. कृतीकार्यक्रमापर्यंत पोचण्याचे टप्पे खालीलप्रमाणे:

१.      निरीक्षण (उद्देश्य: मुलांचे लक्ष झाड आणि झाडांच्या महत्त्वाकडे आणणे)
a.      स्वतःचा सहलीचा अनुभव सांगावा त्यात झाडांचं/जंगलाचं वर्णन येऊ द्यावं. मग मुलांचे अनुभव सांगायला लावावे. (यातून सहली शक्यतो निसर्गरम्य ठिकाणी जिथे भरपूर झाडे, जंगल आहे अशा ठिकाणी जातात असं सुचवता येईल आणि झाडावर चर्चा सुरु करता येईल)
b.      निसर्गचित्र काढायला लावावं. (मुलांच्या प्रत्त्येक चित्रात झाड असेलच त्यावरून चर्चा सुरु करता येते)
c.       परिसरातील बागेस भेट देणे.
d.      गटाने थोडं उन्हात फिरावं आणि मग एखाद्या झाडाखाली बसावं. (झाडाखाली कसं वाटत हे विचारून चर्चा सुरु करता येईल)
२.      अनुभव (मुलांना चर्चेतून जाणवलेल्या समस्येचं महत्त्व अधोरेखित करणे)
a.      उजाड (झाडं नसलेल्या) टेकडीवर किंवा माळरानावर मुलांना फिरायला घेऊन जाणे
b.      ज्यांच्या परिसरातील झाड नुकतंच कापलं आहे, किंवा पूर्वी कापलं आहे अशा मुला-मुलीनी त्यांचे अनुभव सांगावे
c.       ‘झाडे नसतील तर??’ यावर चर्चा घ्यावी.
या नंतर मुलांना या समस्येवर आपण काय करूया असे विचारावं. मुलं एकमताने झाडे लावूया असे सांगतील. अशावेळी जी मोठी झाडे आहेत त्यांची काळजी घ्यायला आपण काय करू शकतो असे विचारून मुलांना हळूहळू वृक्षगणतीकडे आणावे. परिसरातील झाड कुणी कापून नेले तर आपल्याला कसे कळेल? असे प्रश्न विचारता येतील.
३.      अभ्यास:
a.      वन विभागाला/नगरपरिषदेला भेट देऊन ते झाडांची संख्या मोजतात का? आणि त्यांचे संवर्धन कसे करतात याविषयी विचारावे
b.      सर्वेक्षण कसे करावे, कुठली माहिती जमा करावी
c.       माहिती नसलेल्या झाडांची नावे आणि गुणधर्म
d.      वैज्ञानिकपद्धतीने झाडांचे वर्गीकरण कसे केले जाते
४.      विचार
a.      सर्वेक्षण/वृक्षगणनाचे नियोजन
b.      कुठली माहिती संकलित करायची ते ठरवणे
c.       वृक्षांना क्रमांक कसे देणार ते ठरवणे
d.      त्यासाठी लागणारा फोर्म बनवणे
५.      कृती
a.      प्रत्यक्ष वृक्षगणना करणे
b.      ही माहिती संबंधित स्वराज्यसंस्थेस देणे व त्यांना या वृक्षांच्या संवर्धनाची विनंती करणे
६.      शेअरिंग
a.      आलेले अनुभव सर्वांसमोर मांडणे आणि लिहिणे
b.      निमंत्रकाने मुलांचे कौतुक करणे

आपल्या कार्यशाळेत आपण असे काही कृती कार्यक्रम या पायऱ्यानुसार कसे करता येतील हे बघितले होते. याखेरीज कृतीकार्यक्रमांची यादी सोबत देत आहोत. त्यांना आपल्या Cycle मध्ये कसं बसवायचं हे तुम्हाला माहिती आहेच. तरी देखील काही अडचण आल्यास आम्ही आहोतच.
१.       शाळेत/घरात मुला-मुलींतील कामाचे वाटप (अभ्यास करून मुलांनी काही कामाची जबाबदारी स्वीकारणे)
२.      RTE (परिसरातील शाळेत गरिबीमुळे न जाण्याऱ्या मुला-मुलीच्या शालेय प्रवेशासाठी प्रयत्न करणे)
३.      गावात येणारे पाणी आणि त्याचे वाटप योग्य आहे का याबद्दल अभ्यास करणे आणि योग्य वाटप होत नसेल तर त्यासाठी प्रशासनाला विनंती करणे.
४.      शेतमजूर/इतर कुठलाही कामगार आणि शिक्षक किंवा बँकेतील कर्मचारी यांच्या कामाची वेळ आणि त्यांना मिळणारा मोबदला याचा अभ्यास करणे
५.      नाती संस्कृती (परिसरातील आजी आजोबांकडून जुन्या गोष्टी, गाणी, भारुडे, म्हणी, ओव्या जमा करून त्याचे हस्तलिखित बनवणे)
६.      आपल्याला सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना धन्यवाद म्हणणे (सफाई कर्मचारी, ट्राफिक पोलीस इ)
७.      घरातील कामाचा अभ्यास आणि जबाबदारी घेणे (सेवा देणारे सेवा घेणारे)
८.      परिसरातील जैव-विविधतेचा अभ्यास आणि जतन(ही कृती झाड्यांच्या अभ्यासाच्या रूपाने वरती मांडली आहे)
९.      पाण्याचा अभ्यास आणि पाणी जपून वापरणे
१०. प्राण्यांचा Happiness index (जळगावला प्रशिक्षणासाठी हजार असणाऱ्या निमंत्रकांना हे माहिती आहे. बाकी लोकांना त्यांच्याशी संपर्क करण्याची या निमित्ताने संधी आहे)
११. परीसारीत काही व्यक्तींचे एखाद्या अंधश्रद्धेबद्दल प्रबोधन करणे/ अंधश्रद्धेबद्दल पथनाट्य सादर करणे
गटचर्चा: गटबैठक
गटबैठक ही कुमार निर्माणमधील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आपल्या गटाची बैठक structured झाली तर मुलांचाही गटातला सहभाग टिकून राहायला मदत होते आणि निमंत्रकांचाही उत्साह कायम राहतो.
काही महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंद ठेवली तर गटबैठक अधिक फलदायी होण्यास नक्कीच मदत होऊ शकेल.  जसं की,

-           गटबैठक म्हणजे नेमकं काय?
o   गटबैठक/गटचर्चा ही अशी प्रक्रिया आहे ज्यात कुमार निर्माणच्या पायऱ्यांनुसार कृतिकार्यक्रम होण्याची शक्यता वाढते. जसे की, त्यात मुलांनी केलेले निरीक्षण, चर्चा, कृतिकार्यक्रमाचे नियोजन व अनुभवकथन या काही महत्त्वाच्या पायऱ्यांचा अंतर्भाव होतो.
o   सर्वात महत्त्वाचे म्हणजे बऱ्याचदा मुलांना नवनवीन कल्पना सुचत असतात, तर बैठक ही मुलांना सुचलेल्या कल्पना मांडण्याची हक्काची जागा बनू शकते.
o   कृतिकार्यक्रम ठरवताना निमंत्रकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यात निमंत्रकाने मुलांसमोर योग्य वेळी योग्य प्रश्न उपस्थित करण्याची गरज असते. बैठकीत निमंत्राकांना योग्य प्रश्न मुलांना विचारण्याची संधीही मिळू शकते.
-          विषय कसा ठरवणार?
o   कृतिकार्यक्रमाचे विषय हे शक्यतो न्याय, अनुकंपा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन या मूल्यांकडे जाणारे असावेत.
o   गटात कृतिकार्यक्रम ठरवताना आपल्या परिसरातले असावेत, जेणेकरून मुलांना त्याच्याशी जोडल्यासारखे वाटेल.
o   एखादा कृतिकार्यक्रम निमंत्रकाच्या डोक्यात असेल तर बैठकीत त्यावर मुलांशी सविस्तर चर्चा करून मुलांकडूनच तो काढून घेता येऊ शकतो.
o   ठरलेल्या कृतिकार्यक्रमाच्या आयोजानासाठीही गटबैठकीचा उपयोग होऊ शकतो.
-          सुरुवात कशी करणार?
o   विषयाच्या दिशेने चर्चा पुढे जाईल असा खेळ
o   विषयाशी संबंधित गाणी, कविता
o   वैशिष्ट्यपूर्ण वस्तू
o   प्रसंगनाट्य, बाहुलीनाट्य, रोल-प्ले, Activity
o   चित्रकथा, सिनेमा, माहितीपट, लघु-पट, पेपर कटिंग
o   विषयाशी निगडीत विचार करायला प्रवृत्त करणारी गोष्ट
-          विषयाची हाताळणी कशी करणार?
o   चर्चा सुरु असताना महत्त्वाचे मुद्दे फळ्यावर लिहिणे गरजेचे आहे. यामुळे चर्चेतले मुद्दे मुलांच्या लक्षात राहतात.
o   चर्चा योग्य दिशेने पुढे जाण्याच्या दृष्टीने निमंत्रकाने मुलांना योग्य ते प्रश्न विचारले पाहिजेत.
o   निमंत्रकाने विषय भरकटणार नाही, मुलांची चर्चा रटाळ, परस्परविरोधी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
o   चर्चा ठरलेल्या विषयावरून दुसरीकडे जायला लागली आणि जर तो मुद्दा मुलांना आधी ठरवलेल्या मुद्द्यापेक्षा अधिक महत्त्वाचा तसेच जवळचा वाटत असेल तर अशा वेळी निमंत्रकाने मुलांना स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे.
-          शेवट कसा करणार?
o   चर्चेच्या सुरुवातीप्रमाणे चर्चेचा शेवटही तितकाच महत्त्वाचा ठरतो.
o   बैठकीचा शेवट करताना निमंत्रकाने संपूर्ण बैठकीचा आढावा घेणे गरजेचे आहे. त्यातून मुलांना बैठकीत झालेल्या चर्चेची उजळणी व्हायला मदत होते.
o   बैठकीच्या शेवटी निमंत्रक मुलांना काही प्रश्न विचारू शकतो; जसे की,
o   आजच्या चर्चेतून काय लक्षात आले?
o   आजच्या चर्चेतून कुणी वैयक्तिक पातळीवर अथवा संपूर्ण गटाने काही ठरवले आहे का? असल्यास काय?
o   उदा. निश्चय/ कृतिकार्यक्रम
o   बैठकीच्या शेवटी निमंत्रकाने तसेच मुलांनी चर्चेची वहीत नोंद करणे गरजेचे आहे.
-          निमंत्रकाची भूमिका
o   निमंत्रकाची भूमिका हा बैठकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते शिकवणारा आणि शिकणारा असे असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. त्यामुळे निर्णयप्रक्रियेचे अधिकार आपसूकच शिक्षकाकडे येतात. आणि यात शिक्षक मुलांपेक्षा वरच्या पातळीवर असतात. कुमार निर्माणची बैठक घेताना मात्र निमंत्रकाला शिकवण्याच्या (शिक्षकाच्या) भूमिकेतून बाहेर पडून मुलांच्या पातळीवर येऊन चर्चा करणे गरजेचे ठरते.
o   मुलांच्या आणि निमंत्रकाच्या मातांना समान महत्त्व मिळायला हवे, आणि हे मूल्य पाळायचे ठरवले तर, निमंत्रकाचे अधिकार कमी होतात आणि जबाबदारी मात्र वाढते. साधारणपणे मुलांकडून मिळणाऱ्या महत्त्वाची, आदराची इतकी सवय झालेली असते की आपणही मुलांना महत्त्व आणि आदर द्यायचा ही भूमिकाच आपल्याला अवघड वाटू शकते.
o   मुलांचे म्हणणे पटले नाही, विरोधी असले, उद्धट वाटले तरीही ते ऐकून घेणे, समजावून घेणे, त्यावर विश्वास ठेवणे आणि त्यातून चर्चेने मार्ग काढणे ही मूल्ये निमंत्रकाने स्वतःच्या वर्तनातूनच मुलांसमोर ठेवली तर मुलांनाही तसे वागायला मदत होते.
o   बैठकीत चर्चा खेळीमेळीने व्हायची असेल तर निमंत्रक व मुले यांच्यातील नाते हे मैत्रीचे असणे हे खुप महत्त्वाचे आहे.
-          गटबैठकीचे नियम
o   निमंत्रकाच्या डोक्यात आधीच एखादा विषय असेल (जो की चर्चेतून मुलांकडून काढायचा असेल) तर मुलांना त्या विषयाची २ दिवस आधी कल्पना देणे गरजेचे आहे. म्हणजे मुले विषयाचा अभ्यास करू शकतील आणि चर्चा घडून यायला सोपे जाईल.
o   बैठक व्यवस्था गोलाकार असावी जेणेकरून सर्वजण एकमेकांना बघू शकतील तसेच निमंत्रक व मुले समान पातळीला असतील. शक्यतो मुले-मुली एकत्र बसवण्याचा प्रयत्न करावा.
o   जो विषय चर्चेला घेतल्या जाणार आहे त्याबद्दल निमंत्रकाला सखोल माहिती असणे गरजेचे आहे.
o   चर्चेत सर्वसमावेशकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही कारणाने एखादा मुलगा/ मुलगी चर्चेत सहभागी होत नसेल तर अशा वेळी त्यासाठी निमंत्रकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कुमार निर्माण व शालेय पाठ्यपुस्तके
शालेय पाठ्यापुस्तकांमध्ये विविध पाठ कविता समाविष्ठ केलेल्या आहेत. त्या पाठांचा, कवितांचा समावेश कुमार निर्माण अंतर्गत मूल्य रुजवणूक करण्यासाठी करता येतो.
याचा अर्थ शाळेत शिकवतात त्यासारखे पाठ शिकवावेत का? तर नाही! कुमार निर्मांणच्या learning cycle मधील एखाद्या टप्यावर या पाठांचा वापर करावा. जसे की, एका चर्चेच्या विषयाची सुरुवात करताना, पाठातील गोष्ट सांगून करणे, निरीक्षणाच्या टप्यावर पुस्तकातील पाठ सांगून उत्सुकता, माहिती वाढवता येईल. 
यामुळे निमंत्रकाला विषय, मुल्य समजावून सांगताना मदत होईल, शिकणे अधिक रंजक करायला मदत होईल आणि मुलांचा शाळेचा अभ्यासही व्हायला मदत होईल.
कार्यशाळेत या सत्राच्या सुरुवातीला आपण पाठ्यपुस्तके आणि कुमार निर्माणची जोडणी का करावी यावर चर्चा केली. त्यानंतर कुमार निर्माण अंतर्गत जी मुल्ये रुजवण्यासाठी आपण काम करणार आहोत; त्या मुल्यांबद्द्लची आपली जाणीव वाढवण्यासाठी ही मुल्ये म्हणजे काय? या विषयावर mind mapping करायला शिकलो.
मुलांच्या पाठ्यपुस्तकातुन पाठ शोधणे; त्यांना अनुकंपा, वैज्ञानिक दृष्टीकोन या मूल्यांशी जोडून घेणे, त्यावरून कुमार निर्माण गटाची बैठक कशी घ्यावी, विविध कृती कार्यक्रम कसे सुरु करावेत याबद्दल काही प्रात्यक्षिके करून पाहिली.
पाण्याशी संबंधित काही पाठ विज्ञानाच्या पुस्तकात आहेत त्यांचा अभ्यास करून पाणी या विषयावर कृती कार्यक्रम कसा घ्यावा याचा नमुना खाली दिला आहे.
मूल्य: वैज्ञानिक दृष्टीकोन, सामाजिक कृतीची प्रवृत्ती
पहिली बैठक : गटबांधणी, निरीक्षण
विषयाला सुरवात:
o   समजा तुम्ही एका समुद्री बेटावर अडकलात तर जगण्यासाठी काय काय लागेल? – गोड पाणी?
o   आपल्या गावात पाण्याचे स्त्रोत काय? त्यांचे उपयोग काय काय?
o   Story of stuffBottled water हा व्हिडीओ दाखवणे
o   पाण्याची मजेशीर माहिती सांगणे, प्रश्न विचारणे
·       ९७ टक्के पाणी समुद्रात, २ टक्के बर्फ, १ टक्के गोडे
·       पाण्याच्या अवस्था पाणी, बर्फ, वाफ, व त्यांची आण्विक रचना
·       शरीरातील पाण्याचे प्रमाण: ६०-७०%, लहान मुलांचे ७७%, पोटातल्या बाळाच्या ९५%
·       पाण्याचे प्रसरण व त्याचे महत्व
·       एक किलो बनायला किती पाणी लागते? साखर - १५०० लिटर पाणी, तांदूळ – २५०० लिटर, शेंगदाणे – ३५००, कापड – १००००
·       नदी जोड प्रकल्प म्हणजे काय
·       तहान लागली म्हणजे शरीरातील १% पाणी कमी झालेलं असत
·       उपोषणाच्या कथा – विना पाण्याच, अन्नाच आपण किती जगू शकतो? - ३, २१ दिवस अनुक्रमे
·       ४५० डिग्री वरचे झिंगे कसे शिजवणार? करेबिअन समुद्र येथे या तापमानावर झिंगे आढळतात, त्यांची माहिती सांगणे
·       पाणी एक Universal solvent आहे. म्हणजे काय?
·       उकळत्या पाण्यात जीवन असते का?
·       यज्ञ करून पाऊस पडतो का?
दुसरी बैठक : गटबांधणी, अनुभव - यासाठी मुलांनी हि माहिती मिळवावी
o   ५० वर्षांपूर्वी गावात पाण्याचे स्त्रोत कसे होते याची माहिती मिळवणे
o   पाण्याचे नमुने गोळा करून बाटल्यात मांडणे व निरीक्षणे नोंदवणे
o   आपल्या गावात पाण्याशी संबंधित प्रश्न कुठले?

तिसरी बैठक : अभ्यास व विचार करण्यासाठी मुद्दे
o   पाण्याचे वैज्ञानिक प्रयोग करणे
o   गावात संडास असावेत की नसावेत? वादविवाद आयोजन
o   पाणी आणि विविध आजार – डॉक्टर/शिक्षकांशी गप्पा
o   राजेंद्र सिंगची गोष्ट सांगणे – Water man of India
o   हागणदारी व त्याजवळचे पाण्याचे स्त्रोत, त्याचे दुष्परिणाम
o   पाण्याचे शुद्धीकरण कसे करतात
o   पाणी आणि शेतीचा संबंध
o   पाण्याचे असमान वितरण
o   दुष्काळातील पाण्याचे अनुभव

चौथी बैठक : कृती
१.      जनजागृती – आरोग्य, पाणलोट,
२.      ग्रामसेवकाशी संवाद व मागणी
३.      गावातील वाया जाणारे पाणी थांबवणे
४.      शाळेसमोर अभ्यासाची मांडणी
५.        शाळेत/घरी शुद्ध पाण्याची सोय करणे
अशा पद्धतीने पाठ्यपुस्तकातील पाण्याचा अभ्यास आपण कुमार निर्माणद्वारे प्रत्यक्ष जीवनात आणू शकतो. हि कृती व तिची रचना केवळ उदाहरणार्थ दिली आहे ती अशीच व्हावी असा आग्रह नाही. ही कृती २ – ३ महिने देखील चालू शकेल.
कथाकथन
कुमार निर्माण प्रशिक्षण कार्यशाळेत मुलांना गोष्टी सांगण्याचे महत्त्व आपण समजून घेतले. एकच गोष्ट विविध पद्धतीने कशी सांगता येते व त्याचे परिणाम काय होतात हे आपण पाहिले. त्याची इथे थोडक्यात उजळणी करुया.
पद्धत १. – सांगायला सोपी पण रटाळ
निमंत्रक: मुलांनो पृथ्वीवरील झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आमच्या लहानपणी होती त्यापेक्षा कतीतरी कमी झाडे आता शिल्लक राहिली आहेत. आम्ही लहानपणी झाडांवर सूर पारंब्या खेळायचो ते झाड देखील आता कुणीतरी तोडलं आहे. झाड आपल्याला किती काय काय देतं आणि आपण झाडे तोडत सुटलो आहोत.
पद्धत २. – सांगायला व ऐकायला सोपी
निमंत्रक: मुलांनो आत्ताच मी खूप दिवसांनी गावाकडे गेलो होतो. आमच्या लहानपणी आम्ही गावाकडे खूप मज्जा करायचो. विहिरीवर पोहायला जायचो, चिंचा बोरे खायचो, जांभळाचं झाड तर आमच्या घरासमोरच होतं. वेशीजवळच्या वडाच्या झाडावर आम्ही सूर पारंब्या खेळायचो. एकदा तर मी झाडाच्या फांदी सकट जमिनीवर आदळलेलो. पण आता तिकडे गेलो तर जवळपास ही सर्वच झाड तोडलेली होती. गाव अगदी भकास वाटत होतं. वेशीवर वडाचं झाड नसल्याने वेशीची रंगतच गेलीये. आता मुलं कुठं खेळत असतील काय माहिती.
पद्धत ३. सांगायला अवघड पण रंजक व ऐकायला सर्वोत्तम
निमंत्रक: मी गावाकडे गेलो तेव्हा बाहेर अंगणात खाट टाकून झोपलो होतो. रात्री अचानक कुणीतरी माझ्या अंगावरील चादर ओढली. मी आजू बाजूला बघितलं तर कुणीच नव्हतं. मग मी परत अंगावर घेऊन झोपलो. थोड्यावेळाने परत चादर कुणीतरी ओढली. आणि माझा कान पण ओढला मी उठून बघितलं तर ते एक वडाचं झाड होत त्याने एका पारंबीने माझी चादर ओढली होती आणि दुसऱ्या एका पारंबीने माझा कान ते ओढत होतं.  मी खूप घाबरलो. तेवढ्यात त्याने अजून दोन पारंब्यांनी मला उचललं आणि हवेत पकडलं. मी त्याला विचारलं तू काय करतोय. मग ते मला म्हटलं तू मला ओळखलं नाहीस का? मी तेच वडाचं झाड आहे ज्यावर तू सूरपारंब्या खेळायचा. आता या लोकांनी मला तोडून टाकलंय. अजून ते झाड काही सांगणार तेवढ्यात मला आईने उठवलं आणि म्हणे सकाळी काय झोपेत बरळतोय.
मी उठून आमचं ते झाड जिथे होत तिथे गेलो तर ते झाड खरचं कुणीतरी तोडलेलं होतं….
अशा प्रकारे एखादा मुद्दा मुलांना समजावून सांगताना किंवा मानातील विषय मुलांसमोर मांडताना त्याला मनोरंजक आणि चित्तवेधक स्वरूप देता येते. त्यामुळे मुलं बैठकीला आणि विषयाला कंटाळत नाहीत. मुलांची उत्सुकता टिकून राहते. फक्त घटना न सांगता त्यात आजूबाजूचे बारकावे त्यातील पात्रांच्या भावना या गोष्टींचा जर आपण उपयोग केला. तर गोष्ट अधिक रंजक तर होतेच पण जशीच्या तशी मुलांच्या डोळ्यासमोर उभी राहायला मदत होते.
आपण प्रत्त्येक विषयाला थोडा विचार करून अशा प्रकारे चित्तवेधक बनवून मुलांसमोर मांडू शकतो त्यासाठी त्या विषयाला किंवा गोष्टीला थोडे अचंबित करणारे उत्साह वाढवणारे घटक जोडावे लागतात. थोडा विचार केला तर ते सहज शक्य आहे.

वरील प्रत्त्येक गोष्टीच्या प्रकाराला अनुक्रमे Fact, Fiction आणि Fantacy असे म्हणतात.

No comments:

Post a Comment